विसाव्या शतकाच्या मध्यावर सार्वजनिक गणेशोत्सवात समाजधुरीणांची व्याख्याने आवर्जून आयोजित केली जात असत. शिवाजी मंदिर, पुणेच्या अशा सार्वजनिक गणेशोत्सवात ३० ऑगस्ट १९४९ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘हिंदू धर्म व सांस्कृतिक चळवळीची दिशा’ विषयावर व्याख्यान योजण्यात आले होते. साप्ताहिक ‘विवेक’च्या १८ सप्टेंबर १९४९ च्या अंकात ते पुढे विधिवत प्रकाशित झाले होते.

त्यानुसार तर्कतीर्थांनी भाषणाच्या प्रारंभीच स्पष्ट केले होते की, ‘‘समाजातील अत्यंत दलित मनुष्याला आपल्या भविष्याविषयी आशा कशी उत्पन्न होईल, हा संस्कृतीपुढील आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. आज जगात ज्या विविध संस्कृती आहेत, त्यांच्यात समन्वय झाला पाहिजे, त्यात संवादित्व निर्माण झाले पाहिजे. ते झाले नाही व आजची संघर्षात्मक अवस्था कायम राहिली तर कधी न संपणारे युद्ध सुरू होईल.’’

आपल्या अभ्यासाला तत्त्वज्ञानाची बैठक असल्याचे सांगून ते म्हणाले की, ही बैठक मूलत: तत्त्वजिज्ञासेची आहे. जिज्ञासा हे तत्त्वज्ञानाचे प्रवेशद्वार आहे. श्रद्धा जिज्ञासेला विरोध करते. ती श्रद्धा तामस, राजस असते. सात्त्विक श्रद्धा जिज्ञासाविरोधी नसते. मानव ज्ञानाला मर्यादा असली तरी ते मूलत: अमर्याद आहे. कोणा एका माणसात सर्वज्ञता असत नाही, हे हिंदू धर्माने ओळखले होते, म्हणून हा धर्म प्रेषित मानत नाही. अवतार मानतो. प्रेषित एकच एक असतो. अवतार अनेक असतात. वेद अनेक आहेत. देव अनेक आहेत. विविधता या धर्माचा स्थायिभाव आहे.

सृष्टीतील अन्य जीव आणि माणूस यात फरक आहे. प्राणिसृष्टीत सामुदायिकता असते. कळप असतो प्राण्यांचा नि थवा पक्ष्यांचा. माणूस समुदायात असून स्वतंत्र असतो. त्याला सहजात वृत्ती असतात. त्या समान असून माणूस भिन्न असतो. त्याला मोक्ष असतो. समाजास तो नसतो. मानवाला जी बुद्धी आहे, ती अध:पतित होऊ नये म्हणून तिला सावरण्याचे काम श्रद्धा करते. आइन्स्टाइन, डार्विन सश्रद्ध होते. श्रद्धारक्षणाचे कार्य धर्म करतो.

संस्कृतीची निर्मिती झालीच मुळी विश्वप्रेमातून. संस्कृती विकास दोन अंगांनी होत आला आहे. एक आहे आध्यात्मिक, तर दुसरे अंग आहे भौतिक. दोहोंमध्ये समन्वय हवा. भेद व वैचित्र्य विलोपानेच समन्वय शक्य असतो. सृष्टी मोजायची व रचायची, हे भौतिक संस्कृतीचे कार्य. ते मार्क्सने सांगितले आहे. शंकराचार्यांनी आत्मा सत्य आणि जगत् झूठ असल्याचे सांगितले. दोन संस्कृतींतला हा फरक आहे. आत्मशक्ती श्रेष्ठ की बाह्यांग वा बाह्य जग, हे आपल्यापुढचे खरे द्वंद्व आहे. हेच द्वंद्व शक्ती नि कर्माचे आहे.

हिंदू धर्म समन्वयी आहे. धर्म संस्था अमर्त्य आहे नि सार्वत्रिकही. धर्म नाही असा मानवी समाज पृथ्वीतलावर नाही. स्टॅलिनने युद्धाच्या वेळी चर्चमध्ये घंटानाद करण्यास सांगितले होते. धर्म भुरळ पाडतो; पण संस्कृतीची प्रकृती भिन्न असते. तिच्यात वर्गविग्रह (भेद) असतो. अर्थव्यवस्था वर्गनिहाय भिन्न असते. सत्याचे खरे स्वरूप समजेपर्यंत धर्माचे अस्तित्व अटळ मानले गेले आहे. एका अर्थाने भेदांवर जग उभे आहे नि धर्म व संस्कृतीही. भेद हे संघर्षाचे मूळ आहे, म्हणून समन्वय अनिवार्य ठरतो. दास्यता, भेद यांची समाप्ती उदारमतवादानेच शक्य होते.

तर्कतीर्थांनी संस्कृतीसंदर्भात विपुल लेखन केले आहे. ते नोंदी, भाषणे, लेख, मुलाखती, प्रस्तावना, समीक्षा इत्यादी रूपात उपलब्ध आहे. त्यानुसार संस्कृती हे मानवी अनुभवांचे संचित असते. ते प्रदेशनिहाय भिन्न असते. म्हणून संस्कृती-संस्कृतींमध्ये फरक व वेगळेपण आढळते. लोकपरायण संस्कृती मानव हितवर्धक असते. ती माणसास जगण्याचे सामर्थ्य प्रदान करते. जगातील मोठमोठ्या संस्कृतींचा हा संगम काळ आहे. ज्ञान, विज्ञान, कला, समाज संघटना, युद्धशास्त्र, राजकारण इत्यादी विषयांत आघाडी मारलेली पाश्चात्त्य संस्कृती भारतीय संस्कृतीच्या अंतरंगात शिरली आहे. हा समन्वय उभयपक्षी आहे. इथे भौतिकाचे आकर्षण आहे, तर तिथे अध्यात्माचे. ‘न्यून ते आकर्षक’ हा संस्कृती विकासाचा मूलमंत्र आहे. हाच खरा सांस्कृतिक समन्वय होय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com