सद्य दशकात संगणकांची वाढती गणनशक्ती आणि चेता पेशींच्या जालाची प्रारूपे (न्युरल नेटवर्क) वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेने वेगाने प्रगती साधली आहे. एकच ठरावीक काम करणारी यंत्रे बनवण्यात संशोधकांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. पण यानंतरचा टप्पा म्हणजे एकाहून अधिक समस्या हाताळणारी यंत्रे बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘मनाचा सिद्धांत’ आत्मसात करणे गरजेचे आहे. यंत्रे जेव्हा माणसाच्या भावना समजू शकतील तेव्हाच ती माणसांसोबत काम करू शकतील. परंतु मानवाचे भावनिक विश्व आणि विचार प्रक्रिया यंत्रात अंतर्भूत करणे हा पूर्वीच्या टप्प्यांपेक्षा अनेक पटीने अवघड असा टप्पा आहे.

तर्काधारित निर्णय प्रक्रिया व गणिती सूत्रे यंत्राला सहज शिकवता येतात परंतु मानवी भावनांची गुंतागुंत, बोधन क्रिया, निर्णय प्रक्रिया या सर्वच अमूर्त संकल्पना आहेत. त्यात अनेकदा विसंगतीही असते, व्यावहारिकदृष्टय़ा चुकीचे निर्णयही माणसे अनेकदा घेत असतात. या विसंगतींसकट प्रत्येक माणसांच्या वेगवेगळय़ा स्वभावाचे, भावनांच्या चढ-उतारांचे वेध घेणारे प्रारूप बनवून यंत्रात रोपण करता येणे अर्थातच अवघड आहे.

मानवी मन समजून घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात माहिती यंत्रांना पुरवावी लागेल. माणसांचे स्वभाव, भावना आणि त्यांचा भूतकाळ ही सर्वच माहिती एखाद्या माणसाच्या वर्तणुकीचा अंदाज बांधण्यासाठी गरजेची आहे. ही वैयक्तिक माहिती मिळवणेही कठीण आहे आणि त्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची काटेकोर दक्षता बाळगणेही अनिवार्य आहे.

यंत्राला पुरवली जाणारी ही वैयक्तिक माहिती चुकीची अथवा एकतर्फी असल्यास यंत्रांचे निर्णयही चुकीचे वा कुणासाठी तरी अन्यायकारक ठरतील. निरपेक्ष निर्णय घेण्यासाठी प्रातिनिधिक आणि सत्य माहिती मिळवावी लागेल.

मनाचा सिद्धांत वापरणाऱ्या यंत्रांनी त्यांच्या कृतीचे वा निर्णयाचे स्पष्टीकरण देणे अभिप्रेत आहे, ज्यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढेल आणि मानव यंत्र यांच्या संबंधांमध्ये पारदर्शीपणा येईल. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत चेतापेशी जालाच्या असंख्य थरांतून जाणाऱ्या व एकमेकांना प्रभावित करणाऱ्या संदेशांतून ठरवली जाणारी निर्णय प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व समजण्यास कठीण असेल.

माणसाच्या वागणुकीवर पिढय़ानपिढय़ामधून हस्तांतरित झालेल्या संस्कारांचा, नीतिनियमांचा पगडा असतो. त्यामुळे त्याचे निर्णय हे इतरांच्याही हिताचा विचार करून सहसा घेतले जातात. असेच नियम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही तितक्याच अवधानाने राबवणे ही संशोधकांचीच जबाबदारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकंदरीत संगणक संशोधकांच्या बरोबरच चेतापेशीतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी, शिक्षणशास्त्रज्ञ अशा अनेक तज्ज्ञांचे एकत्रित प्रयत्न हा मनाच्या सिद्धांताचा महामेरू पेलण्यासाठी गरजेचे आहेत.