‘सुसंवादाची आस..’ हे संपादकीय (२३ मार्च) वाचले. समूहशक्ती जितकी उपायकारक तितकीच किंबहुना अधिक अपायकारक ठरणारी असू शकते, हे आजच्या उत्सवी उन्मादीकरणातून पुरेसे स्पष्ट होते. सामाजिक अभिसरण, प्रबोधन हे नावापुरते राहिले आणि उरले आहे ते फक्त आणि फक्त ‘इव्हेंटीकरण’! आजच्या आधुनिक काळात याबाबत कोणी आक्षेप नोंदवत नाही. नोंदवल्यास रूढी, परंपरा, धार्मिक अस्मितांचे मुद्दे अकारण प्रतिष्ठेचे करून तोंडे बंद केली जातात. वैविध्य हे आपल्या देशाचे वैशिष्टय़ असले तरी तेच आता दुखणे झाल्याचे अलीकडच्या अनेक धार्मिक उत्सवांतून दिसते आहे. आपण सण, प्रथांचे वाहक आहोत की भारवाहक, असा प्रश्न पडतो. डीजे, डॉल्बीच्या दणदणाटाची कमाल पातळी ओलांडल्याविना आज उत्सव साजराच होत नाही. उत्साहाच्या लाटेत विवेक हरवणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांत उन्मादाची कमान चढत चालली आहे आणि विवेकाचा आवाज क्षीण होत चालला आहे. उन्माद हे व्यक्तीचे नव्हे तर एकूणच समाजाचे लक्षण ठरू लागले आहे. उत्सव आणि आनंद हे समीकरण पुन्हा नव्याने जुळवून आणायचे असेल तर अखेर सशक्त पर्याय निर्माण केले पाहिजेत. सणाचा आनंद नवे कपडे, दागदागिने, अत्तरे, फराळ अशा औपचारिक पण इंद्रियांना सुखावणाऱ्या गोष्टींतच का ठेवायचा?  गेल्या काही वर्षांत क्रयशक्ती वाढलेला वर्ग विस्तारत आहे. पण आर्थिक सुबत्तेबरोबर येणारी सामाजिक जबाबदारीची भावना आणि जाणीवदेखील जागी असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. उत्सवांनी एकूणच बाजारपेठीय कल्पना धारण केल्यामुळे विवेकाचा आवाज क्षीण आणि उन्मादाची बाजारपेठ तेजीत आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers mail readers reaction on loksatta editorial and articles zws
First published on: 24-03-2023 at 01:04 IST