राज्यातील उच्च माध्यमिक मंडळाच्या (नववी ते बारावी) १९८० च्या दशकापासूून ते २०१६ पर्यंतच्या मराठीच्या पुस्तकांची रूपरेषा पाहिली तर शेवटच्या दोन-तीन धड्यांमधून दलित साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जायची. २०१६ नंतर ‘बालभारती’ने देखील हे स्वरूप कायम ठेवले. भास्कर चंदनशिव यांची गाजलेली ‘लाल चिखल’ किंवा अण्णा भाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोनं’ या कथा, रुस्तुम अचलखांब किंवा प्र. ई. सोनकांबळे यांच्या आत्मकथनांतील मजकूर हा शहरी-निमशहरी तसेच गावांतील मुलांच्या संवेदना घडणीच्या कालावधीत उपयुक्त असल्याने त्यांचे नियोजन झाले. या इयत्तेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी त्यांच्या जाणीववकुबानुसार दलित साहित्य म्हणून त्याकडे बिलकुल पाहत नाहीत. समाजातील एका समूहाची आपल्याला माहिती नसलेल्या जगण्याची भूमी म्हणून त्यांना ती दिसू लागते. पुढे वाचक किंवा सुजाण नागरिक म्हणून त्यांची मशागत वगैरे होण्यासाठी मुख्य धारेतील लेखकांच्या गोष्टींबरोबर या करुणेने भरलेल्या साहित्याचा उपयोग भरपूर होतो. ‘द ब्लाफ्ट बुक ऑफ अॅण्टी-कास्ट सायन्स फिक्शन’ हे पुस्तक या गावच्या वेशी किंवा सीमेपलीकडचे जगणे मांडणाऱ्या देशी-विदेशी लेखकांच्या विज्ञानकथा कवेत घेणारे. उच्च माध्यमिक मंडळ किंवा बालभारतीच्या बुद्धी मशागत हेतूंना अधिक स्तरावर पुुढे नेणारे. अशा प्रकारच्या साहित्याने भरलेले हे एकमेव किंवा पहिलेच पुस्तक मानावे लागेल. अन् त्याची निर्मिती समूह यत्न (क्राऊड फंडिंगच्या) संकल्पनेतून झाली, ती गोष्टदेखील समजून घ्यावी अशीच.

‘ब्लाफ्ट पब्लिकेशन’ ही चेन्नई येथील ‘इंडिपेण्डण्ट’ प्रकाशन संस्था असली तरी त्याचे सूत्रधार राकेश खन्ना आणि रश्मी आर. डी. हे अमेरिकेत स्थायिक असणारे दाम्पत्य आहे. भारतीय, पाकिस्तानी आणि नायजेरियातील लगदा साहित्याचे (पल्प फिक्शन) इंग्रजी अनुवाद त्यांचे प्रकाशनगृह प्रकाशित करते. त्यांचा भारतात गाजलेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे तमिळ साहित्याचे दशकभरात प्रकाशित केलेले दोेन खंड. गेल्या वर्षी अखेरीस त्यांनी ‘ब्लाफ्ट अँथॉलॉजी ऑफ गुजराती पल्प फिक्शन’ हा आणखी एक इंग्रजी अनुवाद प्रकल्प पूर्ण केला आणि दक्षिणेतील इतर भाषांसह मराठीतील लगदा साहित्याचा अनुवाद त्यांच्या पुढील प्रकल्पांत समाविष्ट झालाय. लगदा साहित्य हे खरे तर जनसाहित्य आहे, अशा जाणिवेतून हे काम होते आहे. ‘गुजराती पल्प फिक्शन’नंतर हे दाम्पत्य आणि आर. टी. सॅम्युअल यांच्या संपादनाखाली ‘द ब्लाफ्ट बुक ऑफ अॅण्टी-कास्ट सायन्स फिक्शन’ साकारले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी या संपादकांनी समाजमाध्यमांतूून लेखकांना आवाहन केले. त्यानंतर नेमक्या हिशेबानेच लोकवर्गणीचे आवाहन करणाऱ्या ‘किकस्टार्टर’ या संकेतस्थळाची साथ समूह-निधी उभारणीसाठी घेतली. भारतीय साहित्यातील विविध भाषांतील दलित साहित्यातील विज्ञानकथांचा शोध सुरू केला. भारतीय भाषांपैकी मराठीतूनदेखील एका कथेची निवड करण्यात आली.

इतर कथा या तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती आणि बंगाली यांतील आहेत. काही या प्रकल्पासाठी प्रसिद्ध लेखकांनी दिलेल्या तर काही आवाहनानुसार पहिल्यांदाच लिहिल्या गेलेल्या कथा यात वाचता येतील. पुस्तकात चित्रकथादेखील साकारण्यात आल्या आहेत. या सगळ्या प्रकल्पातील अनुवादक, लेखक, चित्रकार आणि निर्मितीमधील सर्व घटकांना यथोचित मानधन देण्याकरिता सहा हजार डॉलर इतकी रक्कम उभी करणे आवश्यक होते. मात्र महिन्याभराच्या आत जवळजवळ २० हजार डॉलर इतकी रक्कम समूह यत्नातून साकारली. त्यामुळे हा ग्रंथ ब्रिटनच्या ‘ग्रॅण्टा’ मासिकाची निर्मितीमूल्ये असलेला बनूनही भारतीय वाचकांच्या आवाक्यातील किमतीत उपलब्ध करून देण्यात आला. या समूह-निधी यत्नात युरोपीय देशांतून आलेली मदत ही ५० टक्क्यांहून अधिक होती तर भारतातून ४० टक्के. भारतातील जातिअंतवादी विज्ञानकथा वाचण्यात, जाणून घेण्यातील स्वारस्य जगाला आहे. तमिळ पल्प फिक्शन, गुजराती फिक्शन या पुस्तकांनीही भारतेतर जगात बऱ्यापैकी गाजवले. आता या पुस्तकानंतर सध्या भारतीय दुकानांवरील रंगीबेरंगी पाट्यांवरील अक्षरकलेचा आढावा घेणाऱ्या पुस्तकासाठी ‘ब्लाफ्ट’ने समूह-निधी यत्न सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द ब्लाफ्ट बुक ऑफ अॅण्टी-कास्ट सायन्स फिक्शन’मधल्या ‘परिव्राजक’ या मूळ मराठी कथेचे लेखक, तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि ‘सेक्युलर मूव्हमेंट’चे एक संस्थापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या अन्य कथांचा सायरस लिबेरो यांनी केलेला अनुवाद येत्या दोन महिन्यांत याच प्रकाशनातर्फे येणार आहे. मराठी साहित्यदालनात ‘गावकुसाबाहेरचे’ मानले जाणारे साहित्य देशाच्या वेशीपलीकडे पोहोचत आहे. ‘एससीईआरटी’चा नव-धोरणी गाडा येण्याआधीच्या ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळा’ने- बालभारतीने- ऐंशीच्या दशकात सुरू केलेल्या यज्ञाची ही खरी पोचपावती आहे.