फ्रान्सिस पेटन राऊस यांचा ५ ऑक्टोबर १८७९ रोजी अमेरिकेतल्या बाल्टिमोर शहरात जन्म झाला. टेक्सासमधून स्थलांतर करून आलेल्या फ्रान्सिस पेटनच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला. खचून न जाता, आईने अपार कष्ट झेलून पेटनला १९०० मध्ये बीए आणि नंतर वैद्याकीय अभ्यासक्रम प्रवेशापर्यंत पोहोचविले. १९०५ मध्ये राऊस यांना वैद्याकीय पदवी मिळाली.

१९१० मध्ये राऊस यांच्याकडे एका महिलेने प्लायमाऊथ रॉक जातीची कोंबडी आणली. कोंबडीच्या छातीत एक कर्करोग-गाठ होती. गाठीतील द्रव प्लायमाऊथ रॉक जातीच्या निरोगी कोंबडीला टोचला तेव्हा कालांतराने तिलाही कर्करोग झाला. पुढे पेटन राऊस यांनी तो विषाणू वेगळा करून शुद्ध स्वरूपात मिळवला. रेण्वीय जीवशास्त्र, विषाणूशास्त्र आणि कर्करोग यांची सांगड घालून ते अनेक सैद्धांतिक गोष्टी शिकले. त्या विषाणूला पुढे राऊस सार्कोमा व्हायरस असे नाव देण्यात आले. शल्यक्रियातज्ज्ञ होण्याची महत्त्वाकांक्षा असली तरी राऊसना ती पूर्ण करता आली नाही. वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात प्रयोगशाळेत चिरफाड करताना मृतदेहातील हाडातून संक्रमण होऊन राऊसना क्षयरोग झाला. काखेत झालेली गाठ काढली; पण हाताच्या हालचालीवर मर्यादा आल्या.

ड्रेस्डेन, जर्मनीत त्यांनी नगरपालिकेच्या रुग्णालयात विकृतीशास्त्राचा अभ्यास केला. रॉकफेलर इन्स्टिट्यूटचे संचालक सायमन फ्लेक्सनर यांना राऊस यांचे विकृतीशास्त्रातील नैपुण्य आणि संशोधनाची आवड लक्षात आली. राऊस यांनी मिशिगन विद्यापीठात विकृतीशास्त्र अध्यापकाचे काम काही काळ केले. पुढे सायमन फ्लेक्सनर यांच्या शिफारसीमुळे रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये पद मिळून राऊसनी वैद्याकीय संशोधनक्षेत्रासाठी आपले आयुष्य समर्पित केले.

विषाणूंमुळे काही प्रकारच्या कर्करोग गाठी होऊ शकतात हे फ्रान्सिस पेटन राऊस यांच्यामुळे कळले. १९११ मध्ये राऊसनी लावलेल्या ‘विषाणू कर्करोगकारक असतात,’ या शोधाबद्दल त्यांना तब्बल ५५ वर्षांनी १९६६ सालचे वैद्याक आणि शरीरक्रियाशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले. उशिरा का होईना या संशोधनाचे महत्त्व जगाच्या लक्षात आले. १९४० साली त्यांची ‘रॉयल सोसायटी’चे परदेशस्थ सदस्य म्हणून निवड झाली आणि ‘रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन’मध्येदेखील सदस्यत्व बहाल करण्यात आले. ‘अमेरिकन पब्लिक हेल्थ असोसिएशन’चे ‘लास्कर अवॉर्ड’ आणि ‘युनायटेड नेशन्स’चे कॅन्सर रिसर्च परितोषिक त्यांना प्रदान करण्यात आले. जर्मनीच्या पॉल एर्लिक-लुडविग डार्मस्टाटर पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये १६ फेब्रुवारी १९७० रोजी ते पोटाच्या कर्करोगाने मरण पावले.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org