तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे सर्वदूरसंचारी प्रबोधक असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. या मित्रपरिवारात सामान्य, असामान्य अशा सर्वक्षेत्रीय, सर्वस्तरीय आत्मीय जनांचा मेळा असे. पत्रव्यवहारात उत्तरे देण्यात त्यांचा आळस दिसत नाही. खरे तर याचे श्रेय तर्कतीर्थांपेक्षा त्यांचे स्वीय सचिव असलेल्या राम कोल्हटकर यांना द्यावे लागेल. स्वीय सचिव किती तत्पर असतो. याचा आदर्श म्हणजे राम कोल्हटकर. तर्कतीर्थ अमेरिकेत आपल्या मुलाकडे १९८३ला गेले असतानाचे त्यांचे एक पत्र आहे. या पत्रात राम कोल्हटकर तर्कतीर्थांना पारिवारिक खुशाली, प्राज्ञपाठशाळेच्या घडामोडी, ‘नवभारत’च्या नोव्हेंबर – डिसेंबर जोडअंकाच्या दिवाळी अंकरूपात प्रकाशित होणाऱ्या लेखक-लेखांची सूची, शारदोत्सव व्याख्यानमालेतील वक्ते व त्यांचे विषय, मराठी विश्वकोशातील कार्यप्रगती, इतकेच नव्हे तर त्या पत्रकाळातील राजकीय घडामोडी, हालचाली, पर्जन्यमान शिवाय संकीर्ण घटनांची खबर द्यायला विसरत नसत. तर्कतीर्थ – राम कोल्हटकर हे औपचारिक नाते तसे अध्यक्ष व स्वीय सचिवाचे; पण हे पत्र खासगी. या पत्राचे संबोधन आहे- तीर्थरूप श्री. अबा, यांचे सेवेशी- कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती विशेष (कृ.सा.न.वि.वि.), तर अभिवादन आहे- तुमचा नम्र. औपचारिक संबंधांना अनौपचारिक मानवी, आत्मीय जिव्हाळा देण्याचा तो काळ!

तर्कतीर्थांच्या मित्रमांदियाळीच्या वर्तुळास परीघच नव्हता! यशवंतराव चव्हाण, प्रा. गोवर्धन पारीख, मानवेंद्रनाथ रॉय, महात्मा गांधी, पंतप्रतिनिधी, औंध, न. चिं. केळकर, शंकरराव देव, प्रा. मे. पुं. रेगे, पु. ल. देशपांडे, प्रा. देवदत्त दाभोळकर, डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, द्वा. भ. कर्णिक, भा. रा. भागवत, सरोजनी बाबर, मधुकरराव चौधरी, न्यायमूर्ती वि. म. तारकुंडे, रा. ना. चव्हाण, हरिकृष्ण मोहनी, डॉ. के. ल. दफ्तरी, प्राचार्य राम शेवाळकर, सुनीता देशपांडे, बाबा आमटे, डॉ. श्रीराम कामत इत्यादी नित्य एकमेकांस स्वहस्ताक्षरात खासगी, औपचारिक, अनौपचारिक, कामानिमित्त, विनंती करीत, शिफारसी देत लिहीत असत.

पु. ल. देशपांडे मराठी विश्वकोशासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्यावर नोंद लिहितात. त्यासंबंधीच्या स्वहस्ताक्षरित पत्रात आपला स्वहस्ताक्षरित नोंदलेख मूळरूपात संग्रहार्थ परत पाठविण्याची तर्कतीर्थांना विनंती करतात. हा असतो जतन साक्षरता संस्कार!

प्रा. मे. पुं. रेगे शास्त्रीजींना १९७८ला स्वहस्ताक्षरात पत्र लिहितात. ते ‘प्रवासी’मार्फत पाठवितात. ही पहिली कुरिअर सेवा असावी, त्यात भरगच्च मजकूर. सर्व पत्र कामांनी खचाखच भरलेले. ‘नवभारत’, ‘मराठी विश्वकोश’, ‘प्राज्ञपाठशाळा’, ‘मुद्रणालय’, ‘मुलाखत’ – सबकुछ काम, काम आणि काम! दोन क्रियाशील विद्वानांतील कार्यमग्नता!

तर्कतीर्थ अशा धबडग्यात आपली पत्नी सत्यवतीस पत्र लिहितात, तेही स्वहस्ताक्षरात; पण ‘महाराष्ट्र रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’च्या शीर्षपत्रावर (लेटरहेड). ‘प्रिय सौ. सत्यवतीस, सप्रेम आशीर्वाद’ संबोधनाने सुरू झालेले हे पत्र ‘तुझा’ अभिवादनाने संपते. लिहिले आहे की, ‘‘तुझी मन:स्थिती चांगली असावी, अशी माझी अपेक्षा आहे. माझ्यावर तुझा पूर्ण विश्वास असला, तरच तुला आयुष्यात खरा आनंद मिळेल आणि समाधान लाभेल. मी तुझ्याशी खरे बोलतो, तेव्हा तू माझ्याबद्दल अधिक वाईट ग्रह करून घेतेस, हे चांगले नाही. तुला जे आवडेल, तेच मी करावे; हे मला मान्य आहे. तुझ्या शब्दांचा मी गुलाम आहे, हे तुला माहीत नाही. तू जर माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, तर तुझे आयुष्य दु:खात जाईल व त्यामुळे माझे जगणे फुकट जाईल.’ हे मनस्वी पत्र आहे २४ जुलै, १९४५चे. तर्कतीर्थांचे वय ४४, तर पत्नीचे ३२ वर्षे. ऐन प्रौढपणातील हे पत्र परस्पर विश्वासावर संसार टिकतो, उभा असतो, याचे सूचन करणारे!

डॉ. बाबा आढाव १४ ऑगस्ट, १९८२ रोजी तर्कतीर्थांना स्वहस्ताक्षरात पत्र लिहितात. पत्र आहे मराठवाडा विद्यापीठ नामांतर परिषदेचे उद्घाटक म्हणून येण्याचे निमंत्रण देणारे. पत्रात अपेक्षा आहे, महाराष्ट्र विधानसभेने नामांतर ठराव करणे. समाज व्यवहारात नेते, कार्यकर्ते एकमेकांस बळ देत समाज विचार, जाणिवा वृद्धिंगत करीत असतात, याचा दृष्टांत!

तर्कतीर्थांनी जपलेले मैत्र हे केवळ गप्पांचा फड नव्हता, तो होता समाज संवाद!