‘विद्वेषवृक्षाची विषफळे!’ हा अग्रलेख (१२ नोव्हेंबर) वाचला. या हल्ल्यात एतद्देशीय तरुणांचे सहभागी असणे, ही एक गंभीर बाब आहे. आतापर्यंत भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असूनही, प्रत्येक वेळी भारतातील मुस्लीम समाजाला सरसकट जबाबदार धरण्याची चूक केली जाते. त्यामुळे, जेव्हा देशांतर्गत मुस्लीम व्यक्ती अशा कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर येते, तेव्हा जातीयवादी शक्तींना संपूर्ण मुस्लीम समाजाला गुन्हेगार ठरवण्याची संधीच मिळते.

‘मुस्लिमांमधील धर्मांध’ असा उल्लेख वारंवार केला जातो. मात्र, अशा हल्ल्यांमागे केवळ मुस्लिमांची कट्टरता हेच एकमेव कारण आहे का, याचा शांतपणे विचार करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून समाजात वाढत असलेला मुस्लीमद्वेष मुस्लिमांमधील काही गैरप्रवृत्तींना चिथावणी देऊ शकतो. जरी वरवर पाहता हा द्वेष धार्मिक वाटत असला, तरी आता त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे; ते आता केवळ धार्मिक राहिलेले नसून ते सामाजिक आणि राजकीयही झाले आहे. जे कट्टरपंथी मुस्लीम अशा हल्ल्यांमध्ये सामील होतात, ते केवळ हिंदू धर्माचा द्वेष करतात असे म्हणणे हे प्रश्नाचे सुलभीकरण ठरेल. उलट, धर्माच्या आधारावर त्यांचा होणारा द्वेष, अन्याय आणि भेदभावाची वागणूक यांमुळे त्यांच्या मनात सूडाची भावना निर्माण होऊ शकते. अशा हल्ल्यांमागे हिंदू आणि मुस्लीम समाजातील द्वेष हेच मूळ कारण आहे. द्वेषाने द्वेषच वाढतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच, ही हिंसाचाराची मालिका थांबवायची असेल, तर देशात सामाजिक सलोखा आणि बंधुभाव निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही. केवळ कोणत्या तरी एका धर्माला दोष देऊन ही समस्या सुटणार नाही.- हरिहर सारंगलातूर

वाढत्या विद्वेषाचा गांभीर्याने विचार आवश्यक

विद्वेषवृक्षाची विषफळे’ हा अग्रलेख (१२ नोव्हेंबर) वाचला. पाकपुरस्कृत दहशतवाद ही अनेक वर्षांपासून भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून कायमच एका धर्माच्या लोकांना खलनायक ठरवले जाते. त्यांच्यावर ‘देशद्रोही’ असा शिक्का मारला जातो. त्याचबरोबर काश्मीर प्रश्नाचे खापर गांधी नेहरू काँग्रेस यांच्यावर फोडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला जात आहे. २०१८ साली पुलवामा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांत अनेक लष्करी जवान शहीद झाले होते, त्यावेळी ‘घर में घुसकर’ची भाषा करत ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला गेला. त्यानंतर अनुच्छेद ३७० आणि ३५-अ हटवल्यामुळे दहशतवादी आटोक्यात येतील, असे दावेही केले गेले, मात्र तरीदेखील दहशतवादी हल्ले काही थांबलेले नाहीत. बैसारनमध्ये हल्ला झाला, त्याचा बदला घेण्यासाठी मोठा गाजावाजा करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले गेले. आता दहशतवादी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाहीत, अशी वातारणनिर्मिती झाली, मात्र दिल्लीतील घटनेने हे दावेही फोल ठरवले. या निमित्ताने देशातील अनेक घरभेद्यांची नावे समोर येत आहेत. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याचवेळी गेल्या काही वर्षांपासून देशात एका विशिष्ट धर्माला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. ‘कपड्यांवरून ओळखता येते’, ‘अस्सी बीस की राजनीती’ अशी भाषा केली जात आहे. जणू काही ते भारताचे नागरिकच नाहीत. त्यांना देशद्रोही ठरवले जाते, त्यांच्या मतांची गरज नाही, त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे अशी भाषा केली जाते. यातून विद्वेषाची भावना वाढत आहे का आणि विद्वेषवृक्षाला अशी विषफळे येत आहेत का याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.- अनंत बोरसेशहापूर (ठाणे)

सुक्याबरोबर ओले जळू नये म्हणून…

विद्वेषवृक्षाची विषफळे!’ हा अग्रलेख (१२ नोव्हेंबर) वाचला. मुळात मुस्लीम समाजातील मूठभर लोकांमुळे भारतच नाही तर जगातील अनेक देश धगधगत आहेत. या मोजक्यांना समाजाने बाहेर फेकले तर समाज तर स्वच्छ राहीलच पण मुस्लीम समाजाविषयीचा दृष्टिकोनही बदलेल. मतांच्या ध्रुवीकरणासाठी ‘हे अतिरेकी नव्हेत, भरकटलेले तरुण आहेत,’ असे दाखवण्याचा अट्टहास आतातरी राजकीय पक्षांनी थांबवला पाहिजे. अन्यथा संपूर्ण मुस्लीम समाजास नाहक भोगावे लागेल व सुक्याबरोबर ओल्यासही जळावेच लागेल.- डॉ. मयूरेश जोशीपनवेल

अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न?

