तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मूलत: प्राच्यविद्या विशारद होते. वेदाभ्यास त्यांच्या व्यासंगाचा प्रमुख विषय होता. वेदांती हीच त्यांची मूळ ओळख होती. ‘भारतीय तत्त्वज्ञान : उदय आणि विकास’ शीर्षक एक प्रदीर्घ लेख त्यांनी लिहिला होता. तो ‘नवभारत’ मासिकाच्या मे, १९४८च्या अंकात प्रकाशित झाला.

तर्कतीर्थांच्या मतानुसार, विकसित मानव समाजात तत्त्वज्ञानाचा उदय होतो. सामाजिक संस्था, मानसिक मूल्ये आणि बौद्धिक प्रयत्नांतून तत्त्वज्ञान प्रगट होत असते. ते धर्म, कला, नीती, विज्ञान इ. क्षेत्रांना प्रभावित करते. त्यामुळे ज्या समाजात ज्ञाननिर्मिती मंदावते, तो मानवी समाज मागे राहतो. तत्त्वज्ञान मूलत: सामान्य आणि मूलभूत कल्पनांची सुसंगत व तार्किक मांडणी करीत असते. तत्त्वज्ञान हे सृष्टीतील जड व चेतन तत्त्वांच्या मानवी जीवनावरील अभ्यासाचे क्षेत्र होय. या सबंध विचारांतून भारतात विविध दर्शने, तत्त्वज्ञाने जन्माला आली. ती षड्दर्शने म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत होत. तर्कतीर्थांनी या लेखात या सर्वांचा परामर्श घेतला आहे. आजचे भारतीय राजकारण नि समाजकारण मत्सराने ग्रासलेले असल्याने, वैराने प्रभावित झाल्याने भारतीय विद्या, कला, वाङ्मय यांची वाढ खुंटलेली असून, ती आपण जगण्यात तत्त्वज्ञानाशी फारकत घेतल्याचा परिणाम आहे.

भारतीय तत्त्वज्ञान प्रथम वैदिक धर्माच्या काळात आणि वातावरणात जन्माला आले. ते प्रकृती व मानव संबंधांचा विचार करणारे आहे. उपनिषद काळात बौद्धिक अन्वेषण आणि तार्किक निर्णय करण्यास प्रारंभ झाला. पुढे जी भारतीय संघटित दर्शने उदयास आली, त्यांची पूर्वावस्था आपणास वेदांतात दिसून येते. उपनिषदात अद्वैतवाद आहे. तो जड आणि चेतन दोन्ही तत्त्वांचे विवेचन करतो. तथापि, तो जडवादाकडे झुकल्याचे तर्कतीर्थ निदर्शनास आणून देतात. पुढे सांख्य नि चार्वाक दर्शने याचाच विस्तार म्हणून पाहता येते. ‘छांदोग्य’, ‘बृहदारण्यक’ उपनिषदांतील उदाहरणांतून तर्कतीर्थ आपल्या विवेचनाची मांडणी या लेखात करताना दिसतात.

उपनिषदांमध्ये अध्यात्मदर्शन आणि नीतिशास्त्रही विस्ताराने वर्णिल्याचे हा लेख दाखवून देतो. ‘आत्मज्ञ हा सर्वज्ञ होतो, म्हणून आत्म्याला जाण, त्यातच तुझे परमकल्याण आहे,’ असा संदेश देणारे ‘उपनिषद’ सर्वच विश्व आत्मा आहे, हेदेखील स्पष्ट करते. तर्कतीर्थ या प्रदीर्घ लेखात ‘आत्म’विषयक मूलभूत बुद्धिगम्य स्वरूप प्रकारांची विस्ताराने चर्चा करतात. तसेच यात ते औपनिषदिक नीतिशास्त्राचेही विस्तृत विवेचन करतात. निवृत्ती आणि प्रवृत्तीची चर्चाही यात ओघाने आली आहे. उपनिषदोत्तर काळात भारतीय दर्शने निवृत्तीपर होत गेल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. सांख्य, बौद्ध, जैन दर्शने त्यांची उदाहरणे होत. त्याची चरमसीमा चार्वाक दर्शनातील विरोधी मतात दिसते. गौतम बुद्ध हा पारंपरिक दर्शनांना नवे वळण देणारा तत्त्वज्ञ होय. त्यांनी ‘मी सांगत आहे म्हणून वा मी श्रेष्ठ आहे म्हणून सत्य न स्वीकारता ते परीक्षा करून स्वीकारावे’ असे जे सांगितले, तिथे खरा विवेकवाद वा पुढे जडवाद जन्मला, हे तर्कतीर्थ तर्कसंगतीने या लेखात दाखवून देतात. तर्कतीर्थांनी ‘गौतमाची प्रमाणविद्या’ हा वापरलेला शब्द फारच प्रसंगोचित होय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय तत्त्वज्ञानाच्या विकासाचा आलेख शब्दप्रामाण्याकडून बुद्धिप्रामाण्याकडे कसा होत गेला, हे दाखवून देणे या लेखाचा प्रमुख उद्देश दिसून येतो. तर्काकडून प्रमाणाकडे जाणे म्हणजे भावनेकडून बुद्धीकडे जाणे असते, हे सदर लेख वाचत असताना लक्षात येते. सांख्यदर्शन, पूर्वमीमांसा, वैशेषिकसूत्रे, जैनदर्शन, बौद्धदर्शन ही सारी तत्त्वज्ञाने निरीश्वरवादी वा जडवादी होत. ती अध्यात्माकडून मानवास भौतिकाकडे नेतात. म्हणूनही ती इहवादी सिद्ध होतात. भारतीय दर्शन ग्रंथ हे नीतिशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, प्रमाणविद्या विशद करणारे ग्रंथ आहेत. त्यांच्या अभ्यासानेच मानवी जीवन विकसित होत आले आहे. भारतीय तत्त्वज्ञान विकासातून भारतीय संस्कृती व भारतीय जनमानस विकसित होत आलेले दिसून येते. हा विकास म्हणजेच भारतीय पुनरुज्जीवन चळवळ (इंडियन रनेसॉन्स मूव्हमेंट) होय. पुरातन जराजीर्ण विचारांच्या ओझ्यातून या चळवळीने भारतीय समाजास अंधश्रद्धामुक्त केले. हीच खरी भारतीय तत्त्वज्ञान विकासाची देणगी व फलश्रुती आहे, हे तर्कतीर्थ या प्रदीर्घ लेखातून समजावतात.