महेश सरलष्कर

नीतिमत्ता समितीपुढे महुआ मोईत्रा यांच्यासंदर्भात भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षे’चा मुद्दा उपस्थित केला. सारंगी यांचा मुद्दा योग्य असल्याचे समितीला का वाटले नाही?

Yogi Adityanath up rally
उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगींच्याच विरोधकांपेक्षा अधिक सभा!
Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

पश्चिम बंगालमधील कृष्णानगरच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे संसदेतील भविष्य निश्चित झालेले आहे. त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये अपात्र केले जाऊ शकेल. काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयाच्या मार्गाने अपात्रतेची कारवाई करण्यात आली. मोईत्रा यांच्या विरोधात संसदेच्या नीतिमत्ता समितीने खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी आणि महुआ मोईत्रा या दोघांनीही भाजपच्या टोळधाडीविरोधात वैयक्तिक लढाई लढली तशीच राजकीयही! राहुल गांधींना वैयक्तिक बदनाम करून त्यांना नामोहरम करण्याचा भाजपने खूप प्रयत्न करून पाहिला होता. पण राहुल गांधी मानसिकदृष्टय़ा कमालीचे कणखर निघाले. त्यांनी त्या टोळधाडीला उत्तरही दिले नाही. ‘भारत जोडो’ यात्रेत त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपच्या टोळधाडीने नांग्या टाकल्या. महुआ मोईत्रा यांनाही राहुल गांधींप्रमाणे वैयक्तिक लढाई लढावी लागली आहे. मोईत्राही मानसिकदृष्टय़ा कणखर असल्याचे दिसते. महिला खासदार म्हणून त्यांच्यावर शिंतोडे उडवले गेले, पक्षाने स्वत:ला दूर केले, राजकीय शत्रूंनी खासगी आयुष्यात डोकावून ब्लॅकमेल केले गेले. इतके हल्ले होऊनही मोईत्राच भाजपवर शिरजोर झालेल्या दिसल्या. सतराव्या लोकसभेतून अपात्र करण्यातून मोईत्रा यांची राजकीय कारकीर्द संपणार नाही; उलट ती अधिक धारदार होण्याची शक्यता आहे. त्यांना तृणमूल काँग्रेसने साथ दिली नाही तर काँग्रेसकडून पाठिंबा मिळू शकतो. भाजपविरोधातील पुढील राजकीय लढाई मोईत्रा यांना ‘तृणमूल’शिवायही लढता येऊ शकेल.

लोकसभेत विरोधी पक्षांमध्ये केंद्र सरकारविरोधात फारसे कोणी आक्रमक होत नाही. भाजपच्या विरोधात टोकदार, विखारी टीका करणाऱ्या अपवादात्मक विरोधी खासदारांमध्ये महुआ मोईत्रांचा उल्लेख करता येईल. अदानींच्या मोदींशी असलेल्या कथित संबंधांवर बोट ठेवले ते राहुल गांधी यांनी आणि त्यानंतर अदानी मुद्दय़ावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजप यांना लक्ष्य केले ते मोईत्रा यांनी! संसदेत अदानी असा उल्लेख आला तरी अनेकांना ठसका लागतो. या उच्चारागणिक संसदेतील अधिकार पदावरील व्यक्तींनी कान टवकारलेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव पत्रकारांनी पाहिलेले आहेत. एका शब्दाने इतकी अस्वस्थता सभागृहात निर्माण होत असेल तर, मोईत्रा यांच्या न घाबरता केलेल्या टीकेला उत्तर कसे द्यायचे असा प्रश्न पडणारच.

अशा आक्रमक खासदारांना गप्प करण्याचे मार्ग शोधले जातात. पुरुष खासदारांना नियंत्रणात आणण्याचे मार्ग वेगळे असतात. महिला खासदारांना गप्प करण्याचा सोपा मार्ग म्हणजे वैयक्तिक बदनामी करणे. मोईत्रांबाबत भाजपने हेच आयुध वापरले. नीतिमत्ता समितीमध्येदेखील नीतिमत्तेचे उल्लंघन करून वैयक्तिक हल्लाबोल केला असेल तर कोणीही संतप्त होणारच. मोईत्रांच्या तोंडून कदाचित असंसदीय शब्द उच्चारले गेलेही असतील. पण, एखाद्याला टोकाचा संताप यावा व रागाच्या भरात त्या व्यक्तीचे संतुलन ढळले तर संबंधित व्यक्ती आक्रस्ताळी, अपरिपक्व, भान हरपलेली असल्याचा आरोप करणेही सोपे जाते. हे सगळे मोईत्रांच्या बाबतीत मुद्दामहून घडवून आणले गेले असे दिसते. संतप्त मोईत्रांच्या चित्रफिती वृत्तवाहिन्यांवरून दाखवल्या गेल्या आणि त्यानंतर मोईत्रांना भाजपच्या महिला खासदारांकडून उपदेशाचे डोस पाजले गेले.

