महेश सरलष्कर

पंतप्रधानांनी रामाच्या वनवासाशी निगडित दक्षिणेतील मंदिरांना भेटी देऊन नवा राजकीय सेतू बांधण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र दक्षिणेशी भावनिक नाते जोडण्यासाठी त्यांना उत्तरेतील राजकारणापेक्षा वेगळा मार्ग अवलंबावा लागेल..

दक्षिणेतील चोल साम्राजातील ध्वजदंड, ‘सेन्गोल’ नव्या संसदेतील लोकसभेच्या सभागृहामध्ये बसवण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या ‘सेन्गोल’ला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. लोकसभेत झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावेळी ‘सेन्गोल’ मुर्मूच्या समोर उभा केला गेला होता. नव्या संसदभवनाच्या प्रवेशद्वारापासून राष्ट्रपती लोकसभेच्या सभागृहात येताना व त्या सभागृहातून बाहेर पडताना हा ‘सेन्गोल’ त्यांना मानवंदना देण्यासाठी अग्रभागी ठेवण्यात आला होता. या कृतीतून ‘सेन्गोल’ला प्रजासत्ताक भारताने ध्वजदंड म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली, असा अर्थ निघू शकतो. दक्षिणेतील राजवंशाचे प्रतीक असलेल्या ‘सेन्गोल’ला उत्तर भारताशी जोडून ‘राजवंशा’ची नवी परंपरा सुरू केली, असे म्हणता येऊ शकेल.

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिणेचा दौरा केला होता. केरळ, तामीळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील मंदिरांना भेटी दिल्या होत्या. या मंदिरांचा संबंध रामाच्या वनवासातील घटनांशी निगडित आहे वा त्या मार्गावर ही मंदिरे उभारलेली आहेत. चोल, चेर आणि पांडय़ा राजघराण्यांच्या काळात ही मंदिरे बांधली गेली आहेत. आंध्र प्रदेशातील लेपाक्षी या ठिकाणाहून रावणाने सीतेचे अपहरण केले आणि पुष्पक विमानातून तिला लंकेत नेले. इथल्या लेपाक्षी मंदिरामध्ये मोदी गेले होते. वनवासाच्या काळात पंचवटीला राम, सीता, लक्ष्मणाचे वास्तव्य होते. तिथल्या काळाराम मंदिरात मोदींनी स्वच्छता केली. केरळमध्ये त्रिप्रयारच्या रामस्वामी मंदिरातही मोदी गेले होते. इथे लंकेतून हनुमानाच्या परतीचा उत्सव साजरा केला जातो. तामीळनाडूतील रामेश्वरम येथील कोदंड रामस्वामी मंदिराचेही मोदींनी दर्शन घेतले. तिथून जवळच असलेल्या धनुषकोडी येथील अरिचल मुनईलाही त्यांनी भेट दिली. हा रामसेतूचा आरंभ बिंदू आहे. उत्तरेतील सूर्यवंशी रामाचे दक्षिणेतील ठिकाणांशी नाते जोडून मोदींनी नवा राजकीय सेतू बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. कर्नाटक हे तर हनुमानाचे जन्मस्थानच मानले जाते. इथे भाजपची सत्ताही होती!

मोदींच्या या दक्षिणायनाचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक गाजावाजा झाला. भाजपने ‘अगली बार चारसो पार’चा नारा दिलेला आहे. आणखी दोन महिन्यांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ४०० जागा जिंकायच्या असतील, तर भाजपला दक्षिणेचा आधार घ्यावा लागेल. अर्थात मोदींच्या एक-दोन दक्षिणवाऱ्यांमधून भाजपला दक्षिणेमध्ये मांड ठोकता येणार नाही. पण, भाजपने दक्षिणायनाचा विचार पक्का केला आहे. मोदींच्या या दौऱ्यामागे भाजप दक्षिणेशी  दुजाभाव करत नाही, असे दाखवण्याचाही प्रयत्न आहे.

मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये ‘काशी-तमीळ संगमम’चे दुसरे पुष्पही वाहिले गेले. अशा कार्यक्रमांमधून तमीळ साहित्य, संस्कृती, परंपरा आदींची ओळख उत्तरेला करून दिली जात आहे. यावर्षी सुमारे अडीचशे लोकांना काशीदर्शनासाठी आणले गेले होते. तमीळ कामगार, करागीर, निवृत्त सैनिक अशा विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधल्याचे मोदींनी ‘मन की बात’मध्ये सांगितले होते. पद्म पुरस्कारांमध्येही दक्षिणेतील मान्यवरांचा समावेश केलेला आहे. राम मंदिरात विराजमान झालेल्या रामलल्लाचे मूर्तिकारही दक्षिणेतील म्हणजे कर्नाटकातील आहे. संगममसारख्या कार्यक्रमांतून वा अन्य मार्गाने तामीळनाडूतील द्रविड संस्कृती आणि भाजप म्हणतो ती सनातन संस्कृती यांचा मेळ घातला जात आहे. भाजपचा हा प्रयत्न सनातन धर्माचे आक्रमण असल्याचा अर्थ प्रामुख्याने तामीळनाडूमध्ये काढला गेला असल्यामुळे सत्ताधारी ‘द्रमुक’चे नेते सनातन धर्माविरोधात आक्रमकपणे बोलू लागले आहेत.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर केंद्र सरकार आणि प्रामुख्याने उत्तर भारतातील हिंदी पट्टय़ात प्रभुत्व असलेला भाजप अन्याय करत असल्याचा सूर दक्षिणेकडील राज्यांतून उमटू लागला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखानुदान सादर केल्यावर काँग्रेसचे खासदार डी. के. सुरेश यांनी केंद्राकडून ‘जीएसटी’तील योग्य वाटा दक्षिणेतील राज्यांना दिला जात नाही. या राज्यांची आर्थिक कुचंबणा केली जाते. त्यामुळे दक्षिणेतील राज्यांना वेगळय़ा राष्ट्राची मागणी करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे वादग्रस्त विधान केले. सुरेश हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू असल्यामुळे भाजपच्या हाती कोलित मिळाले. उत्तर-दक्षिण अशी फूट पाडण्याचा विरोधी ‘इंडिया’ आघाडीचा डाव असल्याचा आरोप भाजपला करता आला. काँग्रेससह दक्षिणेतील पक्ष विभाजनाची भाषा बोलत असून भाजप मात्र भारताच्या अखंडत्वासाठी काम करतो, तुम्ही फुटीरतावादी असून आम्ही राष्ट्रवादी असल्याचे भाजप सांगू पाहात आहे.

दक्षिणेमध्ये कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपचे अस्तित्व आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ताही होती. तिथे भाजपच्या संघटनेचा विस्तार झालेला आहे. किनारपट्टीचा भाग हा भाजपची हिंदुत्ववादाची प्रयोगशाळा मानला जातो. श्रीराम सेनेसारख्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचा प्रभावही याच भागामध्ये आहे. यावेळी कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी बेंगळूरुतील जागा भाजपलाच मिळाल्या होत्या. तेलंगणामध्येही भाजपला १० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. पण, भाजपला तामीळनाडू व केरळमध्ये ‘घुसखोरी’ करता आलेली नाही. त्यामुळे कदाचित मोदींनी प्रामुख्याने तामीळनाडूवर लक्ष केंद्रित केले असावे.

पण, या राज्यांमध्ये भाजपला पक्षाचा विस्तार करायचा असेल तर हिंदी भाषेचा आग्रह आणि हिंदुत्ववादी विचारांना लवचीक करावे लागेल असे दिसते. कर्नाटकमध्ये टिपू सुलतान वा तेलंगणातील हैदराबादमध्ये निजामाची राजवट असे काही मुस्लीमविरोधी मुद्दे भाजपच्या हाती लागलेले आहेत. या दोन राज्यांमध्ये भाजपला मुस्लीमविरोधी राजकारणाचा वापर पक्षविस्तारासाठी करता आला आहे. पण, हा मुद्दा आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळमध्ये उपयोगी पडणार नाही. शिवाय, भाजपचे सर्व नेते हिंदी हीच राष्ट्रभाषा असल्याचा दावा करत असल्यामुळे भाजपला दक्षिणेतील लोकांच्या मानसिकतेशी जुळवून घेणे अवघड झाले आहे. तमिळनाडूमध्ये भाजपला हिंदी भाषा विसरावी लागणार आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी भाजपने मांसाहार-गोमांस हे मुद्दे बाजूला ठेवले होते. हिंदी भाषेला बाजूला करावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी सातत्याने केंद्र सरकारच्या सुशासनाचा उल्लेख करतात पण, हा मुद्दा उत्तरेतील ‘बिमारू’ राज्यांमध्ये आकर्षक ठरू शकतो. दक्षिणेकडील राज्यांचे प्रशासन तुलनेत अधिक कार्यक्षम आहे, तिथे कल्याणारी योजना आधीपासून राबवल्या जातात, त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. आरोग्याच्या-शिक्षणाच्या सुविधा अधिक चांगल्या आहेत. त्यामुळे केंद्रातील उत्तम प्रशासन हा मुद्दा दक्षिणेत बोथट होतो. उत्तरेत हिंदुत्ववाद आणि ओबीसीचे राजकारण यांचे अचूक गणित भाजपला मांडता आले आहे. तसे दक्षिणेमध्ये मांडता आलेले नाही. रामाच्या माध्यमातून हिंदुत्व दक्षिणेत पोहोचविण्याचा प्रयत्न असला तरी सनातन विरुद्ध द्राविड हा वाद उफाळून आलेला आहे. तमिळनाडूमध्ये ‘द्रमुक’सारखे पक्ष बहुजनवादाचे राजकारण करतात, तिथे भाजपचा ‘ओबीसीवाद’ उपयोगी पडण्याची शक्यता नाही. मोदींचे दक्षिणायन ही भाजपसाठी भविष्यातील गुंतवणूक असू शकते पण, या राज्यांतील लोकांमध्ये भावनिक नाते निर्माण करण्यासाठी उत्तरेतील राजकारणापेक्षा वेगळय़ा मार्गावरून पुढे जावे लागेल.