विद्वेषवृक्षाची विषफळे’ हा अग्रलेख (१२ नोव्हेंबर) वाचला. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचे जे संशयित आरोपी पकडले आहेत ते उच्चशिक्षित आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्याच देशाचे नागरिक आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या प्रकारे दहशतवादाने सामाजिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण करून राजकीय ईप्सित साध्य करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही! दहशतवादी आपले काम फत्ते करतात कारण आपल्या सुरक्षा यंत्रणांत त्रुटी राहतात. हेल्मेट घातले नाही किंवा सीट बेल्ट लावला नाही म्हणून सामान्य माणसांना दंड आकारणाऱ्या पोलीस यंत्रणेचे स्फोटकांनी भरलेल्या गाडीकडे मात्र दुर्लक्ष होते.- अनिरुद्ध बर्वेकल्याण

बिल्डर लॉबीमुळे उद्भवलेली समस्या

न्यायपालिका, सरकारही पदपथांवर ‘पायदळी’च?’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. न्यायालय कोणतेही असो त्याचा आदेश हा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर बंधनकारक असतो पण त्याचे पालन पालिका करतात का, याचा विचार केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने हा जो आदेश दिला आहे त्यामुळे साऱ्याच महानगरपालिकांनी आता भानावर यायला हरकत नाही. कारण हा प्रश्न केवळ एखाद्या महानगराचा नाही. नव्याने उभ्या राहणाऱ्या शहरांतही याच समस्या आहेत. पार्किंग नसल्याने

वाहने रस्त्यांवर पार्क केली जातात. यामुळे वाहतुकीवरील ताण वाढत चालला आहे. यास कारणीभूत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांतील अंतर्गत लॉबी. यांनीच साऱ्या शहराचे इतके वाटोळे केले आहे. शहरे बकाल करण्यात त्यांचाच सिंहाचा वाटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश साऱ्याच महापालिकांना विचार करण्यास भाग पाडेल, असा आहे. या साऱ्यात भरडला जातो, तो सामान्य माणूस.- सुनील समडोळीकरकोल्हापूर

अंनिस कुठे कुठे पुरे पडणार?

डोळसांपुढील अंधकार’ हा अग्रलेख (८ नोव्हेंबर) आणि ‘अंनिसचे काम तपासून पाहताना’ हा डॉ. हमीद दाभोलकर यांचा लेख (१२ नोव्हेंबर) वाचला. पुढील प्रश्न मनात उभे राहिले. एखाद्याला वाटू शकते वाघ मरावा, पण तो शेजाऱ्याने मारावा, तसेच काहीसे हे आहे. अंनिस अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करते. प्रसारमाध्यांची म्हणावी तशी साथ मिळत नाही. राजकारण्यांचीही नाही, तरी आमचे काम थांबलेले नाही. आरोग्य व्यवस्था अत्यंत महाग झाली आहे आणि सुशिक्षित लोकही नाइलाजाने, अगतिकतेने अंधश्रद्धेकडे वळत आहेत. भविष्यात अशा घटना वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही. अंनिस कुठे कुठे पुरे पडणार आहे?-सुषमा बसवंत

आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण आवश्यक

तिरुपती बालाजी देवस्थानात प्रसादाच्या लाडूत पाच वर्षांत अडीचशे कोटींची भेसळ होत असेल तर इतर कामकाजात किती कोटींचा भ्रष्टाचार लपलेला असेल? देशभरातील इतरही देवस्थानांत असा भ्रष्टाचार सुरू असेल का? असेल तर तो कितीच्या घरात जात असेल, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत.

तळागाळातील सर्वसामान्य माणूस आपल्या कष्टाचा, घामाचा पैसा या महागाईच्या काळातही आपापल्या श्रद्धा व भावनेपोटी देवाला अर्पण करतो. या देवस्थानात विविध प्रकारच्या देणग्या, उपयुक्त वस्तूंचे दान देत असतो. देवस्थानातच अशा प्रकारे गैरकारभार घडत असेल तर सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धा व भावनांची किंमत शून्य होते. अशा देवस्थानांच्या आर्थिक व्यवहारांवर शासन प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडू शकतात. त्यामुळेच देशभरातील सर्वच देवस्थाने ही शासन- प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यावर अंकुश ठेवला पाहिजे.- अनिल अगावणेपुणे