भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य तिच्या अभिजात साहित्यात आहे. त्याचा शोध व बोध आपणास मानवी विकासाकडे घेऊन जाईल, असा आशावाद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आकाशवाणी केंद्र, पुणेसाठी २० मे, १९७० रोजी ध्वनिमुद्रित केलेल्या भाषणात व्यक्त केला होता. त्या ध्वनिमुद्रित भाषणाचे प्रक्षेपण त्यावेळची व्यवस्था लक्षात घेता दोन-तीन आठवड्यांनी झाले असावे. त्याचा शोध घेऊनही काही हाती आले नाही.
तर्कतीर्थांनी या भाषणात स्पष्ट केले आहे की, साहित्य दोन प्रकारचे असते – १) चिरंतन मूल्यवान, २) समकालसापेक्ष. चिरंतन मूल्यवान साहित्य जगातील सर्व काळात सुसंस्कृत व सद्भिरुची असलेल्या समाजाच्या आकर्षणाचा विषय असतो. भारत, ग्रीस आणि रोममध्ये प्राचीन काळी वैभवशाली संस्कृती होती, असे इतिहास जे सांगतो, त्याची मुळे तत्कालीन कला, काव्य, साहित्य आणि तत्त्वज्ञानात आपणास दिसून येतात. भारत हा परंपरेने भिन्न वंश, साहित्य, संस्कृती, भाषा, निसर्गातून विकसित होत आलेला देश आहे. पूर्व साहित्याचा आढावा घेत असताना लक्षात येते की, मानवाने जगाला समुद्रामार्गे गवसणी घालण्यास प्रारंभ केल्यापासून सांस्कृतिक आदानप्रदान सुरू झाले. एक उदाहरण सांगायचे झाले, तर अलक्षेंद्र (अलेक्झांडर)च्या स्वारीने भारतीय व ग्रीकांमध्ये सांस्कृतिक देवघेव सुरू झाली, त्या काळात (इ.स.पूर्व ३५६ ते ३२३) ग्रीक शोकांतिकांचे प्रयोग भारतात झाले. तो स्वारीत आपल्याबरोबर नाट्यकर्मीही घेऊन आला होता. तरी भारतीय नाटके मूलत: सुखान्तच राहिली. याचे कारण होते, तत्कालीन भारतीय समाजाचे जीवन तत्त्वज्ञान. याचा मुळातून धांडोळा घ्यायचा तर ‘भारतीय संस्कृती : शोध व बोध’ हे भाषण (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय, खंड- २, भाषणसंग्रह- व्यक्ती व विचार, क्र. ४४, पृ.क्र. ३०३) यथामूल वाचले पाहिजे.
तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात भारतीय प्राचीन साहित्यातील ‘ऋग्वेद’, ‘रामायण’, ‘बुद्धचरित्रम्’, ‘भगवद्गीता’, ‘मृच्छकटिक’ यांसारख्या अभिजात साहित्यकृतींद्वारे भारतीय संस्कृतीचा शोध घेत जो बोध विशद केला आहे, तो आजही प्रेरक वाटतो. त्यांचे म्हणणे आहे की, अश्वघोषाचे ‘बुद्धचरित्रम्’, भतृहरीचे ‘शतकत्रय’, कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुंतल’सारख्या साहित्य रचना राजवटी बदलल्या, काळ सरला तरी मृत्युंजयी ठरतात. याचे कारण, त्यातील चिरंतन मूल्ये होत. ‘शाश्वत मूल्यांचे साहित्य हे अभेद (ऐक्य) निर्माण करते, भेदांच्या तटांना ते टिकू देत नाही. मनुष्याच्या व्यापक नैतिक बुद्धीला व सत्य संशोधक प्रवृत्तीला असे साहित्य प्रेरणा देऊन उजळवून टाकते.’
मानवी संस्कृतीतील आद्याग्रंथ ‘ऋग्वेद’ बहुदेववादाकडून एकेश्वरवादाकडे झालेला मानवी विचार विकास समजावतो. वाल्मीकीरचित ‘रामायण’ आणि होमरलिखित ‘इलियड’बद्दल सांगितले जाते की, या उभय कृतींमध्ये जी साम्यस्थळे आहेत, त्यांनी एकमेकांच्या संस्कृतींना प्रभावित केले आहे. ग्रीक लोकांचा असा समज होता की, भारतीय लोक होमरचे ‘इलियड’ वाचत असावेत. प्रत्यक्षात मात्र ते ‘रामायण’ वाचत होते. अलीकडच्या काळात मॅक्स वेबर (१८६४-१९२०)सारखा जर्मन समाजशास्त्री ‘रामायणा’वरील ‘इलियड’प्रभाव दाखवून देतो. याचा अर्थ असा की, जगातील उच्च प्रतिभाशाली महाकवींची प्रतिभा काही संबंध नसताना समान दर्जा, छटा प्रतिबिंबित करते आणि त्याआधारे अन्य संस्कृतीवरील आपल्या संस्कृतीचा प्रभाव अधोरेखित करीत राहते. आजही आपण पाहतो की, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘पुराण’सारख्या साहित्याचा कंबोडिया, थायलंड, जावा, सुमात्रा, बाली, इटली, आग्नेय आणि पूर्व आशियावर, तिथल्या नृत्य, नाट्य, मूर्तिकला, मंदिरे यांवर भारतीय संस्कृती प्रभाव प्रतिबिंबित आहे.
तर्कतीर्थांचे हे भाषण म्हणजे भारतीय व जगभरच्या साहित्य आणि संस्कृतीचा एकमेकांवर असलेला प्रभाव आणि परिणामांचा सांस्कृतिक शोध आणि बोध आहे. तर्कतीर्थ जागतिक प्राच्यविद्या परिषदांमध्ये फ्रान्स, रशिया, अमेरिका, इत्यादी देशांमध्ये गेले. तिथे त्यांनी केलेली भाषणे, वाचलेले निबंध हेच सूत्र विस्तारत राहतात, असे ते सर्व वाचताना लक्षात येते. रवींद्रनाथ टागोर, शरत्चंद्र चटोपाध्याय, महात्मा गांधी या भारतीयांचे साहित्य विचार विश्वसंस्कृतीचे आकर्षण ठरते. याचे कारण, त्यांच्या साहित्यात वैश्विक चित्रण आणि चिंतन असून, ते त्या साहित्यास चिरंतन मूल्य बहाल करते.