पुरात वाहिलेले पुणे. केंद्रीय लोकसेवा आयोग. दिल्लीत बुडून जीव गेलेले विद्यार्थी. केंद्रीय श्रममंत्र्यांचा दावा… बघायला गेले, तर अगदी स्वतंत्र वाक्ये, पण जोडायला गेले, तर असे बिंदू जे एकमेकांत गुंतलेल्या अनेक प्रश्नांची गुंतवण समोर आणतात. त्यांच्या चर्चेचे कारणही तसेच. पुण्यातील पुराची चर्चा अद्याप अपुरीच होती, तोवर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे तीन विद्यार्थी दिल्लीतील एका शिकवणी केंद्राच्या तळघरात बुडून मरण पावले. पश्चिम दिल्लीतील जुना राजेंद्रनगर भाग स्पर्धा परीक्षांच्या शिकवणी केंद्रांसाठीच ओळखला जातो. मुले बुडाल्याची दुर्घटना घडली, त्या राव कोचिंग सेंटरचे तळघर तळमजल्याच्या खाली आठ फुटांवर आहे. केंद्राच्या समोरचा रस्ता उताराचा असल्याने जरा जोराचा पाऊस पडला, की तळघरात पाणी शिरते. परवाच्या शनिवारी तळघरातील वाचनालयात तीसेक मुले होती. पाऊस सुरू झाल्यावर काहीजण बाहेर पडले. काहींनी तेथेच अभ्यास करत बसण्याचा निर्णय घेतला. बचावकार्यासाठी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी आणि त्यात फुटलेली एक सांडपाण्याची वाहिनी यांमुळे पाण्याचा वेग प्रचंड होता. असे म्हटले जाते की, वाचनालयाच्या दरवाजाला बायोमेट्रिक यंत्रणा बसविलेली होती, जी पाण्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन खराब झाली आणि दरवाजा जाम होऊन आतून बाहेर पडणे मुश्कील झाले. नंतर पाण्याच्या प्रवाहापुढे न टिकल्याने तो तुटून पाणी भसाभसा आत शिरले आणि त्या लोंढ्यातून बाहेर पडणे काहींनाच शक्य झाले. गेल्या वर्षी दिल्लीच्या राजेंद्रनगरमध्येच उघड्या तारेमुळे विद्यार्थ्याला बसलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेमुळे दिल्ली महापालिकेने सर्व शिकवणी केंद्रांना अग्निशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सक्तीचे केले होते. मात्र, शिकवणी केंद्रांनी त्यातही शक्कल लढवून तळघर केवळ साहित्य साठवणुकीसाठी वापरले जाईल, असे सांगून हे प्रमाणपत्र मिळविले. प्रत्यक्षात तेथे वाचनालये, अभ्यासिका उघडून, त्याला चक्क अतिरिक्त शुल्क आकारून ती विद्यार्थ्यांना वापरायला दिली आहेत. दिल्लीत सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या निषेध आंदोलनांच्या माध्यमातून शिकवणी केंद्रांच्या अशा अनेक ‘सुरस’ कथा समोर येत आहेत.
पुण्यातही महिनाभरापूर्वी एका शिकवणी केंद्राच्या विद्यार्थिनी वसतिगृहाला आग लागली होती. त्यात तेथील व्यवस्थापकाला जीव गमवावा लागला होता. तेव्हा अग्निशमन दलाने सर्व मुलींना बाहेर काढून वाचवले. या घटनेनंतर पुण्यातही अग्निसुरक्षेचे लेखापरीक्षण वगैरे विषय चर्चिले गेलेच. एकेका खोलीत तीन-तीन खणांचे मनोरे केलेल्या खाटा लावून विद्यार्थ्यांच्या राहण्याची कशी ‘सोय’ केली जाते, हे ‘उघड’ सत्य त्या वेळी पुन्हा ‘प्रकाशा’त आले होते. यंत्रणांची निष्क्रियता आणि नाकर्तेपणा खचितच निषेधार्ह, पण या सगळ्यात दुर्लक्षित राहतो आहे तो विद्यार्थी.
दिल्लीतील घटनेत जीव गमावलेले तिघे विद्यार्थी उत्तर प्रदेश, तेलंगण आणि केरळ या राज्यांतून प्रशासकीय सेवांतील नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राजधानीत आलेले होते. नोकरीतील शाश्वतता आणि आयुष्यातील स्वस्थता, हेच सरकारी नोकऱ्यांच्या आकर्षणाचे प्रमुख कारण आजही आहे. पोलीस भरतीसाठी होणारी गर्दी आणि त्यातील उच्चशिक्षितांची वाढती संख्याही हेच दर्शवते. त्यासाठीच्या तयारीच्या निमित्ताने शिकवण्यांचे पेव फुटले आहे. प्रसंगी कर्ज काढून गावोगावचे पालक पाल्यांना शहरांत पाठवतात. स्पर्धा इतकी तीव्र की, यशाची शिडी मोजक्यांनाच चढायला मिळते. बाकीचे उमेदवार परीक्षेचे पात्रता वय उलटून गेले, की आहे ते पदरात पाडून त्यात समाधान मानतात. त्यातही दिल्लीसारख्या घटनेत पाहायला मिळणारी नियतीची दुर्गती अशी, की ज्या यंत्रणेला हाकणारा अधिकारी होण्याची मनीषा बाळगून ही मुले शहरात आली, त्याच यंत्रणेच्या नाकर्तेपणाचे ते बळी ठरले. एकूण परवड विद्यार्थ्यांचीच. चांगल्या पर्यायी रोजगारांची कमतरता कनिष्ठ मध्यमवर्ग आणि गरिबांसाठी उत्थानाचे मार्गच बंद करते, ही यामागची वस्तुस्थिती. ती स्वीकारली जाणार का, हा प्रश्न महत्त्वाचा- कारण केंद्रीय श्रममंत्र्यांचा दावा संसदेत असे सांगतो की, देशात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झालेली असून, बेरोजगारीचे प्रमाण लवकरच तीन टक्क्यांपेक्षा कमी होईल. ‘नोकऱ्या जाण्याची चिंता नको आणि नोकऱ्यांची कमतरताही नाही,’ असे त्यांचे म्हणणे. ‘कुठे असतात या नोकऱ्या,’ याचेही एकदा मार्गदर्शन मिळाले, तर बरे! तोवर, शिकवणी वर्गांनी ज्ञानार्जनाची आस भागविण्याच्या वगैरे उदात्त हेतूने उघडलेल्या तळघरातील अनधिकृत वाचनालयांच्या ‘व्यवहारचतुर पिपासे’त किती विद्यार्थी बुडणार, हे हताशपणे बघत राहायचे.