विविध भाषिक, सांस्कृतिक, वैचारिक पार्श्वभूमीच्या पाश्चात्त्य विचारवंतांमधील समृद्ध वैचारिक देवाणघेवाण आधुनिकतेचं वैशिष्ट्य समजलं जातं. त्यामुळे रनेसॉन्सपासून पाश्चात्त्य जगात पारंपरिक बंदिस्त जगाला प्रश्नांकित करणारं कॉस्मोपॉलिटन जग अस्तित्वात आलं; ज्याचा उल्लेख ‘रिपब्लिक ऑफ लेटर्स’ म्हणून केला जातो. रिपब्लिक ऑफ लेटर्स म्हणजे बहुविध भाषा, सामाजिक रूढी/परंपरा, राज्यपद्धतींमध्ये खंडित पाश्चात्त्य जगाला बौद्धिक पातळीवर जोडणारं लेखक, विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत लोकांचं ‘वैश्विक गणराज्य’. त्यात आधुनिकतेच्या प्रक्रियेत प्राचीन ज्ञान परंपरेचा प्रकाश, नवीन जगाचा शोध, इतर संस्कृतींशी संपर्क, या ‘इतरत्व’ सूचित करणाऱ्या घडामोडींमुळे पाश्चात्त्य मनुष्याच्या स्व-भानात मूलगामी बदल झाला. त्यामुळे स्वाभाविकपणे रिपब्लिक ऑफ लेटर्सच्या सदस्यांचं देशीय आणि वैश्विक असं दुहेरी चरित्र निर्माण झालं. त्यांच्या इटालियन, फ्रेंच, जर्मन अशा स्थलकाल सापेक्ष देशीय ओळखींसोबत वैश्विक परिमाणाचा वेध आणि शोध घेणारी ओळख निर्माण झाली.
सतराव्या शतकात रिपब्लिक ऑफ लेटर्स या वैश्विक अवकाशाला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त होऊन त्या अनुषंगानं आधुनिक मानवाची संकल्पना अस्तित्वात आली, ज्याची तात्त्विक पायाभरणी देकार्तनं केली. खरं तर देकार्तनं व्याख्यांकित केलेला बुद्धिवादी, अमूर्त आणि अनैतिहासिक माणूस ( res cogitans) हा ऐतिहासिक जगाला आणि त्यातील मनुष्याला ( res extensa) अपेक्षित आकार आणि दिशा देता येईल असा कच्चा माल समजतो, जेणेकरून ‘वैश्विक रिपब्लिक ऑफ लेटर्स’ अस्तित्वात येईल. पुढे अठराव्या शतकात रिपब्लिक ऑफ लेटर्स फक्त मोजक्या लोकांचं गणराज्य न राहता त्याच्या सार्वत्रिकीकरणाच्या प्रक्रियेला गती प्राप्त होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या आधुनिक मूल्यांचा पुरस्कार करणारी फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे समग्र समाजाला वैश्विक रिपब्लिक ऑफ लेटर्सचा दर्जा प्रदान करणारी ऐतिहासिक कृती समजली जाते. पण या क्रांतिकारक क्षणानंतर मात्र माइंड आणि मॅटर या कार्टेशियन द्वैताचं प्रभावी हत्यार म्हणून भांडवलवादी आणि वसाहतवादी शक्ती करतात. आधुनिक मानवाला व्याख्यांकित करणारं कार्टेशियन ‘ res cogitans ’ हे तत्त्व भांडवलवादी बुर्ज्वा या सत्तारूढ वर्गाला लागू करून ‘ res extensa ’ अर्थात मॅटर या संकल्पनेचा ब्लॅक होलसारखा वापर करून त्यात भौतिक जग, वनसृष्टी, प्राणीसृष्टी आणि पाश्चात्त्येतर समाजांनाही लोटलं जातं. परिणामी एकोणिसाव्या शतकात कार्टेशियन प्रकल्प पारंपरिक जगाचा शेवट करण्यात यशस्वी होतो. मात्र त्याजागी वांच्छित वैश्विक रिपब्लिक ऑफ लेटर्स अस्तित्वात येण्याऐवजी औद्याोगिक क्रांती, भांडवलवाद, वसाहतवाद, आधुनिकीकरण, बकाल शहरीकरण आणि माणसांना देशोधडीला लावणाऱ्या स्थलांतराची भेट देतो.
एका बाजूला, आधुनिक कार्टेशियन मनुष्याला जुन्या घरात गुदमरायला होत असल्याने त्यानं ते नष्ट केलं. पण त्याजागी रिपब्लिक ऑफ लेटर्स या वैश्विक मुक्तिदायी घराची निर्मिती न करता तो बेघर झाला अशी परिस्थिती निर्माण झाली. हाना आरेंट म्हणते की आधुनिक मनुष्याच्या बेघरपणाची मुळं कार्टेशियन प्रकल्पात आहेत. रिपब्लिक ऑफ लेटर्स या संकल्पनेची वाटचाल कार्टेशियन मानवतावादाशी संबंधित असल्याने प्रस्तुत लेखात कार्टेशियन द्वैतवाद आणि त्यातल्या ‘आधुनिक मनुष्या’च्या संकल्पनेचा परामर्श घेताना रिपब्लिक ऑफ लेटर्सचा शेवट अधोरेखित केला जाईल.
