‘पदरावरचा जरतारी मोर’ हे संपादकीय (१२ डिसेंबर) वाचले. कारकीर्द ऐन भरात असलेल्या एका लावणी नर्तिकेला नृत्य करताना केलेल्या अश्लील हावभावांसाठी माफी मागावी लागण्याची घटना ताजी आहे. अशा वातावरणात सुलोचनाबाईंच्या लावणी सादरीकरणातील आदब आणि शालीनतेचा मोठेपणा नवोदितांना मार्गदर्शक ठरेल.

त्यांच्याविषयीची आठवण अशी की, ‘छोटा गंधर्व’सारख्या शास्त्रीय गायकांच्या मैफलीला मला आवर्जून घेऊन जाणारे माझे आजोबा जेव्हा दामोदर हॉलमधील सुलोचनाबाईंच्या लावणी कार्यक्रमाला घेऊन जातो म्हणाले, तेव्हा आजीने थयथयाट केला होता. त्यावर आजोबा म्हणाले, ‘हा येऊन तुला कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देईल, मग पुढच्या वेळी मी तुला घेऊन जाईन.’ आणि आजी खरेच गेली होती. ही बाईंची कर्तबगारी! बाईंच्या लावणीचे शृंगारिक रसपान केल्यानंतर त्या लावणीचे रसग्रहण करण्यासाठी बाई माझ्यासारख्या अनेकांना उद्युक्त करीत. नटखटपणा बाई ठसक्यातून काळजात रुतवायच्या तेही डोईवरचा पदर ढळू न देता. ‘फाटला गं कोना..’ अशी लटके रुसत तक्रार करणारी ती कलावती नंतर किती तरी दिवस पिच्छा पुरवायची. तिचे भावदर्शन बाई स्वरांतून घडवायच्या. त्याकरिता त्यांना हावभावाची कधीच गरज भासली नाही. ज्याची शृंगाराची जशी कुवत तसा तो कल्पनेत रमायचा. 

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

 – अ‍ॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी, मुंबई

‘स्वरनाटय़’ म्हणजे काय हे उमजले..

सुलोचना चव्हाण यांच्या गाण्याचा एक कार्यक्रम साधारण १९७० साली बंगळूरुमध्ये अनुभवला होता. त्याआधीही त्यांचे गाणे परिचयाचे होतेच, पण स्टेजवर गाताना पाहून विश्वासच बसेना. मांडी घालून माईकपुढे आसनस्थ झाल्यावर, त्यांच्या गाण्यांच्या लहरी कानांवर पडत होत्या, पण चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते, मान डुलत नव्हती, हातवारे नव्हते. समोर बसलेली व्यक्तीच गात आहेत की मागे कोणी रेकॉर्ड लावली आहे, असा संभ्रम निर्माण व्हावा असे दृश्य! ‘स्वरनाटय़’ म्हणजे काय हे पक्के उमजले.

– डॉ. विराग गोखले, भांडुप, मुंबई

मातीतल्या माणसाला रिझवणारी गायिका

लावणी या प्रकाराला नाक मुरडणाऱ्या पोशाखी रसिकांना (?) सुलोचना चव्हाण यांनी आपल्या ठसकेबाज आणि नजाकतदार गायकीने मागे वळून पाहायला लावले. त्यांनी लावणीमधील सौंदर्य अधिक खुलवून त्यातील शब्दांना न्याय दिला. लावणी घराघरांत पोहोचवली. कामगार सभेत सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर सुलोचनाताईंचा आवाज ऐकला की रस्त्यावरचा बिगीबिगी चालणारा गडी थबकत असे आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटत असे. हे निर्भेळ समाधान सुलोचनाबाईंनी काळय़ा मातीत घाम गाळणाऱ्या रांगडय़ा गडय़ाला मिळवून दिले, यातच त्यांच्या गायकीचे यश आहे.

– आनंद वेदपाठक, मुलुंड, मुंबई

महागुंतवणूक प्रत्यक्षात येणे महत्त्वाचे

‘केंद्राकडून मुंबईत महागुंतवणूक’ ही बातमी (लोकसत्ता – ११ डिसेंबर) वाचली. हे सर्व आगामी महापालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून होत आहे, असे दिसते. गुजरातच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील काही प्रकल्प तिकडे पळवून नेले गेले. तिथे भाजपला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. आता हीच चाल प्रथम मुंबई व नंतर महाराष्ट्रात खेळली जाईल. प्रश्न हा आहे की, हे प्रकल्प निवडणुका झाल्यानंतर प्रत्यक्षात येतील की घोषणा हवेत विरतील? जनतेने याआधीच्या अशा आश्वासनांचा आढावा घेणे गरजेचे आहे. गेले दोन-तीन दिवस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची जी जाहिरातबाजी केली जात आहे, तोही याच व्यूहरचनेचा एक भाग असावा. दर पाच वर्षांनी असेच काहीसे होत असल्याने आता अंगवळणी पडले आहे. 

– डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर, मुंबई

काँग्रेसने प्रयत्नच केला नाही

‘गुजरातमधील भाजपच्या यशाचे श्रेय कोणाचे?’ हा लाल किल्ला सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख (१२ डिसेंबर) वाचला. गुजरातचे सरकार केंद्राकडून चालवले जाते या म्हणण्याला विशेष महत्त्व आहे. कारण गुजरात ही पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची मातृभूमी आहे! काँग्रेसने स्वत:च्या पराभवाचे खापर ‘आप’वर फोडले आहे आणि आपला नाकर्तेपणा लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे! काँग्रेसने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी काय केले हे काँग्रेसने सांगावे, मग इतरांना दोष द्यावा! प्रभाव नाही तिथे पराभव होणारच!