संसदेबाहेर वेगवेगळय़ा पक्षांच्या खासदारांचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध असतात. त्यांच्यामध्ये गप्पाटप्पा, भोजनाचे, मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात. खासदारांची ही मैत्री गैर नव्हे. या मैत्रीपूर्ण वर्तुळाचा मोईत्राही भाग आहेत आणि त्यांच्या विरोधात तक्रार करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबेही याच वर्तुळात वावरतात. असे असतानाही मोईत्रा आणि दुबे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. संसदेच्या सभागृहात एकमेकांवर मुद्दय़ावरून टीका करणारे खासदार संसदेबाहेर गुण्यागोविंदाने राहतात. त्यांनी कधीही वैयक्तिक टीका-टिप्पणी केल्याचे दिसले नाही. त्यांनी कधीही संसदेतही एकमेकांवर लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून वैयक्तिक तक्रार केली नाही. अदानी प्रकरणावर महुआ मोईत्रा यांनी बेधडक टीका सुरू केल्यावर मोईत्रा यांचे खासगी आयुष्य चव्हाटय़ावर आणण्याचे प्रकार झाले. त्यांच्या खासगी कार्यक्रमातील छायाचित्रे ‘व्हायरल’ केली गेली, त्यांच्या खासगी आयुष्याचा कधीकाळी भाग असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला गेला. मोईत्रा यांच्या खासगी आयुष्याची माहिती घेतली गेली. त्यांच्या कथित सामाजिक वर्तुळातील व्यक्तींची माहिती जमवली गेली. त्यातून जबाबनामे, प्रतिज्ञापत्रे मिळवली गेली. भाजपने राहुल गांधींचे खासगी आयुष्य चव्हाटय़ावर आणण्याचा प्रयत्न केला होता. नेपाळमधील पार्टीतील महिलेचे- अगदी मित्राच्या पत्नीचे छायाचित्र प्रसिद्ध करून संबंधित महिलेलाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यापेक्षा महिला म्हणून मोईत्रा यांना बदनाम करणे अधिक सोपे झाले.

संसदेतील अदानीविरोधाचा आवाज बंद करण्यासाठी भाजपने मोईत्रांविरोधात आघाडी उघडताना अत्यंत चतुराई केली. त्यांनी तृणमूल काँग्रेस वा पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जीना दूर ठेवले. मोईत्रा यांच्यापासून पक्षाला तोडण्यात यश मिळाल्यामुळे भाजपला मोईत्रांना एकटे पाडता आले. पक्षाने मोईत्रा यांना दिल्लीतील राजकीय षडय़ंत्रांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले जाते. ते खरेही असेल; पण चहूबाजूंनी  हल्लाबोल होत असताना मोईत्रांच्या पाठीशी कोणीही उभे राहिले नाही ही वस्तुस्थिती आहे. नीतिमत्ता समितीने पाचशे पानांचा अहवाल लोकसभाध्यक्षांना दिलेला आहे. या समितीच्या केवळ दोन बैठका झाल्या, त्याही अल्पवेळेत संपल्या. या बैठकीमध्ये वैयक्तिक प्रश्न विचारून मोईत्रांना घेरले गेले असेल आणि तेव्हा रागाच्या भरात त्यांनी आक्षेपार्ह विधान वा आरोप केले असतील तर त्याचेही खापर मोईत्रा यांच्यावरच फोडले गेले. मोईत्रांचा जबाब नोंदवला गेला, त्यांची उलटतपासणी झाली. हीच संधी मोईत्रा यांना का दिली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. दुबईस्थित उद्योजक दर्शन हिरानंदानी यांना मोईत्रा यांनी लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला. मोईत्रांच्या वतीने हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भातील प्रश्न लोकसभा सचिवालयाकडे पाठवले. यावर नीतिमत्ता समितीच्या सदस्य व भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षे’चा मुद्दा उपस्थित केला. त्यांचा मुद्दा योग्य असल्याचे समितीला का वाटले नाही? अन्यथा समितीने दर्शन हिरानंदानी यांना समितीपुढे हजर राहण्याचे फर्मान काढले असते. मोईत्रा यांच्यावर दोन आरोप ठेवले गेले होते. लॉग-इन आयडीचा गैरवापर आणि प्रश्न विचारल्याबद्दल लाचखोरी. हे दोन्ही आरोप गंभीर असल्यामुळे दर्शन हिरानंदानी यांचा प्रत्यक्ष कबुलीजबाब आणि उलटतपासणीही व्हायला हवी अशी मोईत्रा यांनी मागणी समितीने का अव्हेरली? खरेतर अदानीचा विषय नसता तर कोणी-कोणाला लॉग-इन आयडी दिला याची केंद्र व भाजपने दखलही घेतली गेली असती का हाही प्रश्न पडू शकतो.

नीतिमत्ता समितीसमोरील लढाई मोईत्रा हरल्या असतील, त्यांचा संसदेतील प्रवेश तात्पुरता बंद होईल. पण मानसिक कणखरपणा दाखवत त्यांनी भाजपविरोधात कसून लढा दिला आहे. वैयक्तिक बदनामीनंतरही खचून न जाता वा एक पाऊलही मागे न घेता तुल्यबळ विरोधकाला मोईत्रा यांनी जेरीला आणले हे कौतुकास्पद म्हणता येईल. विरोधी खासदाराची हकालपट्टी केल्याचा आनंद भाजपला मिळवता येऊ शकेल. पण प्रत्यक्ष लाच घेतल्याच्या प्रकरणात भाजपच्या खासदारांची हकालपट्टी २३ वर्षांपूर्वी झालेली होती हे विसरता येणार नाही. मोईत्रांच्या प्रकरणात लाच घेतल्याचा एकही पुरावा अद्याप तरी हाती लागलेला नाही.

mahesh.sarlashkar@expressindia.com