कार्टेशियनवाद
देकार्तला आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक समजलं जात असलं तरी कार्टेशियनवाद तत्कालीन रिपब्लिक ऑफ लेटर्सच्या वैज्ञानिक वातावरणात आकाराला आला आहे. त्यामुळे, आरेंट देकार्तच्या ‘रॅडिकल डाऊट’ला गॅलिलिओच्या खगोलशास्त्रीय शोधाचं तार्किक अपत्य समजते. पृथ्वी स्थितीशील आहे आणि तिच्याभोवती सूर्य फिरतो, या धर्ममान्य आणि सर्वमान्य इंद्रियजन्य धारणेला गॅलिलिओ चूक ठरवतो. गॅलिलिओच्या वैज्ञानिक शोधामुळे पारंपरिक ज्ञानासोबतच इंद्रियजन्य ज्ञानाला रॅडिकल डाऊटच्या कसोटीवर तपासून पाहणं देकार्तला अनिवार्य वाटतं. त्यामुळे देकार्त ‘ School of suspicion ’ मध्ये पूर्णत: निष्णात असलेला पहिला विचारवंत ठरतो.
पण खरं तर, गॅलिलिओ आणि देकार्त हे समकालीन. त्याच दरम्यान देकार्त ‘ I believe therefore I am ’ या चर्चच्या शिकवणुकीच्या विरोधात जाऊन ‘ I doubt therefore I am’ या क्रांतिकारक विज्ञानवादी तत्त्वाचा पुरस्कार करतो. त्यामुळे १६३३ मध्ये गॅलिलिओवर कॅथोलिक चर्चकडून खटला भरून शिक्षा ठोठावण्यात आली तेव्हा देकार्तच्या मनातसुद्धा समग्र अप्रकाशित लिखाण जाळण्याचा विचार आला होता!
कार्टेशियनवादाला ‘आधुनिक बुद्धिवाद’ असंही म्हणतात. बुद्धिवाद म्हणजे मानवी बुद्धीत सत्यशोधाची आणि त्याद्वारे मानवी मुक्तीची क्षमता आहे, असं मानणारा सिद्धांत. त्या दृष्टीने बुद्धिवाद श्रद्धेला ज्ञानाचं अंतिम साधन मानणाऱ्या श्रद्धावादाला आणि ज्ञानाची शक्यता नाकारणाऱ्या अज्ञेयवादाला छेद देणारा आहे. सोबतच कार्टेशियन बुद्धिवाद अनुभववादाच्या मर्यादासुद्धा अधोरेखित करतो. इथं नमूद करणं आवश्यक आहे की आत्मचिकित्सा ( autocritique) हे आधुनिक बुद्धिवादाचं अंगभूत वैशिष्ट्य असल्यामुळेच, जसजशा कार्टेशियन बुद्धिवादाच्या मर्यादा स्पष्ट होत गेल्या तसतसं आधुनिक बुद्धिवादाचं स्वरूप बदलत गेलं आहे.
कार्टेशियन मानव
मनुष्याची कार्टेशियन संकल्पना हा आधुनिक बुद्धिवादाच्या पातळीवर मनुष्याला व्याख्यांकित करण्याचा पहिला सूत्रबद्ध प्रयत्न आहे. याआधी आपण पाहिलं की त्याच्या ज्ञानमीमांसेच्या पहिल्या टप्प्यात देकार्त माइंड आणि मॅटर यांत द्वैत निर्माण करतो. देकार्तनुसार मनुष्य दोन तत्त्वांनी बनलेला आहे : ‘ res cogitans ’ अर्थात बौद्धिक तत्त्व आणि ‘ res extensa ’ अर्थात भौतिक तत्त्व. देकार्त त्याच्या ज्ञानमीमांसेच्या दुसऱ्या टप्प्यात मनुष्य म्हणजे स्वत:च्या जाणिवेचा ज्ञाता, स्वातंत्र्याचा धारक आणि अस्तित्वाचा कर्ता, या ‘फिलॉसफी ऑफ सब्जेक्ट’पर्यंत पोहोचला. ‘ Res cogitans’ या कार्टेशियन संकल्पेत जाणीव, विचारशीलता, इच्छाशक्ती, जिज्ञासा अशा बौद्धिक क्षमतांचा अंतर्भाव होतो. कार्टेशियन ‘ res cogitans’ ही संकल्पना स्वयंभू, वैश्विक अनैतिहासिक बौद्धिक तत्त्वांचा अर्थात कोजितोचा निर्देश करते. देकार्तच्या मांडणीत मनुष्याचा कोजितो त्याच्या अस्तित्वाचा एकमेव आधार आणि पुरावा असल्याने मनुष्याची ओळख त्याच्या संशयास्पद ‘ res extensa’ अर्थात भौतिक तत्त्वामुळे नसून खात्रीच्या बौद्धिक तत्त्वामुळे आहे. मनुष्य म्हणजे त्याची जाणीव, हे आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं मध्यवर्ती सूत्र देकार्तनं प्रस्थापित केल्यामुळे आधुनिकता ही मनुष्याच्या जाणिवेचं तत्त्वज्ञान (philosophy of consciousness) ठरते.
