स्वातंत्र्य आंदोलन आणि भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासात ‘प्रताप’ आणि ‘वीर प्रताप’ या दैनिकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. कोणे एके काळी उर्दू वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध होणं स्वातंत्र्यसैनिकांसाठी महत्त्वाचं असायचं, त्या काळापासूनच्या दोन वर्तमानपत्रांच्या उदयअस्ताची गोष्ट सांगणाऱ्या ग्रंथाविषयी…
ही गोष्ट आहे दोन वर्तमानपत्रांची, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाची, पिता-पुत्र या संपादकांची, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणि सत्ताधाऱ्यांसमोर न वाकण्याची. या गोष्टीतून प्रामुख्याने पंजाबात स्वातंत्र्यपूर्व काळात तरुण क्रांतिकारकांनी केलेला त्याग आणि त्यांचं बलिदान आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.


स्वातंत्र्यासाठी देशभर आंदोलन सुरू होतं. ३० मार्च १९१९ ला लाहोर येथून महाशय कृष्ण यांनी ‘प्रताप’ नावाचं उर्दू वर्तमानपत्र सुरू केलं. ‘प्रताप’ सुरू झाल्याच्या काही दिवसांतच जालियनवाला बाग येथे ब्रिटिशांनी निर्दोष भारतीयांची हत्या केलेली. १९२८ च्या ऑक्टोबरमध्ये ब्रिटिशांनी लाहोर रेल्वे स्थानकात अमानुष लाठीचार्ज केला. त्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले आणि १७ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. त्यांची हत्या आणि जालियनवाला बाग येथील हत्याकांडाची संपूर्ण देशात आणि प्रामुख्याने पंजाबमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. तरुण पुढे येत होते आणि क्रांतीचे स्वप्न पाहत होते. दुसरीकडे, मोहनदास करमचंद गांधी यांचं नेतृत्व उभं राहत होतं. अशा वेळी कृष्ण याने उर्दूत सुरू केलेल्या सायं दैनिक ‘प्रताप’ला पहिल्या दिवसापासून वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेव्हा पंजाबमध्ये उर्दू वर्तमानपत्रांना महत्त्व होतं. भारतात जन्मलेली उर्दू भाषा येथील मुस्लीम, हिंदू आणि शिखांची होती. लजपतराय यांनीदेखील ‘वंदे मातरम’ नावाचं उर्दू वर्तमानपत्र लाहोरहून सुरू केलं होतं. साहजिकच, ‘प्रताप’ची बांधिलकी स्वातंत्र्य आंदोलनाला मदत करण्याची होती आणि त्यासाठी कुठलीही तडजोड न करण्याची त्यांची भूमिका होती. ११ एप्रिलला ‘प्रताप’वर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली. वर्तमानपत्र छापण्याच्या आधी मजकूर दाखवण्याची अट लावण्यात आली. कृष्ण यांना ती मान्य नव्हती. दुसऱ्या दिवशी कृष्ण यांना तुरुंगात टाकण्यात आलं. चार महिन्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि जवळपास एक वर्षानंतर ‘प्रताप’ चं प्रकाशन पुन्हा सुरू झालं. लोकांनी वर्तमानपत्राचं प्रचंड स्वागत केलं. कृष्ण यांना नंतरही काही वेळा तुरुंगात जावं लागलं. त्यांची दोन मुलं वीरेंद्र आणि नरेंद्रनादेखील तुरुंगवास भोगावा लागला होता. वीरेंद्र तर क्रांतिकारक होते. एकूण नऊ वेळा त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकलं होतं. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्च १९३१ ला लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली तेव्हा वीरेंद्र पण लाहोरच्या तुरुंगात होते.

