ज्या कादंबरीबद्दल भरपूर चर्चा तर होते पण टोकाचं दुमतही दिसतं- किंवा निरनिराळी मतं दिसतात, ती कादंबरी न वाचता तशीच सोडून देता येत नाही. हे मराठीत अखेरचं घडलं नेमाडेंच्या ‘हिंदू’बद्दल. त्यानंतर काही प्रमाणात, प्रवीण दशरथ बांदेकरांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’बद्दल. हेच पाश्चात्त्य जगात चिमामान्डा एन्गोझी अडिची हिच्या ‘ड्रीम काउंट’ या कादंबरीबद्दल घडलं. ‘ही कादंबरी अपयशी आहे. तिच्यात कलात्मकता अजिबात नाही’ असा सरळ ठपका ‘द इकॉनॉमिस्ट’या साप्ताहिकानं ठेवला; तर ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ब्रिटनमधल्या ‘द गार्डियन’च्या समीक्षकांनी या कादंबरीची वाहवा केली. चिमामान्डा एन्गोझी अडिची ही मूळची नायजेरियाची, अमेरिकेत स्थलांतरित झालेली एकविसाव्या शतकातली साहित्यिक. आधीच्या तिन्ही कादंबऱ्यांचं भरपूर कौतुक होऊनही, त्यांना पुरस्कार वगैरे मिळूनही २०१३ पासून तिची नवी कादंबरी आली नव्हती. त्यामुळे अनेकांनी तिचं स्वागत केलं. पण ‘बेस्टसेलर’ याद्यांतूनही ही कादंबरी ओसरत गेली तेव्हा प्रश्न पडला : फक्त आफ्रिकेशी, नायजेरियाशी संबंध असलेले लोकच अशा कादंबऱ्या वाचतात की काय? या नायजेरियन लेखिकेला आजवर इतकी प्रसिद्धी मिळाली ती कशामुळे? ती आता ‘सेलेब्रिटी’ आहे (आपले इनेगिने बॉलीवूडतारे ज्या ‘मेट गाला’ला गेल्याची चर्चा झाली, तिथं ही कादंबरीकारही निमंत्रित होती!) – पण तिचा तो सेलेब्रिटीपणा आणि लेखकपणा अशी कप्पेबंदी नको, ही अपेक्षा तिचं लिखाण पूर्ण करतं का? ‘आफ्रिकी हॉटेल-कामगार महिलेशी अतिप्रसंग केल्याचा आरोप ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’चे तेव्हाचे प्रमुख डॉमिनिक स्ट्रॉस-कान यांच्यावर करण्यात आला असूनही अमेरिकी न्यायालयात हा आरोप दाखलच होऊ शकला नाही’ या २०११ मधल्या घटनाक्रमाचा आधार या कादंबरीला असल्याच्या बातम्यांवरच विसंबून ही कादंबरी वाचावी का?

चिआमाका ऊर्फ चिआ ही कादंबरीच्या बहुतांश भागाची निवेदक, तिची आतेबहीण किंवा मामेबहीण झिकोरा, नायजेरियात बँकिंग क्षेत्रातल्या उच्चपदांपर्यंत पोहोचलेलं करिअर अर्धवट सोडून आलेली चिआची मैत्रीण ओमेलोगो, चिआकडे घरकाम करणारी

कादिआटू… यापैकी तिघी मूळच्या नायजेरियातल्या- एकटी कादिआटू जरा पलीकडची, पण शेजारच्याच आफ्रिकी देशातली. या चौघीही अमेरिकेत पहिल्या पिढीच्या स्थलांतरित. आता चौघीही पस्तिशीच्या. तिघी बऱ्यापैकी सुखवस्तू कुटुंबांतल्या आहेत, कादिआटू हॉटेलातलं सफाईकाम सांभाळून चिआकडे घरकाम करणारी. अतिप्रसंग होतो तो कादिआटूवरच, पण त्याबद्दल वाचकाला कळतं निम्मी कादंबरी उलटल्यावर! म्हणजे मुख्य गोष्ट त्या अतिप्रसंगाची नाही.

