‘माझं आयुष्य अर्काडीशी जोडलं गेलेलं आहे. जोवर त्याची बुद्धी तल्लख आहे, तो रोमँटिक आहे, त्याची विनोदबुद्धी शाबूत आहे, तोपर्यंत मी आहे…’ २०२३मध्ये ‘स्ट्रँड’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीतील मार्टिन क्रुझ स्मिथ यांचे हे वाक्य. स्मिथ यांचे ११ जुलैला निधन झाले. त्यांच्या निधनाने ‘गोर्की पार्क’ आणि अन्य कादंबऱ्यांतून वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या ‘अर्काडी रेन्को’ या नायकाचा थरारक अध्यायही समाप्त झाला.

पेन्सिल्वेनियातील रीडिंग या शहरात ३ नोव्हेंबर १९४२ रोजी स्मिथ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एका वाहनांच्या कारखान्यात काम करत. ते जॅझ म्युझिशियनही होते. आई गायिका होती. स्मिथ यांनी पेन्सिल्वेनिया विद्यापीठातून सर्जनशील लेखन या विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर ते ‘फिलाडेल्फिया डेली’ या वृत्तपत्रात रुजू झाले. १९६५ ते १९६९ दरम्यान पत्रकारिता केल्यानंतर १९७०च्या सुमारास त्यांनी काल्पनिक लेखन सुरू केले. या काळात त्यांनी आपला मुक्काम रीडिंगमधून न्यू यॉर्क येथे हलवला. पत्रकारितेचा अनुभव लेखक म्हणून कारकीर्द घडवताना उपयुक्त ठरल्याचे स्मिथ सांगत. एखादे कथाबीज घेऊन सहा-सहा महिने विचार करत राहण्याऐवजी आताच्या आता लिहायला बसा आणि डोक्यातील कल्पना कागदावर उतरवून काढा, हा पत्रकारितेतून मिळालेला मोलाचा धडा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या नावामागेही एक किस्सा आहे. सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कादंबऱ्यांवर त्यांचे नाव मार्टिन स्मिथ म्हणून प्रसिद्ध होत असे. मात्र नंतर असे लक्षात आले की याच नावाचे अन्यही एक लेखक आहेत. मग त्यांनी आपल्या नावापुढे आपल्या आजीचे (वडिलांची आई) आडनाव लावण्यास सुरुवात केली आणि ते मार्टिन क्रुझ स्मिथ म्हणून ओळखले जाऊ लागले.

अनेक ‘बेस्ट सेलर’ कादंबऱ्या नावावर असलेल्या स्मिथ यांच्या अर्काडी रेन्को या पात्राने वाचकांना रशियातील गुप्तहेरांच्या आयुष्याचे दर्शन घडवले. रेन्कोचा सामान्यपणा हेच त्याचे वैशिष्ट्य होते. तो बीअरप्रेमी होता, वरिष्ठांविषयी त्याच्या मनात अनेक शंका होत्या आणि पत्नीशी त्याचे संबंध ताणलेले होते. १९८१मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘गोर्की पार्क’ने वाचकांची अर्काडीशी ओळख करून दिली. या कादंबरीने विक्रीचे उच्चांक गाठले. तिच्या पेपरबॅक स्वरूपातील ३० लाख आणि हार्डकव्हर स्वरूपातील दोन लाख ६५ हजार प्रती विकल्या गेल्या. पुस्तक प्रकाशित होऊन १० वर्षं झाल्यानंतर त्यावर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला. ‘गॉर्की पार्क’च्या यशानंतर स्मिथ यांनी अर्काडीकडून अन्यही अनेक गुन्ह्यांचा गुंता सोडवून घेतला. अर्काडी नायक असलेल्या आणखी १० कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. २०२३मध्ये प्रकाशित झालेले ‘इंडिपेण्डन्स स्क्वेअर’ आणि अगदी अलीकडची ‘हॉटेल युक्रेन’ या कादंबऱ्या रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडतात.

स्मिथ यांच्या कादंबऱ्यांतील वर्णने एवढी चपखल असत की त्यांच्या रशिया भेटींत काही वेळा तेथील कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्यांना अडवून त्यांची चौकशी केली होती. रशियातील स्थितीची त्यांनी केलेली वर्णने तेथील पत्रकार व राजकीय विश्लेषकांनी केलेल्या वर्णनांपेक्षाही अधिक उत्तम असल्याची पावती अनेक समीक्षकांनी दिली. स्मिथ यांना रशियन भाषा अवगत नव्हती. तरीही त्यांनी रशिया आणि तेथील गुप्तहेरांच्या विश्वाची एवढी चित्रदर्शी वर्णने कशी केली असावीत, असा प्रश्न पडतो. त्यांनी अमेरिकेतील विविध ग्रथालयांत उपलब्ध असलेले रशियाविषयीचे मुबलक साहित्य वाचून काढले. शिवाय रशियातील अनेकांशी त्यांचे वैयक्तिक स्नेहबंध जुळलेले होते. ते अमेरिकेत आले की त्यांच्याच घरी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर मुक्काम करत. त्यांच्याकडूनही त्यांना तेथील परिस्थितीची माहिती मिळत असे.

