‘प्रति, सरचिटणीस, राष्ट्रवादी (अप), आम्ही पक्षाचे नागपुरातील सर्व पदाधिकारी एकमुखाने नमूद करतो की, लावणीच्या संदर्भात आपण पाठवलेली कारणे दाखवा नोटीस बघून सखेद आश्चर्य वाटले. ते बोरूबहाद्दर व बूमधारी काहीही म्हणोत, आमच्यावर चिखल उडवोत, पण आम्ही दिवाळी मीलनाच्या कार्यक्रमात एका कार्यकर्तीला लावणी सादर करण्यास सांगून काहीही गैर केले नाही.

येत्या काही दिवसांत पालिकेच्या निवडणुका आहेत. पक्षानेच सांगितल्याप्रमाणे हे एक युद्ध आहे व आमच्यासमोर युती नाकारणारा भाजपसारखा बलाढ्य पक्ष विरोधक म्हणून उभा आहे. त्याच्याशी सामना करायचा असेल तर पक्षाच्या कार्यकर्तारूपी सैनिकांच्या मनोरंजनाची सोय व्हावी हाच उदात्त हेतू यामागे होता. आपण इतिहास बघितला तर युद्धाच्या काळात सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी रुजलेल्या शाहिरी वाङ्मयात लावणी प्रकार नमूद आहे. कार्यालयात झालेल्या मीलन कार्यक्रमात पोवाडासुद्धा गायला गेला व नंतर लावणी. त्यामुळे हे कृत्य परंपरेला साजेसेच आहे.

या लावणीचा गवगवा झाल्यावर सध्या पक्षाच्या गणेशपेठ कार्यालयात तरुणांची रीघ लागली असून ते सर्व कार्यकर्ते होण्यास एका पायावर तयार आहेत. सध्या आम्ही त्यांचीच सदस्यनोंदणी करण्यात व्यग्र आहोत. एकूणच या लावणीने पक्षविस्ताराचा मार्ग प्रशस्त करून दिला आहे. तसाही विदर्भात आपला पक्ष फार मोठा नाही. या एका कार्यक्रमामुळे त्याचा विस्तार होत असेल तर तुम्ही नोटीस देण्याऐवजी आमची पाठ थोपटायला हवी.

आपला पक्ष प्रामुख्याने मराठ्यांचा म्हणून ओळखला जातो. लावणी निर्माण झाली ती सैनिकांसाठीच. त्यामुळे आम्हा पक्षाच्या मावळ्यांना यात काहीही गैर वाटत नाही. आमच्या विदर्भात भाताची रोवणी करताना गाणी म्हणतात. ही परंपरा खूप जुनी. शाहिरी परंपरेपेक्षाही. उर्वरित महाराष्ट्राने व त्यातल्या पश्चिम भागाने याच गाण्यांना पुढे लावणीचे रूप दिले. तिकडे भाताची रोवणी नसल्याने लावणी शृंगारिक झाली. आम्ही वैदर्भीय लोक आजही त्याकडे शृंगार म्हणून बघत नाही. त्यामुळे आम्ही कार्यालयात जे केले त्याचा आम्हाला अजिबात पश्चात्ताप नाही.

आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सध्या आपले कार्यकर्ते वार्डावार्डात दारोदार फिरत आहेत. त्यांचे ‘श्रम’ दूर व्हावेत यासाठी लावणीसारखा उत्तम ‘परिहार’ नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. दिवाळीनिमित्ताने आम्ही जर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठेवला असता तर कार्यालयात गर्दी झाली नसती. निवडणुकीच्या रणांगणात लढणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री फुंकण्यासाठी असाच बहारदार कार्यक्रम ठेवणे गरेजेचे होते. हे करून आम्ही मराठी कलेचा वारसाच जोपासला. त्यामुळे तुम्ही नोटिशीत म्हटल्याप्रमाणे पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

आपला पक्ष सरकारात आहे. अलीकडेच तमाशा कलावंतांसाठी अनेक योजना राबवण्याचे सूतोवाच सरकारकडून करण्यात आले. यातून लावणी या प्रकाराला बळ मिळेल हे नक्की. पक्ष म्हणून आम्ही त्यात हातभार लावला तर त्यात गैर काय? महिलेला गाताना बघितले तर चालेल पण नाचताना नाही ही मानसिकताच योग्य नाही या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे ही नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी अशी विनंती आम्ही करत आहोत.’ हे स्पष्टीकरण मिळाल्यावर पक्षाच्या कार्यालयात त्यावर बरीच चर्चा झाली. ते पत्र माध्यमांसमोर जाऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या. तरीही त्याला पाय फुटलेच. ते माध्यमांत प्रसिद्ध झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून राज्यभरातील तमाशा कलावंत व अनेक लावणी सम्राज्ञी पक्षाच्या मुख्यालयात येऊन ‘आमचे कार्यक्रम तुमच्या कार्यालयात आयोजित करा’ म्हणून आग्रह धरू लागल्या. या प्रकाराने सरचिटणीस वैतागलेच!