मुख्य गोष्ट अशी काही जर असलीच तर, ‘अमेरिकेत मध्यमवयीन, एकटी स्त्री म्हणून जगणं’ याबद्दलची आहे असं ढोबळपणे म्हणता येईल. या जगण्याच्या चार तऱ्हा. चिआमाका ऊर्फ ‘चिआ’ ही एक भाऊ लंडनला, दुसरा लागोसमध्ये, चुलतबहीण इथेच अमेरिकेत, आईवडील गावच्या इस्टेटीतल्या प्रशस्त घरात… अशा श्रीमंत घरातली. त्यामुळे कशात काही नसताना ती ‘प्रवासवर्णनकार’ म्हणून नाव कमावू पाहातेय, त्यासाठी फिरते/ रेस्तराँमध्ये खाते वगैरे. झिकोराचं कुटुंबही चिआच्या तोलामोलाचंच. याबाहेर ओमेलोगो, तिनं स्वत:च्या हिकमतीवर सगळं मिळवलंय. थोडक्यात, तिघींकडेही समाधानी असण्याइतकी भौतिक सामग्री आहे, तिघीही दिसायला देखण्या असल्याचा उल्लेख येतो, त्यांना पुरुषांची साथही मिळते आहे. पण त्या समाधानी नाहीत. एकटं मजेत राहणं आणि दुसऱ्यासाठी जगणं या दोन टोकांपैकी आपल्याला काय हवंय, हे या तिघींनाही- त्यांच्या त्यांच्या परीनं- ठरवता येत नाही!

तिघीही पुरुषांकडून शरीरसुख मिळवण्याइतपत परिस्थितीत आहेत; पण पुरुषशरणतेच्या निरनिराळ्या पातळयांवर त्या आहेत. झिकोराला संसार थाटायचाय- मुलंबाळं हवीत- तरीही स्वत्व जपायचंय. तिला मिश्रवंशीय लग्न नकोय. ‘आफ्रिकन, शक्यतो नायजेरियन; जमैकन चालेलसा’ नवरा ती शोधते आहे. थोडीफार मुरड घालावी लागणारच म्हणून, बाहेरच्या जगात अगदी टापटीप राहणाऱ्या पण घर अस्ताव्यस्त, अस्वच्छ ठेवणाऱ्या एका पुरुषाच्या घरची भांडीही घासलीत तिनं- हा पुरुष जेव्हा ‘मुलं झाल्यावर सांभाळायला बाई वगैरे नाही ठेवायची. आईचंच लक्ष पाहिजे मुलांवर सर्वकाळ. मी काही कमी पडू देणार नाही’ असं म्हणू लागतो तेव्हा ती त्याची साथ सोडते. चाळिशी आली, आता मातृत्व यायलाच हवं, अशा स्थितीत तिला क्वामे भेटतो. त्याच्याकडल्या कौटुंबिक सोहळ्यांमध्ये सहभागी होणं, त्याची ‘आपण म्हातारपणी असं करू या…’ असं बोलण्याची कधीमधी येणारी उबळ ही जणू जन्मभरच्या साथीचा प्रस्तावच मानणं, त्याचे आवडते पदार्थ रांधणं, यानंतर ती ‘मी गोळ्या बंद करते’ असं त्याला सांगून गरोदर राहते, तेव्हा मात्र तो तिच्यापासून वेगळा होतो. तिचा नंबरही ‘ब्लॉक’ करतो. लग्न, मुलं यांसाठी देवभोळी झालेली झिकोरा अखेर मूल होऊ देण्याचं ठरवते. झिकोराची करारी नायजेरियन आई, तिचा मुलगा जन्मल्यावर काही तासांत त्याची सुंता करवून घेते. झिकोरा विरोध करते, भडकते, पण आईचीच आता साथ असणार हे जाणून गप्प होते.