रशियाविषयी अमेरिकेत असलेली भीती काल्पनिक सिद्धांतांवर बेतलेली आहे आणि रशियातील व्यवस्था अमेरिकेपेक्षा त्यांच्या स्वत:च्या नागरिकांसाठी अधिक घातक आहे, असे स्मिथ यांचे म्हणणे होते. त्यांच्या ‘हॉटेल युक्रेन’ या कादंबरीचे वर्णन ‘असोसिएटेड प्रेस’ने ‘जेम’ अशा शब्दांत केले होते, तर ‘मिस्ट्री रायटर्स ऑफ अमेरिका’ने त्यांना ‘ग्रँड मास्टर’ म्हणून गौरविले होते. त्यांच्या ‘हवाना बे’ या कादंबरीला ‘हॅमेट’ पारितोषिकाने आणि ‘गोर्की पार्क’ला ‘गोल्ड डॅगर’ने गौरविण्यात आले.

व्हीक्यूआर’चा शताब्दी अंक

व्हर्जिनिया क्वार्टर्ली रिव्ह्यू’ आणि न्यू यॉर्कर यांचे जन्मवर्ष एकच असल्यामुळे यंदा या अमेरिकी मासिकाचेदेखील शताब्दी वर्ष. व्हर्जिनिया विद्यापीठाच्या पुढाकाराने ते साकारले. पुढे नव्या आणि जुन्या लेखकांचे उत्तम साहित्य प्रसिद्ध करणे याकडे मासिकाचा कल अधिक राहिला. बेस्ट अमेरिकन (कथा, लेख) वार्षिक खंडांमध्ये यातील भरपूर लेखन समाविष्ट आहे. रिपोर्ताज, चित्रकथा, समीक्षा अशा सगळ्या अंगाने समकालीन घडामोडींवर ते व्यक्त होते. या अंकात अकथनात्मक विशेष विभाग आहेच. पण कथा विभागात एटगर केरेट, कॅनडियन लेखिका सोवांखम थामावोंग्सा , भारतीय वंशाचे अमेरिकी लेखक करण महाजन यांच्या ताज्या कथा वाचायला मिळतील. हा संपूर्ण अंक येथे पाहता येईल.

https:// tinyurl. com/2 hr89 tjn

एटगर केरेटचे टीकास्त्र…

एटगर केरेट हा इस्रायली लेखक त्यांच्या लघुतमकथांसाठी जगभर प्रसिद्ध. दैनंदिन साधारण घटनांना जादूई वास्तववादाचा मुलामा देऊन लिहिले गेलेले त्याचे हिब्रू कथासंग्रह आणि लघुकादंबऱ्या तेथील दुकानांमधून तातडीने संपणाऱ्या (प्रसंगी पळविल्याही जाणाऱ्या). ‘द बस ड्रायव्हर हू वॉण्टेड टू बी गॉड अॅण्ड अदर स्टोरीज’ मधून पहिल्यांदा त्याच्या कथा इंग्रजी जगताला कळाल्या. पुढे वायुवेगाने त्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनांनी पसरविल्या. नुकताच त्यांचा ३३ कथांचा संग्रह ‘ऑटोकरेक्ट’ या नावाने इंग्रजीत आला आहे. (त्याविषयी बुकमार्कमध्ये विस्ताराने येईलच. तूर्त त्याची गेल्या वर्षी एका वृ्त्तवाहिनीला दिलेली लघुमुलाखत. हमासच्या हल्ल्याच्या वर्षानंतरची. देशाचे नेतृत्त्व करणाऱ्यांमुळे इस्रायलला कुठलेच भविष्य उरलेले नसल्याची कबुली देणारी. इराणशी ताज्या संघर्षानंतर त्याचे हे भाकीत किती खरे, ते जाणून घेण्यासाठी आणि युद्धखोर नेतृत्त्व असलेल्या देशात साहित्यिक कसा विचार करतो हेही समजण्यासाठी.

https:// tinyurl. com/4 zc63 yxr

वुडी अॅलनची कादंबरी…

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सर्वज्ञात असलेला वुडी अॅलन ८९ वर्षांचा आहे. चित्रपटांनी जी प्रतिमा त्याने कमावली, ती पुढे खासगी कारणांनी गमावली. काही वर्षांपूर्वी त्याचे आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर असताना त्याच्या मुलीने वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आपल्यावर बापाने केलेल्या अत्याचाराची कहाणी जाहीर केली. बातमी आणि टीका इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली की प्रकाशन संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध करीत हे आत्मचरित्रच रद्दबातल केले. पुढे ते दुसऱ्याच प्रकाशनाने आणले. सिनेमापूर्वी रेडिओ-टीव्हीसाठी लेखन करणाऱ्या वुडी अॅलन यांच्या नावावर कथासंग्रहदेखील आहेत. पण आता ‘व्हॉट्स विथ बॉम’ (Whatl s With Baum?) ही त्याची पहिली कादंबरी १४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. न्यू यॉर्कमधील पत्रकाराची प्रकाशनविश्वाबद्दलची आणि आत्मपीडनाबद्दलची गोष्ट त्यात असल्याची ही बातमी येथे वाचता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

https:// tinyurl. com/37 wjvw95