भारतीय बेस्ट सेलर…
ठाण्यात जन्मलेली आणि वाढलेली यूट्यूबर अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिची पहिली कादंबरी ‘टू गुड टू बी ट्रू’ ही फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित झाली आणि तिच्या दीड लाख प्रती काही महिन्यांत संपल्याच्या बातम्या झळकल्या. ‘लिटरेचर फेस्टिव्हल्स’च्या लवकरच सुरू होणाऱ्या नव्या हंगामात ही कादंबरी आणखी विक्रम करण्याची शक्यता आहे. पण हा लेख पूर्णपणे तिच्याविषयीचा नाही. लेखकाने लिहून, पुस्तक छापून गप्प बसायचे की समाजमाध्यमांत ‘इन्फ्लुएन्सर’ बनून पुस्तकाचे प्रसारक व्हायचे, असा प्रश्न यात विचारला गेला आहे. त्याचबरोबर भारतीय आंग्ल प्रकाशन उद्याोगाच्या जगात काय चालले आहे? याची थोडी माहितीही दिली आहे. हजारांची प्रत विक्रीऐपतीत न बसणाऱ्या मराठी पुस्तक जगतात माध्यमे फक्त पुस्तकविक्रीची दुकाने असल्यासारखी वापरली जात असताना हे वाचणे आवश्यकच.
https:// tinyurl. com/ zs2 j75 vk
लेखिकेचा धावपट…
आर. एफ. काँग ही २९ वर्षांची अमेरिकी लेखिका. याआधी तिची पाच पुस्तके गेल्या दहा वर्षांत आली. त्यात विज्ञान कादंबरीपासून अमेरिकेतील प्रकाशन उद्याोगाची खिल्ली उडविणारी ‘यलोफेस’ ही कादंबरीही आहे. पण नवा मुद्दा हा की, ‘कॅटाबेसेस’ ही तिची नवी कादंबरी काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली आणि युरोप-अमेरिकेतील साऱ्या साहित्य पुरवण्या या लेखिकेचा ‘व्यक्तिवेध’ झळकविण्याच्या उद्याोगाला लागल्या. दोन आठवड्यांपूर्वी ‘न्यू यॉर्कर’ने छापलेला प्रदीर्घ ‘प्रोफाइल’, ‘गार्डियन’मधील मुलाखत त्यांच्या संकेतस्थळांनी वाचनासाठी मोफत ठेवली आहे. ‘आउटसाइड’ हे मासिक घरकोंबड्या वाचकांना बाहेर जाण्यास उद्याुक्त करणारे. या लेखिकेने जगण्याचा भाग म्हणून धावणे उतारवयात सवयीचे करून घेतले. ही छोटी मुलाखत लेखन आणि धावणे यांची सांगड घालणारी म्हणून इथे देण्याची खुमखुमी. बाकी ‘आउटसाइड’ मासिकातील इतर उत्तम वाचण्यासाठी घरकोंबडे बनावे लागणे अनिवार्य.
https:// tinyurl. com/4 weyjwsf
पौर्णिमेची वाचन तजवीज…
मझुकी सुझीमुरा ही लेखिका गेल्या दोन दशकांपासून जपानमध्ये गाजतेय. रहस्यकथा लेखनापासून सुरुवात करणाऱ्या लेखिकेची आत्तापर्यंत ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ग्रंथविक्री कित्येक लाख प्रतींमध्ये आहे. शिवाय कादंबऱ्यांवर ‘लाइव्ह अॅक्शन’ आणि ‘अॅनिमेटेड’ चित्रपटदेखील झळकले आहेत. २०१९ मध्ये ‘डोरेमॉन’ या जगप्रसिद्ध कार्टून व्यक्तिरेखेचा चंद्रावरच्या स्वारीबद्दल चित्रपट आला. त्याची पटकथा आणि कादंबरीदेखील सुझीमुरा हिचीच. तर ‘द लॉस्ट सोल्स मीट अण्डर ए फूल मून’ या सर्वाधिक खपाच्या कादंबरीचा अनुवाद नुकताच इंग्रजीत उपलब्ध झाला आहे. अमावास्या-पौर्णिमेसंबंधी जगभरातील संस्कृतीतल्या धारणा सारख्याच कशा आहेत, याचे दाखले सिनेमा आणि पुस्तकांतून सातत्याने मिळतात. ही कादंबरीदेखील त्याला अपवाद ठरणार नाही. तूर्त या कादंबरीतील एक प्रकरण आणि अनुवादिकेने लेखिकेची करून दिलेली ओळख येथे वाचता येईल.
https:// tinyurl. com/ fx5 az87 r
https:// tinyurl. com/2 t4 d7 bnw