तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपले गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या संपादनाखाली तयार झालेल्या ‘मीमांसा कोश’ निर्मितीस साहाय्य केले. ‘धर्मकोश’ निर्मितीची मूळ संकल्पना स्वामी केवलानंद सरस्वती यांची असली, तरी त्याची निर्मिती व संपादनकार्याने तिला मूर्त रूप दिले तर्कतीर्थांनी. शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने निर्मिलेले अनेक कोश विविध संपादकांनी निर्मिले असले, तरी त्याची संकल्पना तर्कतीर्थांची होती. ‘आयुर्वेदीय महाकोश’ अर्थात् ‘आयुर्वेदीय शब्दकोश’, ‘इंग्रजी-मराठी स्थापत्य- शिल्पकोश’, ‘न्याय व्यवहार कोश’, ‘मराठी वाङ्मय कोश’, ‘मराठी शब्दकोश’, ‘पाली-मराठी कोश’, ‘गुजराती-मराठी शब्दकोश’, ‘उर्दू-मराठी शब्दकोश’, ‘मराठी-सिंधी शब्दकोश’, ‘मराठी-कन्नड कोश’, ‘तमिळ मराठी शब्दकोश’, ‘मराठी अनुवाद ग्रंथसूची’सारखे कोश यासंदर्भात लक्षात येतात. याशिवाय महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर मराठी ज्ञानभाषा म्हणून विकसित होऊन प्रशासन व्यवस्थेत मराठी भाषा वापरास प्रोत्साहन मिळून तिचा व्यवहारी वापर व्हावा, म्हणून तयार केलेला ‘पदनाम कोश’ लक्षात ठेवण्यासारखा आहे.

प्राज्ञपाठशाळा मंडळातर्फे प्रकाशित संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची (भाग १-२) तर्कतीर्थांना कोशकार सिद्ध करते. ‘मराठी विश्वकोश’ची मूळ रचना १७ खंडांची होती, तेव्हा त्या खंडांच्या निर्मितीस उपयुक्त व्हावा म्हणून १९७३ मध्ये प्रकाशित खंड १८ हा ‘परिभाषासंग्रह’ होता. तो मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी असा दुहेरी कोश होय. तो ‘मराठी विश्वकोशात’ प्रयुक्त संज्ञा, संकल्पना, शब्द, विद्याशाखा, पद, परिभाषा इ.चा सर्वविषयसंग्राहक कोशच आहे. या कोशनिर्मितीमागे तर्कतीर्थांची मराठीस अभिजात ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्याची धडपड होती. ती त्यांनी विविध कोशांना लिहिलेल्या अनेक प्रस्तावनांतून स्पष्ट होते. मराठी भाषा केवळ साहित्याने अभिजात होत नाही. तिचे अभिजातपण तिच्या पायाभूत संज्ञा, परिभाषा, संकल्पना, पर्यायवाची शब्दसंपदा निर्मितीवर अवलंबून असते. मराठी भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था यासाठी स्थापन झाल्या. त्यामागेही ‘तर्कतीर्थ दृष्टी’ होती.

‘धर्मकोश’मध्ये हिंदू धर्म व संस्कृती यांच्या अभ्यासाची संस्कृत भाषेतील साधने कालानुक्रमाने ग्रथित करून अभ्यासक, संशोधकांसाठी प्रस्तुत केली आहेत. सर्व मुद्रित ग्रंथ व हस्तलिखितांचा वापर या कोशनिर्मितीत व संपादनात केला आहे. या कोशाचे असाधारण महत्त्व विशद करीत महाभारताच्या संशोधित आवृत्तीचे संपादक व्ही. एस. सुखटणकर यांनी म्हटले आहे की, ‘’ This most valuable encyclopaedia of Indian antiquities promises to become an indispensable work of reference to the future historian of culture.’’ ‘मीमांसा कोश’ची निर्मिती पाहून पॅरिस विद्यापीठाचे संस्कृत प्रा. एल. रणू यांनी त्यास ‘अवधान व सूक्ष्मता यांचा नमुना’ म्हणून गौरविले आहे.

‘मराठी विश्वकोश परिभाषासंग्रह’ प्रस्तावनेत तर्कतीर्थांनी भूमिका विशद करीत म्हटले आहे की, मराठीत परिभाषांचे सार्वत्रिकीकरण न झाल्याने एकाच संज्ञा, संकल्पनेसाठी विविध शब्द प्रयोगित होतात. हा कोश परिभाषांच्या सार्वत्रिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य करतो असे दिसते. तर्कतीर्थांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या ‘इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्पकोश’चे संपादन रा. वि. मराठे यांनी दृष्टेपणाने करूनही १९६५ नंतरच्या स्थापत्य, शिल्पविषयक अध्ययन, अध्यापन, संशोधन, लेखनात या कोशाचा अपवाद वापर हा आपल्या मराठी भाषाविषयक अनास्थेचे ढळढळीत उदाहरण होय. तर्कतीर्थांनी विविध भाषिक कोश (गुजराती, तमिळ, कन्नड, उर्दू, सिंधी, पाली इ.) यांच्या निर्मितीचा हेतू भारतासारख्या बहुभाषिक देशात विविध भाषिक अनुबंध निर्माण करण्याचा तसेच राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा होता. विविध ज्ञान-विज्ञान कोश (आयुर्वेद, होमिओपॅथिक, लक्षण, भावना इ.) निर्मितीमागचा तर्कतीर्थ विचार हा मराठीस विविध ज्ञान-विज्ञान वाहक वा माध्यम भाषा बनविण्याचा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे सर्व कोशकार्य म्हणजे तर्कतीर्थांचा कृतिशील ज्ञानविचार व ज्ञानव्यवहार होय. कोणत्याही भाषासमूहाचे भाषिक स्वावलंबन हे त्या त्या भाषाविषयक अभिवृद्धीत असते, याचे भान तर्कतीर्थांना होते. मराठी म्हणून त्यांनी आपल्या जीवनात मराठी भाषा भारतीय भाषांना जोडत समृद्ध केली, तसेच त्यांनी पाश्चात्त्य भाषांना जोडत भाषांतराद्वारे समृद्ध केली. भाषा समृद्धीसंबंधीचे सर्व मार्ग व साधने वापरत, विकसित करत मराठी भाषाविकासाचे तर्कतीर्थांनी केलेले कार्य म्हणजे त्यांची भाषिक ज्ञानसाधनाच होती.