‘ताबडतोब भेटीला या’ असा निरोप मिळताच ‘उपमुख्यांनी’ थेट दिल्ली गाठली. नेहमीसारखीच मध्यरात्र उलटली होती. पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढत ते चाणक्यांच्या दरबारात पोहोचले. आदरातिथ्य आटोपल्यावर समोरच्यांनी थेट विषयालाच हात घातला तसे ते सावरून बसले. ‘मी काय म्हणतो? गरजच काय विश्वास आहे हे जनतेकडून वारंवार वदवून घ्यायची? प्रत्येक निवडणुकीगणिक त्यात वाढच होत आहे. आपण कुठल्याही तडजोडी केल्या तरी लोक भरभरून मते देतात ते विश्वास आहे म्हणूनच ना! मग ‘एक सही विश्वासाची’ अशी मोहीम राबवण्याची गरज काय? दोन पक्ष काय फोडले तर प्रतिमाभंजन होईल अशी भीती वाटलीच कशी तुम्हाला? आमच्या राज्यासाठी हे नवीन नाही हे ठाऊक नाही का तुम्हाला? आधी ईशान्येकडल्या राज्यांत आपण हे प्रयोग केले.
नंतर गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेशातही यशस्वी ठरलो. कर्नाटकात हरलो म्हणून तुम्हाला भीती वाटली की काय? अशी मोहीम म्हणजे विश्वासाला तडा गेला अशी अप्रत्यक्ष कबुलीच, हे तुमच्या ध्यानात कसे आले नाही? असे करण्यापेक्षा आपण फोडाफोडी केलीच नाही, उलट तेच स्वत:चा पक्ष घेऊन आपल्याकडे आले असा प्रचार का करत नाही? अशी कृती म्हणजे एकदा नोंदणी विवाह केल्यावर पुन्हा धार्मिक विधी करून त्यावर मोहोर उमटवण्यासारखे असे तुम्हाला वाटत नाही का? आपल्यावर केवळ जनतेचाच विश्वास नाही तर विरोधात असणाऱ्या प्रत्येकाचा विश्वास वाढू लागलाय. प्रत्येकजण आघाडीत येण्यासाठी धडपडतोय हे लक्षात न घेता जनतेच्या दरबारात जाण्याची गरज काय? मोहीमच हाती घ्यायची होती तर त्यातून आपला कल्पानाविष्कार दिसेल अशी तरी हवी ना! त्या एक आमदारवाल्या पक्षाच्या मोहिमेची नक्कल करण्याची गरज काय होती? अशाने आपणही त्यांच्यासारखे एकवर येऊ अशी शंकाही तुमच्या मनाला शिवली नाही? ऐंशीच्या दशकात आपण दोनवर होतो तेव्हापासून आजपर्यंत कल्पनादारिद्रय़ आपल्याला कधी जाणवले नाही.
सत्ता मिळताच या दारिद्रय़ाचा स्पर्श कसा काय व्हायला लागला? एकीकडे आम्ही ‘टिफिन सभा’सारख्या नवउन्मेषी कल्पना राबवत असताना तुम्ही दुसऱ्याच्या कल्पना चोरता? तेही लगोलग? अरे, चोरीच करायची होती तर काही दिवस तरी जाऊ द्यायचे. जनतेची स्मरणशक्ती कमी असते हे मान्य; पण इतकी कमी असेल असा विचार तुम्ही कसा काय केला? एकशे सातांचा पक्ष असूनही आविष्काराची वानवा कशी काय राहू शकते? सत्तेमुळे बुद्धी तल्लख होते असे चाणक्यनीती सांगते. तुमच्या राज्यात तर विपरीत घडू लागले. यावर कधी विचार करणार की नाही? सत्तेच्या बाबतीत आपण ‘आयआयटीयन’ आहोत, प्राथमिक शाळेतले मास्तर नाही हे कायम लक्षात ठेवा- तशाच मोहिमा हाती घ्या. आपण काहीही केले तरी जनतेचा विश्वास अढळच आहे हे लक्षात ठेवा व अशा प्रतिक्रियावजा मोहिमा राबवण्यापेक्षा विश्वगुरूंनी केलेली कामे जनतेला सांगा. निघा आता.’ हे ऐकताच त्यांनी बाहेर पडून थेट विमान गाठले. प्रवास सुरू होताच सहायकाने नेहमीप्रमाणे त्यांच्यासमोर शिल्लक फाइलचा गठ्ठा ठेवला. त्यातल्या एकावर सही करताच त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे निघाले ‘एक सही नि:श्वासाची.’