ओमेलोगो नायजेरियातल्या एका बँकेत वरिष्ठपद मिळवण्यासाठी मुलाखत देते तेव्हा, मुलाखत घेणारे सगळे पुरुषच. शैक्षणिक पात्रता, अनुभव सगळंच भक्कम असल्यानं हिला ते पद मिळणारच, असं सूचित करताना त्यांच्यापैकी कुणी तरी ‘मागूनपुढून भक्कम उमेदवार आहात हो तुम्ही’ असं म्हणतो, त्यातला पुरुषीपणा नेमका ओळखून ओमेलोगोच, ‘हो, पण मागून जरा जास्तच- ना?’ म्हणत सरळ त्यांच्याकडे पाहते तर हे सगळे हसतात, खि:खि: करून. ‘माझी उत्तराधिकारी तूच’ असं म्हणणारा तिचा बॉस महाभ्रष्ट आहे, राजकीय लागेबांधे असलेल्या बड्या धेंडांना कर्ज- आणि कर्जमाफीसुद्धा- देताना कोणताही विचार केला जात नाही, हे तिला कळत असूनही ती व्यवस्थेचा भाग बनते… पण याच व्यवस्थेतून काही पैसा कसा वळवायचा आणि तो खरोखर पैशाची गरज असलेल्या कष्टाळू गोरगरीब नायजेरियन महिलांच्या हाती कसा पोहोचवायचा, याची योजनासुद्धा ती बिनबोभाट तडीला नेते! ‘उगाच सुखी असल्याचं नाटक नको करू’ असं एक आत्याबाई सुनावतात तेव्हा चाळिशीची ओमेलोगो अस्वस्थ होते आणि ‘पोर्नोग्राफी – ग्रहण व परिणाम- एक मानसशास्त्रीय सामाजिक अभ्यास’ अशा विचित्र विषयावर पीएच.डी.साठी अमेरिकेत दाखल होते! बॉसला ‘हवं ते’ अजिबात न देणारी, पण कुणा बँकेतला शाखाप्रमुख वगैरे सामान्य पुरुषांना स्वत:चा मूड असेल तरच ‘उपकृत’ करणारी ओमेलोगो, करोनाच्या काळात पुरुषांना बायकांबद्दलचे बेधडक सल्ले देणारी ‘कण्टेण्ट क्रिएटर’ होते.

त्या मानानं चिआ बरीच स्वप्नाळू, अव्यवहारी. स्वत:ला काय हवंय हे कळत नसल्यागत. तिला आकांक्षा आहेतच. पण करिअरबद्दल म्हणाल तर ‘ट्रॅव्हल रायटर’ म्हणून नाव कमावण्याआधी आफ्रिकेतल्या दु:खदैन्याबद्दल लिही- असा सल्ला तिला प्रकाशनसंस्थेकडून दिला जातो. तिच्या काळेपणावर बोट ठेवणारा आणि तिची श्रीमंती वगैरे काहीच न पाहणारा हा सल्ला! पुरुषांबद्दल म्हणाल तर, देखणी ‘तरीही’ बुद्धिमान स्त्री अनेक पुरुषांना हवीय, या अनेकानेक पुरुषांकडे चिआनं वेळोवेळी लक्षही पुरवलंय, त्यापैकी काहींना ‘हवं ते’ दिलंय. काहींशी उगाच तुटकपणे वागलो, असं तिला करोनाकाळातल्या एकटेपणी कधीमधी वाटतंय वगैरे. पण ‘मला खरोखर समजून घेणारं कुणी हवं’ ही तिची मूलभूत, अस्तित्वजन्य आकांक्षा मात्र कधीही पूर्ण न होणारी असल्याची जाणीव तिला पदोपदी होते आहे. ही जाणीव फक्त एकटीची नाही- ती सार्वत्रिकच आहे- याची समज चिआला (झिकोरा, ओमेलोगो आणि काडिआटू यांच्याही जगण्यातून) हळूहळू येत जाणं, हा झाला कादंबरीच्या चारपेडी कथासूत्राशी जुळणारा आणि अंतर्मूखतेची मागणी करणारा भाग.