‘प्रताप : ए डिफायन्ट न्यूजपेपर’ नावाचं हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केलेलं महत्त्वाचं पुस्तक आलं आहे. चंदर मोहन आणि ज्योत्स्ना मोहन त्याचे लेखक आहेत. या पुस्तकाच्या नावावरूनच ‘प्रताप’ हे कशा स्वरूपाचं वर्तमानपत्र होतं ते स्पष्ट होतं. स्वातंत्र्य आंदोलन आणि उर्दू पत्रकारितेचा खूप जवळचा संबंध आहे. उर्दू वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध होणं स्वातंत्र्यसैनिकांसाठी महत्त्वाचं असायचं. लाहोरहून प्रताप, वंदे मातरम, मिलापसारखी उर्दू वर्तमानपत्रं प्रसिद्ध होत होती. हसरत मोहानी यांनी उर्दूत दिलेली घोषणा ‘इन्कलाब जिंदाबाद’ चा उपयोग आजही लोक करतात. स्वातंत्र्य आंदोलनात फाशीवर जाताना भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ च्या दिलेल्या घोषणा वीरेंद्रनी ऐकल्या होत्या आणि तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या होत्या. स्वातंत्र्य हे समान उद्दिष्ट असलं तरी काही वेळा लजपतराय आणि कृष्ण एकमेकांवर टीका करत असत, असं पुस्तकात म्हटलं आहे. प्रांतीय निवडणुकांच्या मुद्द्यावर लजपतराय आणि पंडित मोतीलाल नेहरू यांच्यात मतभेद निर्माण झाले तेव्हा कृष्ण यांनी नेहरूंच्या बाजूने भूमिका घेतली होती. त्यामुळेही कृष्ण आणि लजपतराय एकमेकांविरोधात शब्द परजत.

कृष्ण आणि स्वातंत्र्यसैनिक व काँग्रेसचे वरिष्ठ नेते मदन मोहन मालवीय यांच्यात खूप जवळचे संबंध होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी कृष्ण यांचे चांगले संबंध होते. मालवीय जेव्हा कधी लाहोरला येत तेव्हा कृष्ण भेटले की ते म्हणायचे ‘आओ, महाभारत के मेरे कृष्ण’. कृष्ण यांचे स्वागत ते असं करायचे. कृष्ण यांचं मूळ नाव राधाकृष्ण व्होरा होतं. ते आर्य समाजी होते. ते जाती प्रथेच्या विरोधात होते आणि म्हणून ‘व्होरा’ या आडनावाचा उपयोग करण्याचं त्यांनी बंद केलं होत. आडनावातून तुम्ही कुठल्या जातीचे आहात ते स्पष्ट होतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांची मुलं मात्र वीरेंद्र आणि नरेंद्र म्हणूनच ओळखली जात. परंतु त्यांना परदेश प्रवासात त्रास होऊ लागल्यामुळे पासपोर्टवर ते ‘कुमार’ लिहू लागले. वीरेंद्रच्या लग्नात ‘कन्यादान’ करण्यात आलं नव्हतं. त्याच्या दहा वर्षांपूर्वी वीरेंद्रच्या मोठ्या बहिणीच्या लग्नातदेखील ‘कन्यादान’ विधी करण्यात आला नव्हता. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सुमारे १०० वर्षांपूर्वी जातीव्यवस्था अतिशय मजबूत होती आणि लग्नात ‘कन्यादान’ केलंच जात असे. कृष्ण यांनी त्यात बदल करू क्रांतिकारी पावले उचलली. आजही अनेक लग्नांत ‘कन्यादान’ केलं जातं हे विसरू नये.

१९२१ मध्ये कृष्ण यांना ‘देशद्रोहा’च्या आरोपाखाली ब्रिटिशांनी पकडलं. यंग इंडियामध्ये प्रसिद्ध झालेला महात्मा गांधी यांचा लेख ‘प्रताप’ मध्ये प्रकाशित करणं हा कृष्णचा ‘गुन्हा’ ठरला. त्या लेखासाठी गांधींना सहा वर्षांची शिक्षा झाली होती आणि कृष्ण यांना दोन वर्षांची.

