अमेरिकी अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यासाठीच्या पक्षांतर्गत निवडणुकांना (प्रायमरीज) २०२४ मध्ये सुरुवात होईल. पण त्या देशातील गेल्या अध्यक्षीय निवडणुकीला जितका काळ लोटला, त्यापेक्षा हा काळ कमी आहे. म्हणजे या पक्षांतर्गत निवडणुका वाटतात, तितक्याही दूर नाहीत. एरवी त्यांची दखल या स्तंभातून घेण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. पण त्या निवडणुकांतून रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. त्यामुळे या मुद्दय़ाकडे गांभीर्याने वळावे लागते. याला कारण अमेरिकेतली ताजी घडामोड. वायोमिंग या राज्यात अमेरिकी प्रतिनिधिगृहातील एका जागेसाठी विद्यमान प्रतिनिधी लिझ चेनी यांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा कौल रिपब्लिकन पक्षाच्या मतदारांनी दिला. अध्यक्षीय निवडणुकीप्रमाणेच प्रतिनिधी आणि सेनेटर निवडीची प्रक्रियाही प्रायमरीजच्या टप्प्यातून सुरू होते. अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात मध्यावधी निवडणुका होत आहेत, पण त्यात वायोमिंग येथून लिझ चेनी यांना उभे राहता येणार नाही, कारण प्रायमरीतच त्या पराभूत झाल्या.

लिझ चेनी या रिपब्लिकन पक्षाच्या असल्या, तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कट्टर विरोधक आहेत. गतवर्षी ६ जानेवारी रोजी कॅपिटॉल इमारतीवर झालेल्या हल्ल्यांमध्ये ट्रम्प यांच्या कथित सहभागाची चौकशी करणाऱ्या काँग्रेस समितीच्या त्या उपाध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्यावर त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात महाभियोग आणण्यासाठी ज्या मोजक्या रिपब्लिकन प्रतिनिधींनी सकारात्मक कौल दिला त्यांतील या एक. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून त्याही इच्छुक आहेत. परंतु वायोिमगमधील नामुष्कीमुळे त्यांच्या उमेदवारीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहते. लिझ चेनी यांनी अनेकदा ट्रम्प यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतल्यामुळेच वायोिमग प्रायमरीसाठी ट्रम्प यांनी जातीने लक्ष घालून हॅरियट हेगमन यांना पाठिंबा दिला. या हेगमन प्रचंड बहुमताने वायोिमग प्रायमरी जिंकल्या. हा केवळ एका पराभवाचा मुद्दा नाही. या सगळय़ा घडामोडींमध्ये एक संगती दिसून येते. ट्रम्प यांची रिपब्लिकन पक्षावरील पकड पुन्हा मजबूत होऊ लागल्याची ही स्पष्ट लक्षणे आहेत. किंबहुना, ही पकड ढिली झालीच नव्हती असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६ जानेवारीच्या गंभीर प्रकाराबद्दल ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग ठरावाच्या बाजूने ज्या १० रिपब्लिकन प्रतिनिधींनी मतदान केले, त्यांपैकी आठ निवृत्त होत आहेत किंवा पक्षाच्या मतदारांकडून निवृत्त केले जात आहेत. चेनी यांतीलच एक. अनेक राज्यांमध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी उमेदवारी देण्याच्या उद्देशाने प्रायमरीज घेतल्या जात आहेत. त्यांमध्ये ट्रम्प यांनी पािठबा दिलेले सगळेच निवडून येताहेत असे नव्हे. परंतु २०२० निवडणूक ‘आपल्याकडून हिरावून घेतली गेली,’ या ट्रम्प कथानकावर श्रद्धा असलेल्यांपैकीच बहुतेक प्रायमरीजच्या टप्प्यावर जिंकत आहेत, हे वास्तव धास्तावणारे आहे. ६ जानेवारीचा अमेरिकी लोकशाही प्रतीकांवरील हल्ला ही अमेरिकेच्या सशक्त लोकशाही इतिहासातील एक डागाळलेली घटना. तिचे निर्लज्ज समर्थन करणारे ट्रम्प आजही त्या पक्षात लोकप्रियच नव्हे, तर अध्यक्षीय निवडणुकीसाठी पसंतीचे उमेदवार ठरतात हे जुन्याजाणत्या रिपब्लिकन पक्षातील विचार आणि कर्तृत्वदारिद्रय़ाचे निदर्शक आहे. हमखास निवडणूक जिंकून देणारा हुकमी एक्का (ट्रम्प) दुसरा आहेच कोण, या लोकशाहीला बाधक ठरणाऱ्या समजातून अजूनही तो पक्ष बाहेर येण्याची लक्षणे दिसत नाहीत.