दुसरा भाग बहिर्मुख. तो अमेरिकेतल्या नायजेरियन एकट्या महिलांच्या निमित्तानं, या ‘प्रगत’, ‘स्वातंत्र्यवादी’ वगैरे देशाकडे पुन्हा निरखून पाहणारा. इथल्या स्थलांतरितांचं आपल्या आपल्यातलं जग चिआला दिसतंय. त्यातून बाहेर पडण्याचा तिचा मार्ग म्हणजे निरनिराळ्या वंशांचे, देशांतले पुरुष! वांशिक वर्चस्ववादावर एकवेळ ‘चांगलं वागण्या’चं पांघरुण घालता येईल, पण लैंगिक वर्चस्ववादाचं काय करायचं, या प्रश्नापर्यंत ती वाचकाला नेते. त्यासाठी विविध पुरुषांशी कधी ना कधी जुळलेल्या तिच्या संबंधांचे दाखले देते. भिन्नलिंगी शारीरिक आकर्षणाचा तार्किक पुढला टप्पा भिन्नवंशीय आकर्षण हाच असावा, असा निष्कर्ष निघण्याइतपत हे सारे पुरुष ‘ओपन माइंडेड’ आहेत. पण यापैकी तिला सर्वांत बुद्धिमान वाटणारा, सर्वांत आवडलेला पुरुष मात्र तिच्या बुद्धीला कस्पटासमान लेखणारा आहे. चिआच्या ओळखीतल्या काहीजणी ‘बायकाबायकांची पार्टी’ करणाऱ्या आहेत. शारीरिक खुलेपणा आणि ‘हेच हवंय का आपल्याला’ याची रुखरुख, हे द्वंद्व तिथेसुद्धा- पुरुषांबरोबर काही करताना असतं तितकंच- आहे. या साऱ्याकडे चिआ साक्षीभावानं पाहते, म्हणून कादंबरी घडते.

‘चिआची घरकामगार बाई’ म्हणून झिकोरा आणि ओमेलोगो जिला ओळखतात, ती काडिआटू आता पंचतारांकित हॉटेलात नोकरीला लागली आहे. हाउसकीपिंगचं काम. पण इथं तिला तो गोरा वयस्कर, पण दांडगट उच्चपदस्थ घेरतो. तो तिला खाली बसवत असताना तिचा खांदा मोडतो, कपडे फाटतात. भेदरलेल्या कादिआटूची वैद्याकीय तपासणी- तिच्या चेहऱ्यावर, कपड्यावर पडलेल्या त्याच्या डागांची मोजणी, पोलीस तक्रार हे ‘काहीच नको- मला माझी नोकरी टिकवूद्या’ असं कादिआटूला मनोमन वाटतंय पण एक इतका उच्चपदस्थ पुरुष ‘असं काही’ करू शकतो हा धक्का कादिआटूचा एकटीचा नसून तो अख्ख्या जगाचाच आहे, यावर तिच्या भोवतालच्या साऱ्यांचंच ‘अमेरिकन मानवतावादी’ छापाचं एकमत दिसतंय. चिआ, ओमेलोगोसुद्धा याला अपवाद नाहीत.आफ्रिकी देशात असल्या प्रकाराची वाच्यता हॉटेलवाल्यांनीच केली नसती याच्या जाणिवेनं भारावल्यात जणू दोघीही! बरा भाग इतकाच की, तपासणी करणारी नर्स खरोखरच खूप चांगली होती, काडिआटूला कुठलाही न्यूनगंड येऊ नये याची काळजी अगदी सहजपणे घेत होती. ‘हीच ती बाई जिच्यावर इतक्या बड्या उच्चपदस्थानं…’ अशी तिची प्रसिद्धीही होतेच आहे. तिच्या सामाजिक पार्श्वभूमीचा माग काढत दोन अमेरिकी पत्रकार आफ्रिकेतल्या तिच्या गावापर्यंत पोहोचलेत. या काडिआटूला वयात येणारी मुलगी आहे- बिन्टा. तिच्या भवितव्यासाठीच तर ती अमेरिकेत आलीय. काडिआटूचा मित्र अहमदू (जो सध्या अमली पदार्थ वाहतुकीत पकडला गेल्यानं तुरुंगात आहे) यानं तिला इथं आश्रित म्हणून व्हिसा मिळवण्यासाठी खोटी ‘अत्याचार स्टोरी’ बनवून दिली होती. ‘अशा प्रकारे व्हिसा मिळवून ती आली, म्हणजे ती खोटारडीच आहे, असल्या व्यक्तीच्या आरोपावर कसा विश्वास ठेवणार,’ असा त्या उच्चपदस्थाच्या वकिलांचा युक्तिवाद चटकन मान्य होऊन, तो आरोपाविना सुटला आहे. हे सारं आता कादिआटू कसं झेलणार, याची चिंता खरं तर चिआ, ओमेलोगोलाच जास्त आहे, याची जाणीव वाचकाला ही कादंबरी देते.

