गिरीश कुबेर

त्यानंतर मात्र आपल्या अंगावरची तटस्थतेची झूल टेलरनं भिरकावली.. तिच्या गाण्यांचाही सूर अर्थातच बदललाय. महत्त्वाचं असतं ते अशा टेलर स्विफ्टांचं अखंड निपजणं..

arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Maruti Suzuki Recalls Over 16000 Cars in India
मारुतीच्या बलेनोसह फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ कारमध्ये आढळला दोष; १६ हजार कार माघारी बोलविल्या, ‘हे’ आहे कारण…
jalna, lok sabha election 2024, Congress
जालन्यात काँग्रेसचा सावध पवित्रा

एक अमेरिकी पत्रकार मित्र बऱ्याच काळानं भेटला. गप्पा अपेक्षेपेक्षा लवकर राजकारणाकडे वळल्या. त्याच्याही देशात निवडणुका होत्या आणि आपल्याही. त्याला छेडलं. म्हटलं तुमचंही आमच्यासारखंच तसं. ट्रम्पतात्या पुन्हा येणार. त्याला काही ते तितकं पटलं नाही. त्याचं म्हणणं तुम्हाला इथे बसून तसं वाटतंय.. पण प्रत्यक्ष चित्र काही एकतर्फी नाही.. कडवी लढत होईल. इत्यादी इत्यादी. त्याचं एक विधान एखाद्या सूत्रासारखं होतं. बायडेनबाबांचं नक्की काय बिनसतंय, या प्रश्नावरचं त्याचं हे विधान.

‘‘इकडे भारताचं बरं चाललेलं नसताना बहुसंख्यांना आपलं उत्तम चाललंय असं वाटतंय आणि अमेरिकेचं उत्तम चाललेलं असताना बहुसंख्यांना मात्र आपलं काही खरं नाही, असं वाटतंय.’’ हा त्याचा निष्कर्ष. पुढे तो म्हणाला : तुम्हाला असं वाटायला लावण्यात तुमच्या सत्ताधीशांचं यश आणि अमेरिकनांना जे वाटतंय ते आमच्या सत्ताधीशांचं अपयश.

पण कौल अंतिमत: बायडेन यांच्या बाजूनं का लागेल, याची अनेक कारणं तो देत गेला. त्यातलं एक नाव होतं टेलर स्विफ्ट. ते ऐकून मी उडालोच.

‘ती गायिका?’ या माझ्या प्रश्नात ती करून करून काय करणार.. असा एक सुप्त तुच्छ सूर होता. अलीकडेच तिला ग्रॅमी वगैरे मिळालेलं. तिची गाणी तशी काही माहिती नव्हती. आमची पिढी ‘बॉनी एम’, ‘अब्बा’वर पोसलेली. त्यांच्या ‘रा रा रास्पुतिन’ किंवा ‘बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन’ या गाण्यांनी त्या काळात वेड लावलेलं. अजूनही ते गेलेलं नाही. या गाण्यातली राजकारणाची धार तेव्हाही घायाळ करून गेली होती. नंतर केवळ मनोरंजनीय संगीताचा काळ आला. त्यामुळेही असेल. पण पाश्चात्त्य संगीत वाटेत मागेच पडलं. त्यामुळे टेलर स्विफ्ट ऐकली असण्याची काही शक्यताच नव्हती. आणि अलीकडे त्यांचं संगीत ऐकायचं की ‘पाहायचं’ हेही कधी कधी कळत नाही. त्या अर्थाने ही टेलर स्विफ्ट ऐकलेली आणि पाहिलेलीही नव्हती. तिच्या परदेश दौऱ्याच्या बातम्या वाचलेल्या. तिच्या जलशाला जमलेल्या गर्दीचा सामुदायिक नाद रिश्टर स्केलवर मोजला गेला इतका प्रचंड होता वगैरे. ही जुजबी माहिती वगळता फारसं काही तसं माहीत नव्हतं. आणि हा तर म्हणत होता अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल बदलू शकेल इतकी ताकद तिच्यात आहे, असं. तेव्हापासून तिच्याविषयी मिळेल ते वाचू लागलो. लक्षात आलं.. खरंय तो म्हणत होता ते.

आज केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण पाश्चात्त्य देशांत टेलर स्विफ्ट म्हणजे जणू एक पंथ-पीठ (कल्ट) आहे की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. लाखालाखांनी तिचे केवळ चाहते नाहीत; तर अनुयायी आहेत. ती काय म्हणते, तिची मतं काय, ती काय सांगते.. हे ऐकायला आणि त्याचं अनुकरण करायला तरुण-तरुणी अधीर असतात. खरं तर कोणत्याही कलाकाराप्रमाणे तिचीही सुरुवात राजकारणापासनं चार हात दूरवर असताना झाली. आपल्याकडे कलाकार म्हणवणारे ‘‘मला काही ब्वा ते राजकारण-बिजकारण कळत नाही’’, असं अभिमानानं मिरवतात. खरं तर या इतकं लुच्चंलबाड विधान दुसरं नसेल. पण तरीही ते गोड मानून घेतलं जातं. टेलर सुरुवातीच्या काळात असं काही म्हणाली होती किंवा काय ते माहीत नाही. पण सुरुवातीची काही वर्ष ती राजकारणापासनं दूर होती, इतकं मात्र खरं. मग असं काय झालं तिनं राजकारणसंन्यासाचा त्याग केला?

डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड. ट्रम्प यांची कमालीची प्रतिगामी, मागास मतं ऐकली, त्यांचे स्त्रियांविषयीचे हीन उद्गार ऐकले आणि टेलर उघड उघड ट्रम्पविरोधी भूमिका घेऊ लागली. सगळय़ात पहिल्यांदा तिनं उघड विरोध केला गौरवर्णीयांच्या मक्तेदारीला. स्वत: गौरवर्णीय असूनही टेलरनं ‘व्हाइट सुप्रीमसी’ला खणखणीतपणे झोडपायला सुरुवात केली. मग समिलगी, परालिंगी अशा ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या वतीनं टेलर उभी राहिली. गेल्या वर्षी अमेरिकेत गर्भपाताच्या हक्कांचा न्यायालयीन वाद खूप गाजला. त्या वेळी टेलर महिलांच्या हक्कांच्या बाजूनं उभी राहिली. हे सगळे तसे कडेकडेचे मुद्दे. पण नंतर ती विविध स्थानिक निवडणुकांत उदारमतवादी डेमॉक्रॅट्सच्या पारडय़ात आपलं वजन टाकू लागली. तिची ही राजकीय भूमिका डोळय़ावर येऊ लागली.

आणि मग साक्षात ट्रम्प हेच तिच्या विरोधात गरजले. टेलर ही काही तितकी चांगली कलाकार नाही.. असं त्यांना सांगावं लागलं.

 मग मात्र समाजमाध्यमातनं ट्रम्प यांच्या पूर्वीच्या विधानांची ध्वनिचित्रमुद्रणं झळकू लागली. पूर्वीच्या म्हणजे २०१२ ते २०१६ या कालखंडातल्या. त्याही वेळी टेलर लोकप्रिय होती. त्यामुळे २०१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत पत्रकारांनी तिचं राजकीय मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तिनं तो यशस्वी होऊ दिला नाही. ‘‘राजकीय भूमिका माझी माझ्याजवळ’’, असं तिचं विधान. त्या वेळी बोटचेपी म्हणून ती अनेकांच्या टीकेची धनी झाली. आणि त्याचमुळे ट्रम्प हे तिचे गोडवे गाऊ लागले. टेलर हिच्यासारखी गायिका नाही, असं त्यांना वाटू लागलं. ट्रम्प समर्थक तिला चर्चचं उद्घाटन किंवा तत्सम काही धार्मिकबिर्मिक कार्यक्रमांना बोलवू लागले. टेलर कधी त्यात सहभागी झाली नाही. पण २०१६ साली अध्यक्षपदी निवडून आल्यावर ट्रम्प यांचे खरे रंग दिसू लागले आणि त्यानंतर मात्र आपल्या अंगावरची तटस्थतेची झूल टेलरनं भिरकावली. नंतर ती डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देऊ लागली. या काळात तिची लोकप्रियता अविश्वसनीय अशा वेगानं वाढत राहिली.

त्यातनं एक पंथच जन्माला आला. ‘स्विफ्टीज’ म्हणतात त्या पंथाच्या सदस्यांना. म्हणजे टेलर स्विफ्टचे पाठीराखे. चाहते. जगभरात ही संख्या कोटीत आहे. टेलर गाणी स्वत: लिहिते. वयाच्या १४ वी वर्षी तिचं पहिलं गीतलेखन झालं. आज वीस वर्षांनी तिच्या गाण्यांचा सूर अर्थातच बदललाय. ‘मलमली तारुण्य माझे तु पहाटे पांघरावे’ लिहिणाऱ्या भटांना ‘उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ असं लिहावंसं वाटतं तसंच हे. हल्ली टेलरची गाणी सरळ सरळ राजकीय असतात. आणि तरीही ती प्रसृत झाल्या झाल्या १० कोटी वा अधिक जण पाहतात/ ऐकतात/ डाऊनलोड करतात. ‘मिस अमेरिकाना’, ‘अँटी हिरो’.. वगैरे लोकप्रिय गाणी उघड राजकीय आहेत.

म्हणूनच २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना ‘‘बायडेन यांना टेलर पाठिंबा देणार नाही’’, अशी ‘आशा’ व्यक्त करावी लागते, तिच्यावर ‘व्हाइट हाऊस’ची कठपुतळी, ‘सीआयए’ची हस्तक वगैरे आरोप करावे लागतात. अमेरिकेतल्या अनेक राज्यांना ‘स्विफ्ट टॅक्स’, ‘स्विफ्ट बिल’ अशा नावाचे मसुदे आणावे लागतात. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’पासून ते ‘द इकॉनॉमिस्ट’ ते ‘फायनान्शियल टाइम्स’.. इतकंच काय पण ‘फोर्ब्स’सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांना टेलरच्या भूमिकेची चर्चा करावी लागते. या सगळय़ा चर्चात एक सूर समान आहे.

सगळे म्हणतात बायडेन जिंकले(च) तर त्यात टेलर स्विफ्टचा वाटा लक्षणीय असेल. आताच्या ताज्या मध्यावधी पाहणीनुसार बायडेन आणि ट्रम्प यांच्यापेक्षाही अधिक जनाधार टेलर स्विफ्ट हिला आहे. तो जर अधिकृतपणे बायडेन यांच्याकडे वळला तर..

..तर काय होईल ते दिसेलच. पण नंतर दोन गोष्टी पाहाव्या लागतील. बायडेनबाबा अध्यक्षपदी आलेच तर टेलर स्विफ्टला ‘पद्म’ किंवा ‘अमेरिकारत्न’ वगैरे काही मिळणार का आणि तसं न होता ट्रम्पतात्याच सत्तेवर आले तर टेलरवर आयकर वगैरे केंद्रीय खात्याच्या धाडी पडणार का..? काहीही होवो. जोपर्यंत अशा टेलरसारख्यांना सलामत राखणारा समाज आहे तोपर्यंत पचास ट्रम्प आले तरी काही बिघडत नाही. महत्त्वाचं असतं ते अशा टेलर स्विफ्टांचं अखंड निपजणं; अन्यथा..

 girish.kuber@expressindia.com