दुसऱ्या बाजूला, ‘ res extensa’ अर्थात भौतिक तत्त्वाचं अनुभवजन्य रूप फसवं सिद्ध झाल्यावर त्याचं खरं स्वरूप गणिती आणि भौमितिक सूत्रांच्या मदतीनं स्पष्ट होतं, अशी मांडणी देकार्त करतो. परिणामी, ‘ extensa’ हा गुणधर्म असणारं भौतिक जग आणि त्यातील मनुष्याचं शरीर वैज्ञानिक प्रयोगांसाठी कच्चा माल ठरतात. देकार्तचा बुद्धिवाद स्थितिशील असल्यानं तो भौतिक जगाचा फक्त यांत्रिक ( mechanistic) पातळीवर उलगडा करतो. त्याच्या मांडणीत मानवेतर प्राणी फक्त आत्माहीन आणि भावनाशून्य यंत्र ( machina automata) आहेत.
हाना आरेंटनुसार देकार्तनं ज्ञानात्मक आर्केमिडियन बिंदू मनुष्याच्या कोजितोत प्रस्थापित करून ज्ञाता आणि ज्ञेय वस्तूमध्ये कृत्रिम फारकत घडवून तटस्थ विश्लेषण आणि आकलनाची शक्यता निर्माण केली आहे. पण हीच कार्टेशियन ज्ञानमीमांसा मनुष्याला भौतिक तत्त्वापासून मुक्त करून त्याला भौतिक जगाचा ज्ञाता, कर्ता, स्वामी बनायला प्रवृत्त करते. थोडक्यात, मनुष्याची खरी ओळख म्हणजे फक्त त्याच्यातल्या ‘ res cogitans ’ अशी मांडणी करून देकार्तनं मनुष्य आणि सभोवतालचं भौतिक जग यात अभेद्या दरी निर्माण केली. आधुनिक मनुष्याच्या ‘बेघरपणा’तून निर्माण होणाऱ्या परात्मतेची मुळं उपरोक्त कार्टेशियन फारकतीत आहेत असा निष्कर्ष आरेंट काढते.
मिशेल फुकोची टीका
मिशेल फुकोनुसार कार्टेशियन कोजितो ईश्वराचा जुळा भाऊ आहे. ‘ Res cogitans ’ ही संकल्पना विशद करताना देकार्त लिहतो की माझ्यातील अमर्याद इच्छाशक्ती कशाचीही गुलाम नाही, याविषयी मला प्रखर जाणीव आहे. माझ्यातील स्वतंत्र इच्छाशक्ती ( free wi’’) इतकी प्रबळ आहे की तिच्यापेक्षा दुसरी कुठलीही कल्पना मला मोठी आणि खरी वाटत नाही. थोडक्यात, स्वातंत्र्याचा धारक आणि स्वत:च्या जाणिवेचा ज्ञाता या नात्याने कार्टेशियन मनुष्य म्हणजे ईश्वराची प्रतिकृती ठरतो. फुकोच्या विश्लेषणानुसार आधुनिक मनुष्याची कार्टेशियन संकल्पना देवशास्त्राच्या ( Theology) धर्तीवर करून एका प्रकारे मध्ययुगाच्या शेवटी कार्टेशियन मानवतावादाच्या स्वरूपात ईश्वराला जिवंत ठेवण्यात आलं. थोडक्यात, आधुनिक ‘स्व’ची अद्वितीय, वैश्विक आणि अनैतिहासिक कर्ता अशी संकल्पना म्हणजे आधुनिक माणसानं केलेला ईश्वरी गुणधर्मांचा दावा ठरतो.
पण एकोणिसाव्या शतकात फ्रेडरिक नित्श्चेनं ईश्वराच्या मृत्यूविषयी केलेली घोषणा वास्तवात ईश्वराची प्रतिकृती ठरलेल्या कार्टेशियन माणसाच्या मृत्यूची घोषणा होती, असा निष्कर्ष फुको काढतो. ईश्वरी गुणधर्म अंगीकारलेला आधुनिक मानव हा जगाचा मालक म्हणून एकोणिसाव्या शतकापर्यंत अधिपत्य प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला. त्यामुळे आधुनिकतेची कहाणी म्हणजे कार्टेशियन मानवतावादाच्या उदय, अधिपत्य आणि ऱ्हासाचा इतिहास. फुको लिहितो की १९व्या शतकानंतर मात्र मनुष्य तत्त्वज्ञानातून ज्ञानाची वस्तू म्हणून नव्हे तर ‘निखळ स्वातंत्र्याचा धारक आणि अस्तित्वाचा कर्ता’ म्हणून गायब होऊन ऐतिहासिक संदर्भांच्या दाट जाळ्यात जन्माला आलेली जाणीव- नेणिवांच्या द्वंद्वातली मर्यादित वस्तू म्हणून उरतो.