‘आप’ फक्त काँग्रेसलाच मारक आहे का? दिल्ली महानगरपालिकेतसुद्धा भाजपची सत्ता ‘आप’ने उलथवून टाकली, याला कोणाला जबाबदार धरणार? आपली पाटी कोरी ठेवून दुसऱ्याच्या पाटीवर डोकावत राहण्याचे हे परिणाम आहेत. मतफुटीची भीती ही रिंगणातील सर्वच पक्षांना असते, म्हणून आपण काहीच करायचे नाही असे नाही. ‘आप’ची भीती भाजपलाही होतीच, पण काँग्रेसने संघर्ष केलाच नाही. हिमाचलमध्ये ‘आप’ला भाजपची मते मिळाली. तिथेही काँग्रेसने आशा सोडली होती, पण अनपेक्षितपणे सत्ता मिळाली. मतदारांवर प्रभाव पाडण्यात काँग्रेस गुजरातमध्ये कमी पडली, हे वास्तव आहे.

– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</p>

एवढी धडपड करण्याची गरज होती का?

‘गुजरातमधील भाजपच्या यशाचे श्रेय कोणाचे?’ हा लाल किल्ला सदरातील लेख  वाचला. भाजपने गुजरातमध्ये उरस्फोड प्रचार केला आणि सत्ता मिळवली. वास्तविक याची गरज होती का? देशाचे पंतप्रधान गुजरात हाच अख्खा देश समजून या राज्याच्या विकासामागे लागले आहेत. उदाहरणार्थ- लोहपुरुष सरदार पटेल यांचा भव्य पुतळा, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्टेडियम, झालेच तर महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे, इतर पक्षांमधील लोकांमागे लावलेले ईडीसत्र इत्यादी. काँग्रेस पक्ष निष्क्रिय होता, आप नवखा होता, अशा स्थितीत एवढी धडपड करण्याची गरज होती का? बिल्कीस बानो प्रकरण, मोरबी पूल दुर्घटना अशा विरोधात जाणाऱ्या गोष्टींचा साधा उल्लेखही होणार नाही, याची काळजी घेतली गेली. जनतेला विचार करण्यासाठी वेळच न देण्यात या पक्षाचा हात कोणीही धरू शकत नाही. असे असताना मोठे संख्याबळ मिळण्यात आश्चर्य ते काय?

– विद्या पवार, मुंबई

तीन निवडणुकांबाबत निरीक्षण चांगले, पण..

‘तीन निवडणुका, तीन निकाल’ हा ‘समोरच्या बाकावरील’ सदरातील लेख वाचला. प्रत्येक राजकीय पक्षाची व त्याच्या नेत्याची कार्यपद्धती वेगळी असते. पहिल्या निरीक्षणाबाबत म्हणायचे झाल्यास के. कामराज वगैरेंनी निधी गोळा केला तो बहुतांशी आपापल्या पक्षासाठी केला. परंतु आज गोळा केला जाणारा निधी नेत्यांच्या मालमत्तेतून कोटय़ांची जी उड्डाणे केलेली आपण पाहतो तिकडे जातो. हा मोठा फरक आहे.

केंद्र असो वा राज्य सरकार, नोकरशाही वा पोलीस खाते आपल्याला पाहिजे तसे वापरतात. आता भाजपवासी असलेल्या राज्यातील एका मंत्र्यांनी म्हटले होते की, आम्हाला साध्या हवालदाराचीदेखील बदली करायचा अधिकार राहिला नाही. त्या वेळी पोलीस खात्यातील सर्व बदल्यांचे अधिकार प्रशासनाकडे दिले गेले होते. पण पोलिसांमुळे मतदानाची टक्केवारी कमी होते, हे पटत नाही. मलबार हिल, ब्रीच कॅण्डी, वाळकेश्वरसारख्या उच्चभ्रू मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी अनेकदा ३०-३५ टक्क्यांपुढे जात नाही असे का? ७० वर्षांपूर्वीचे एक   लोकप्रतिनिधी -जे वडिलांचे मित्र होते ते- आमच्याकडे येताना साधा काठीवाला पोलीसही बरोबर आणत नसत.

तिसरे मतदार यादीतील मतदारांचे व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाने करणे हे नक्की कसे साध्य होते? गेल्या काही वर्षांत सत्ताधारी पक्षाने धर्माचा वापर केला आहे हे सत्य आहे. परंतु इतर पक्षीय राजकारणी निवडणुका आल्या की किंवा सध्याच्या ‘भारत जोडो’ अभियानात पितांबर नेसून मंदिरात लोटांगण घालायला जातातच की. इफ्तार पार्टीलाही आवर्जून हजर असतात. कुठलाही पक्ष आपले अपयश झाकायचा प्रयत्न करतो.

– सुधीर ब देशपांडे, विलेपार्ले, मुंबई

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा कशासाठी?

‘शाईफेकप्रकरणी आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा’ ही बातमी (१२ डिसेंबर) वाचली. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल सातत्याने बदनामीकारक वक्त्यव्ये केली जात आहेत. ताजे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे! महाराष्ट्रभर त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शाईफेकीचे समर्थन करता येणार नाही, पण त्यासाठी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणे, हे बुद्धीला पटणारे नाही. मग ज्यांनी बदनामीकारक वक्तव्ये करून समाजात असंतोष निर्माण केला, त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करणार का? 

– मार्तंड पवार