किरण देसाई यांच्या नव्या कादंबरीची चर्चा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झाली असली, तरी २०१७ पासून त्या नव्या कादंबरी रचण्यात दशकभर मग्न असल्याचे बोलले जात होते. या आठवड्याच्या आरंभी ‘द लोन्लीनेस ऑफ सोनिया अॅण्ड सनी’ या त्यांच्या कादंबरी शीर्षकाने जगभरातील वृत्तपत्रे आणि माध्यमांना दळणविषय दिला. ‘बुकर’च्या तेरा पुस्तकांच्या प्राथमिक यादीमध्ये ‘द लोन्लीनेस ऑफ सोनिया अॅण्ड सनी’ स्थानापन्न झाले. २३ सप्टेंबर २०२५ (लघुयादीच्या दिवसाचा मुहूर्तही हाच) ही या पुस्तकाच्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाची ठरलेली तारीख. तरी निवडमंडळाने या तब्बल जवळपास सातशे पानांच्या प्रकाशनपूर्व बाडावर बुकर नामांकनाची मोहोर दिली. म्हणजे ‘द इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीला २००६ साली बुकर पारितोषिक मिळाल्यानंतर लिहिली गेलेली नवी साहित्यकृती पुन्हा थेट बुकरस्पर्धेच्या मांडवात. प्रकाशनापूर्वीच ‘प्रकाशझोतात’ येण्याचा याइतका मोठा प्रकार साहित्यक्षेत्रात सहसा होत नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटचा आठवडा पुस्तक खपाचे विक्रम रचणार आणि लघुयादीत जावो किंवा न जावो, सनी आणि सोनिया नामक व्यक्तिरेखांच्या एकारलेपणाच्या आरत्या सुरू होणार, हे भाकीत कुणालाही करता
शिकणे आणि शिकवणे यानिमित्ताने ब्रिटन आणि अमेरिकेतच वास्तव्य अधिक असलेल्या किरण देसाई यांनी आपले भारतीय राष्ट्रीयत्व अद्याप तरी जपलेले आहे. पहिली कादंबरी भारतामध्ये घडणारी. दुसरी अमेरिकेतल्या भारतीयांबाबतची कहाणी मांडणारी आणि आता तिसरी अमेरिकेतून भारतात स्थलांतरित होऊन पहिली कादंबरी लिहिण्याच्या धडपडीतली नायिका आणि अमेरिकेत पत्रकारिता करणारा नायक यांची असल्याचा कहाणीअंश बुकरच्या संकेतस्थळावर दिलाय.
ताश औ हा मलेशियाई-ब्रिटिश लेखक पाचव्या ‘द साऊथ’ या कादंबरीसह बुकरच्या यादीत समाविष्ट झाला. दक्षिण मलेशियाच्या १९९० च्या दशकाचा संदर्भ त्याच्या कादंबरीत डोकावलाय. (दीर्घयादीत शिरण्याची त्याचीही तिसरी वेळ) ब्रिटिश लेखक अॅण्ड्र्यू मिलर ‘द लॅण्ड इन द विण्टर’ कादंबरीसाठी, तर हंगेरी-ब्रिटनचे नागरिकत्व असलेले डेव्हिड सलॉय ‘फ्लेश’ या कादंबरीसह दुसऱ्यांदा नामांकित झालेत. अल्बानियन अमेरिकी लिडीया झोगा यांची मिसइंटरप्रिटेशन आणि युक्रेनी-कॅनेडियन मारिया रेव्हा यांची एण्डलिंग या पहिल्याच कादंबऱ्यांनी बुकर यादीला भोज्जा दिलाय. लंडनमधील महाविद्यालयांत सर्जनशील लेखन शिकविणाऱ्या बेंजामीन वूड यांची ‘सीस्क्रेपर’ पाचवी कादंबरीदेखील स्पर्धेत आलीय. डझनभर कादंबऱ्या नावावर असणाऱ्या बेन मार्कोविट्झ यांची ‘रेस्ट ऑफ अवल लाइव्ह्ज’ ही नवी कादंबरी यादीत आहे. केटी किटामुरा हे नाव जपानीच. पण जन्माने, कर्माने अमेरिकी असलेल्या या लेखिकेची ‘ऑडिशन’ कादंबरी यंदा बुकरयादीत येण्याआधीपासून गाजत होती.
कोरियन पिता रशियन आई यांचे अपत्य असलेली सुझन चॉय ही या यादीमधील अमेरिकी लेखिका. तिची ‘फ्लॅशलाइट’ ही कादंबरी घडते मात्र जपानमध्ये. जोनाथन बक्ली यांची ब्रिटनमधील कृष्णवंशीय आणि आधीच्या कादंबरीने बऱ्याच गाजलेल्या लेखिका नताशा ब्राऊन यांची ‘युनिव्हर्सलिटी’ यंदाच्या यादीतील तगडे ब्रिटिश दावेदार. त्रिनिदादमधील क्लेअर अॅडम या मात्र ‘लव्ह फॉर्म्स’ या कादंबरीद्वारे पहिल्यांदाच बुकरफेऱ्यात आल्यात. यंदाच्या यादीतील ठळक जाणवणारी गोष्ट म्हणजे वांशिक-देशिक वैविध्य. कॅनेडियन लेखिकेची युक्रेनमधील कहाणी. अमेरिकी लेखिकेची जपानमधील कहाणी आणि ब्रिटिश लेखकांची आणखी कुठल्या-कुठल्या प्रांतात घडणाऱ्या गोष्टी. सगळ्या कादंबऱ्यांचे आकार धष्टपुष्ट असणारे हे पहिलेच वर्ष असावे. म्हणूनच बुकर मिळवून पुढल्या (१९ वर्षांच्या दमसासातील) कादंबरी लेखनाच्या डावात नव्या बुकरची शक्यता निर्माण झालेल्या किरण देसाईंची कादंबरी पहिले वाचायची की यादीतील पहिली उपलब्ध होणारी, हे आपल्या हौसपल्ल्यानुसार ठरवावे.