लेखक म्हणतात क्रांतिकारक एकमेकांचे घनिष्ठ मित्र असत, हे सांगितल्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची गोष्ट पूर्ण होत नाही. क्रांतिकारी आंदोलनात विश्वास आणि गुप्तता अतिशय महत्त्वाची बाब असे. असफउल्ला खान मुस्लीम होते तर रामप्रसाद बिस्मिल आर्य समाजी हिंदू. काकोरी खटल्यात बिस्मिल, असफउल्ला आणि रोशन सिंग यांना १९२७ च्या १९ डिसेंबरला फाशी देण्यात आली होती. तर राजेंद्र लाहिरी यांना १७ डिसेंबरला. दुसऱ्या दिवशी क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाहोर येथे झालेल्या सभेत तरुण वीरेंद्र उपस्थित होता. १६ वर्षाच्या वीरेंद्रने लाहोरच्या फोरमेन ख्रिाश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा अविनाश चंदर बाली, दुर्गादास खन्ना आणि हंसराज व्होरा हे विद्यार्थी आंदोलनाचे नेते होते. ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात तरुणांना ते तयार करत. वीरेंद्रवर त्यांचा प्रभाव होता. ते तिघे ‘हिन्दुस्तान रिपब्लिक आर्मी’चे सभासद आहेत हे वीरेंद्रला माहीत नव्हते. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग त्यांचे नेते होते. ३० ऑक्टोबर १९२८ ला सायमन कमिशनचे सभासद लाहोरला येणार होते. तब्येत चांगली नसतानादेखील लजपतराय यांनी कमिशनच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्व केलं. त्या मोर्चात दुर्गादास यांनी वीरेंद्रची ओळख भगतसिंगशी करून दिली. चालता चालता त्यांच्यात थोडं बोलणं झालं आणि भगतसिंग अचानक अदृश्य झाले. आपल्यावर सीआयडीचे लक्ष जाऊ नये म्हणून भगतसिंग अचानक तिथून निघून गेले. मोर्चा स्टेशनवर पोहोचल्यावर पोलिसांनी लजपतराय यांना लाठ्या-काठ्यांनी प्रचंड मारहाण केली. नंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. २३ मार्च १९४१ पर्यंत भगतसिंग आणि वीरेंद्र यांचे एकमेकांशी मैत्री संबंध राहिलेले.

लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी १७ डिसेंबर १९२८ ला लाहोर येथे जॉन सॉन्डर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. सॉन्डर्सची हत्या करण्यात आली तेव्हा वीरेंद्र कॉलेजमध्ये परीक्षा देत होते. तरी त्यांना अटक करण्यात आली. ही त्याची पहिली अटक होती. पोलिसांचं तरुण वीरेंद्रवर आधीपासून लक्ष होतं. तो भगतसिंग इत्यादींच्या संपर्कात असल्याचा त्यांना संशय होता. एक महिन्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. वीरेंद्र यांनी ‘वह इन्कलाबी दिन’ नावाच्या आपल्या आत्मचरित्रात लिहिलं, ‘‘१९२८ आणि १९३२ च्या दरम्यान स्वातंत्र्य आंदोलनात तरुण मोठ्या संख्येत सहभागी झाले. त्यातल्या काहींना फाशी देण्यात आली, काही तरुणांवर पोलिसांनी गोळ्या चालवल्या आणि काहींनी उपोषण करून देशासाठी प्राण अर्पण केले. त्यातला एक बहादूर जतीन्द्र नाथ दास होता.’’ भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी लाहोरच्या तुरुंगात राजकीय कैद्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी उपोषण सुरू केलं. लाहोर षड्यंत्र खटला त्यांच्या विरुद्ध न्यायालयात सुरू होता. अशक्तपणामुळे सुरुवातीला त्यांना स्ट्रेचरवर न्यायालयात नेण्यात येत असे. पण नंतर त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवला गेला. त्यांच्या पाठिंब्यासाठी लाहोर खटल्यातील कैद्याने उपोषण सुरू केलं. जवाहरलालने त्यांची ८ ऑगस्ट १९२९ ला भेट घेतली. उपोषणाच्या ६३ व्या दिवशी जतीन्द्र नाथ यांचा भगतसिंगाच्या मांडीवर मृत्यू झाला. जतीन्द्रचा भाऊ किरण दास कलकत्त्याहून आला होता.

डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. वीरेंद्र त्याच्या तयारीत व्यग्र होते. पोलीस त्यांना आणि किरण दासला पकडण्यासाठी आले. आपल्याला का अटक करण्यात येत आहे, त्याची त्यांना माहिती नव्हती. गोपीचंद भार्गवने त्यांना सांगितलं, ‘‘व्हाइसरॉय (इरवीन) यांची ट्रेन उडवण्याचा काल प्रयत्न करण्यात आला. पोलीस तुला आणि किरण दासला अटक करण्यासाठी आले आहेत.’’ ही बातमी लगेच पसरली आणि काँग्रेस सेवा दलाच्या छावणीच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक गोळा झाले.

