अहो, नसेल त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात, म्हणून काय मनसेला सभेसाठी शिवाजी पार्क नाकारायचे आणि २१ उमेदवार असलेल्या ‘नकली’ सेनेला द्यायचे? हे कदापि शक्य नाही. लोकशाहीच्या या उत्सवात व्यक्त होण्याचा अधिकार सर्वांना समान. मग तो पक्ष असो की सामान्य मतदार. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या निर्णयावर कुणीही शंका घेण्याचे काही कारण नाही. अतिशय उदात्त हेतूच यामागे आहे. मुख्य म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखाली हा निर्णय अजिबात घेण्यात आला नाही. पालिकेचे प्रशासन लोकभावनेचाच आदर करते. मतदारांना या उत्सवी काळात मनोरंजन हवे. उद्धवपेक्षा ते राज योग्य रीतीने करू शकतात अशी धारणा झाल्यानेच पालिकेने मैदान दिले.

हेही वाचा >>> पहिली बाजू : ‘त्यांना काय वाटेल?’

काहीही म्हटले तरी ‘लाव रे तो व्हिडीओ’ची क्रेझ आहे लोकांमध्ये. परवा ठाण्यात त्याची चुणूक दिसलीच की! यावेळी फक्त व्हिडीओ तेवढे बदलले पण ‘लाव रे’ हा दमदार आवाज तोच आहे ना! २०१९ लासुद्धा मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. तेव्हा त्यांच्या सभा मिटक्या मारत ऐकणाऱ्यांनी आता आक्षेप घेणे नतद्रष्टपणाच. शिवाय ठाकरे आणि शिवाजी पार्कचे नाते जुने. त्यातल्या राज यांना विश्वगुरूंनी ‘अस्सल’तेचे प्रमाणपत्र दिल्यावर पालिकेने तरी ‘नकली’च्या अर्जाचा का म्हणून विचार करावा? २०१९ ला याच विश्वगुरूंची भरपूर टिंगलटवाळी राज ठाकरेंनी केली होती. ते चक्र उलटे फिरवण्यासाठी ही सभा व त्यासाठी मैदान आवश्यक होतेच. म्हणून तर खुद्द विश्वगुरूच सभेसाठी येताहेत. मनसेवर नेहमी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा परिचय करून देण्याची पाळी येते. हा सुपारी घेण्याचाच प्रकार नाही का असले प्रश्न तर नकोच. राज यांची व्यूहरचना अगदी उघड असते, त्या प्रशांत किशोरसारखी बंद दाराआडची नाही.

हेही वाचा >>> चिप चरित्र: सरकारदरबारी अमेरिकी चिप उद्याोग!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे हा प्रचारासाठी भाड्याने मिळणारा देशातला एकमेव पक्ष अशी संभावना तर नकोच. जे करायचे ते दूरदृष्टी व अजूनही न चुरगळली गेलेली विकासाची ब्ल्यूप्रिंट समोर ठेवून हीच या एकचलानुवर्ती पक्षाची खासियत. त्यामुळे ‘भाडे’ वगैरे शब्द वापरून या पक्षाचा अपमान नकोच. अन्यथा ‘खळ्ळखट्याक’ ठरलेले. कदाचित त्यालाच घाबरून पालिकेने सभेला परवानगी दिली असेल. लोकशाहीचा हा उत्सव कसलाही वाद न होता व्हावा असाही विचार पालिकेने केला असेल. विश्वगुरूंमुळे उमेदवार कोणीही जिंकतात, पण एकही उमेदवार नसलेलेही शिवाजी पार्क मिळवण्याच्या शर्यतीत जिंकलेच, हे अप्रूप! लोकशाही सुदृढ होण्यासाठी नवनवे प्रयोग करत राहावे लागतात. दर पाच वर्षांनी याच नवतेचा आधार घेणारे राज हे प्रयोगशील व्यक्तिमत्त्व. त्यामुळे त्यांच्या प्रथम आलेल्या अर्जाला पालिकेने प्राधान्य देणे योग्यच. यात पक्षपाताचा लवलेशही नाही. राज यांना व्यंगचित्रासोबतच व्हिडीओ गोळा करण्याचा छंदसुद्धा जडल्याचा निष्कर्ष कुणी काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज. या दुसऱ्या छंदाकडे लक्ष देण्यापेक्षा येत्या १७ तारखेला पार्कात हजेरी लावून व्हिडीओचा आनंद तेवढा घ्या हेच अमुचे सांगणे!