महिलांच्या, एकंदर कृष्णवर्णीयांच्या, आफ्रिकन-अमेरिकनांच्या संघर्षाचे कोणतेही थेट दाखले न देता ही कादंबरी सामाजिक दुभंगांचं आजचं मोजमाप काढते. त्यासाठी चिआ, ओमेलोगो, झिकोरा आणि कादिआटू या जणू निरनिराळ्या मोजपट्ट्या आहेत. यापैकी पहिल्या दोघींना, समताधारित सामाजिक अभिसरण हा आपला मानवी हक्क असल्याची जाणीव आहे. अन्य दोघींना ती दिसत नाही. अस्तित्व निभावण्याची धमक झिकोरा आणि काडिआटूकडे असेल- आहेच; पण त्यासाठीच्या अनेक अटी त्यांना स्वीकाराव्या लागलेल्या आहेत. चिआ मुक्त जगू पाहते, श्रीमंतीमुळे तिला जे जमून जातं, पण अनेकदा, ‘आपण त्या वेळी अशा का वागलो’ यासारख्या प्रश्नांखेरीज तिच्याकडे काहीच उरत नाही. मालकिणीचा थाट आणि वैश्विक भगिनीभावाचं समाधान हे दोन्ही एकाच वेळी मिळवू पाहणाऱ्या ओमेलोगोला डिप्रेशनवर उपचार घ्यावे लागताहेत. पुरुषांना ओमेलोगो जे सल्ले देते ते मात्र चुरचुरीत आहेत. म्हणजे लेखिकेनं, जणू बॉलीवूड चित्रपटात ‘आयटम साँग’ असावं तशा प्रकारे हे ओमेलोगोचे सल्ले वाचकांपुढे ‘जसेच्या तसे’ ठेवले आहेत.

ही दुविधा किंवा गौरी देशपांडे यांचा शब्द उसना घ्यायचा तर, ‘मध्य लटपट’ हा या कादंबरीतून सातत्यानं वाचकाला जाणवत राहणारा भाग आहे. प्रत्येकीची/ प्रत्येकाची स्वप्नं असतात, उरतात. कुणाची किती उरली, हा तपशिलाचा भाग! बाकी, भारताचा उल्लेख फारतर एखाद्या पानावर असलेल्या या कादंबरीत ‘नॉलीवूड’ चित्रपटांचे, नायजेरियन खाद्यापदार्थांचे संदर्भ अनेकदा येत असूनही, भारतीय लेखक जसं लगेच युरो-अमेरिकी वाचकांसाठी प्रत्येक पदार्थाचं स्पष्टीकरण देतात, तसं चिमामान्डा एन्गोझी अडिची यांनी कधी केलेलं नाही. ‘आम्ही निराळे असूनही तुम्ही माझं पुस्तक वाचताय, तर घ्या समजून तुमचं तुम्ही’ असा दृष्टिकोन भारतीय लेखकांकडे दिसत नाही, तो इथं दिसतो.

अखेर या चौघी ‘चारचौघींसारख्या’ आहेत का, हा प्रश्न या मजकुराच्या शीर्षकामुळे काहींना पडेल. त्याच्या उत्तरासाठी, आपण या कादंबरीतल्या चारपैकी एका तरी पात्राच्या तगमगीमध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो का, हे आपापलं तपासून घ्यावं लागेल.

ड्रीम काउंट

लेखिका : चिमामान्डा एन्गोझी अडिची

प्रकाशक : फोर्थ इस्टेट

पृष्ठे : ४१६ ; किंमत : ५९९ रु.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

abhijit.tamhane@expressindia.com