कार्यकर्त्यांनी वीरेंद्र आणि किरण यांना मिरवणुकीतून पोलिसांकडे नेण्याचा आग्रह धरला. राष्ट्रप्रेमाची गाणी म्हणत हजारोंनी दोघांना पोलीस स्टेशनपर्यंत नेलं. दोघांना दिल्ली जवळ करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाची काही माहिती नव्हती. भगवती चरण आणि यशपाल यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. नंतर यशपाल हिंदी साहित्याचे मोठे लेखक म्हणून प्रसिद्ध झाले. त्या बॉम्बस्फोटातून इरवीन वाचले होते. वीरेंद्र यांना अटक करून तुरुंगात टाकणं सुरूच होतं. १९४५ च्या उन्हाळ्यात वीरेंद्र परत एकदा तुरुंगातून सुटले. हा त्यांचा नववा आणि शेवटचा तुरुंगवास होता. १९४६ मध्ये वीरेंद्र पंजाबच्या मुजफ्फरगड (आता पाकिस्तानात) मतदारसंघातून प्रांतीय विधानसभेत काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आले.

स्वातंत्र्यानंतर वीरेंद्र लाहोर सोडून भारतात आले आणि जालंधर येथे स्थायिक झाले. १९५२ मध्ये जालंधरहून त्यांनी ‘प्रताप’ पुन्हा सुरू केलं. त्याची दिल्ली आवृत्तीही होती आणि तिची जबाबदारी नरेंद्रकडे होती. १९५६ च्या सुरुवातीला त्यांनी ‘वीर प्रताप’ नावाचं हिंदी दैनिक सुरू केलं. १९१९ मध्ये सुरू करण्यात आलेलं उर्दू दैनिक ‘प्रताप’ १९९४ ला बंद करण्यात आलं आणि त्याला कारण होतं उर्दू वाचकांची कमी होत असलेली संख्या. ‘वीर प्रताप’ ची शेवटची आवृत्ती ३१ मार्च २०१७ ला निघाली. मोठ्या कॉर्पोरेट वर्तमानपत्रांसमोर टिकून राहणं अवघड असल्याचं ‘वीर प्रताप’च्या अधिकाऱ्यांना वाटू लागलं होतं आणि म्हणून दैनिक बंद करण्यात आलं.

भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासातदेखील ‘प्रताप’ आणि ‘वीर प्रताप’ या दैनिकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी त्यांची बांधिलकी कायम होती. आणीबाणीच्या विरोधात ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘स्टेट्समन’ सोबत अग्रलेखाची जागा वीरेंद्रनीदेखील रिकामी सोडली होती. अशी हिंमत त्या काळात खूप कमी संपादकांनी दाखवली. वीरेंद्रनी शेवटपर्यंत आणीबाणीचा विरोध केला. नेहरू यांच्याशी चांगले संबंध असूनदेखील त्यांना अडचणीचे प्रश्न विचारण्याची त्यांच्यात हिंमत होती. आजच्या पत्रकारांनी त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे.

२४ जून १९८३: सकाळी जालंदरच्या कार्यालयात एक कर्मचारी पोस्ट ऑफिसात जाऊन पत्र व पार्सल घेऊन आला. त्यात एक पार्सल होते. वीरेंद्र यांच्या नावाने ते पाठवण्यात आले होते. ते उघडत असताना त्याचा स्फोट झाला. त्यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ते पार्सल वीरेंद्र यांना पाठवण्यात आले होते. त्या काळात खलिस्तानची चळवळ जोरात होती. लोकांमध्ये प्रचंड भीती होती.

पंजाबात तेव्हा पहिल्यांदा पार्सल बॉम्बचा शस्त्र म्हणून उपयोग करण्यात आला. दुसऱ्या दिवशीच्या अग्रलेखात वीरेंद्रनी लिहिलं, की अशा प्रकारचं काही तरी होईल याचा आम्हाला अंदाज होता. पार्सल बॉम्ब पाठविणाऱ्यांना जर असं वाटत असेल की अशा प्रकारे ‘प्रताप’ आणि ‘वीर प्रताप’ ला गप्प करता येईल तर हा त्यांचा गैरसमज आहे. असा बहादूर पत्रकार, संपादक आता सापडणं कठीण आहे. वीरेंद्र पत्रकार, संपादक होते पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ते एक क्रांतिकारी आणि संवेदनशील व्यक्ती होते. १२ मे १९८४ ला ‘पंजाब केसरी’ चे संपादक रमेश चंदर यांची हत्या करण्यात आली. १९८१ ला त्यांचे वडील लाला जगत नारायण यांची हत्या करण्यात आली. ते ‘हिंद समाचार’चे संपादक होते. त्या सगळ्यांच्या हत्येमागे खलिस्तानी अतिरेकी होते.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘वीर प्रताप’ चं कात्रण दाखविण्यात आलं आहे. त्यासोबत उर्दू ‘प्रताप’ चं कात्रणदेखील दाखवलं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jatindesai123@gmail.com