शेकडो ट्रम्पसमर्थक ६ जानेवारी २०२१ या दिवशी अमेरिकेच्या राजधानीत जमले, त्यापैकी अनेक जण बंदुका घेऊन आले होते आणि त्यांनी देशाच्या लोकप्रतिनिधीगृहात घुसून केवळ मोडतोडच केली असे नाही, तर लोकप्रतिनिधींना धमकावलेसुद्धा. अमेरिकेच्या लोकशाहीवर कायमचा ओरखडा उमटवणारी ही घटना घडली कशी, याचा मागोवा घेताना तिघा लेखकांना आणखी प्रश्न पडले. हे प्रश्न अमेरिकेतल्या वंशभेदाबद्दल, तेथील विद्यापीठांतल्या कंपूशाहीबद्दल, प्रसारमाध्यमांच्या उथळपणाबद्दल, समाजमाध्यमांतून फैलावणाऱ्या माहिती अथवा गैरमाहितीने व्यक्ती कशा घेरल्या जातात याबद्दल.. एकंदर अमेरिकी मानसिकतेच्या सद्य:स्थितीबद्दल होते. ‘अमेरिकी मानसिकता’ अशी एकसंध गोष्ट उरली तरी आहे का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे, हेही या तिघा लेखकांच्या लक्षात आले. त्यातून साकार झालेले पुस्तक म्हणजे ‘द पॉयझिनग ऑफ द अमेरिकन माइण्ड’. लेखकांपैकी लॉरेन्स एपार्ड हे ‘कॉनोर्स इन्स्टिटय़ूट’चे संचालक आहेत. आपल्याकडे जशा तथ्यतपासणी (फॅक्टचेकिंग) संस्था असतात तशा अमेरिकेत तीन-चार संस्था ‘दोन्ही बाजू सांगण्या’चे काम करणाऱ्या आहेत, त्यापैकी कॉनोर्स ही एक. दुसरे लेखक जेकब एल. मॅकी हे कृष्णवर्णीयांच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करणारे, तर तिसरे ली जसिम हे रुटजर्स विद्यापीठातील समाज-मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
आज समाजामध्ये जी दुही दिसते तिच्या मुळाशी तथ्यांचा झगडा आहे, या मताला हे तिघे जण पुष्टी देतात. ‘तथ्यांचा झगडा’ ही स्थिती ‘माझेच खरे’ या प्रवृत्तीतून उद्भवते, पण हा झगडा आज टिपेला पोहोचलेला दिसतो कारण कशालाही ‘तथ्य’ म्हणून आकर्षकपणे सादर करण्याची आणि लोकांच्या गळी उतरवण्याची माध्यमे- समाजमाध्यमांची शैली! त्यातून समाजातील व्यक्ती पराकोटीच्या एकारलेल्या होतात, दुसऱ्याचे ऐकूनच घ्यायचे नाही ही प्रवृत्ती वाढते आणि ही कलुषित मने विखारी राजकारणालाच नव्हे तर सामाजिक/ सांस्कृतिक क्षेत्रातील विखारालाही नकळत पाठिंबा देऊ लागतात. हे पुस्तक भारतात प्रकाशित होण्याची शक्यता नसली तरी, अमेरिकेत ‘कॉनोर्स’ संस्थेतर्फेच ते येत्या काही आठवडय़ांत प्रकाशित होत आहे.