पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या (१४ नोव्हेंबर १९४९) निमित्ताने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी नोव्हेंबर, १९४९ च्या ‘नवभारत’ मासिकात ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांचे थोर व्यक्तित्व’ या शीर्षकाचा शुभचिंतनपर प्रशस्तिलेख लिहिला होता. याच वेळी राष्ट्रीय पातळीवर एक अभिनंदन हिंदी व इंग्रजीत प्रसिद्ध झाला; त्यातही ‘विशेष लेख’ सदरात तर्कतीर्थांनी ‘भारतीय समाज व्यवस्था के नैतिक आधार’ हा लेख लिहून नेहरू आणि नैतिकता यांचे असलेले अभिन्नत्व रेखांकित केले होते. तोही समग्र वाङ्मयात संकलित आहे.

‘नवभारत’मधील लेख वाचत असताना नेहरूंचे व्यक्तित्व डोळ्यांपुढे येते. ‘‘विशाल नेत्र, निरोगी गौरकाया, तरतरीतपणा, भावुक आविष्कार, उच्च विचार, आधुनिकता इत्यादी गुणांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिमत्त्व कोणाच्याही मनावर खोल ठसा उमटविल्याशिवाय राहात नाही. इंग्लंडसारख्या सुधारलेल्या देशात त्यांचे शिक्षण झाल्यामुळे आधुनिकता त्यांच्या अंगवळणी पडली होती. भारतीय राजकारण हे जागतिक शांततेचे शक्तिपूर्ण साधन कसे बनेल, याची त्यांना चिंता असे. नेहरूंचे व्यक्तित्व समर्पणपरायण (समर्पित) आहे, अशी तर्कतीर्थांची धारणा होती. आपल्या वडिलांप्रति नेहरूंची भावना प्रभु रामचंद्राची होती. जिथे श्रीमंती असते, तिथल्या बापाचा दरारा असाधारण असतो; पण वडील मोतिलाल याला अपवाद होते. या घरात लक्ष्मी नि सरस्वती एकत्र नि सुखेनैव नांदत होत्या. घरची भाषा उर्दू. हिंदी त्यांनी नंतर आत्मसात केली. त्यामुळे नेहरूंचे व्यक्तित्व उर्दू, हिंदी, इंग्रजी अशा त्रिभाषा समन्वयाने हिंदू, मुस्लीम नि पाश्चात्त्य संस्कृतीचे संगमस्थल बनली होती.

महात्मा गांधीप्रणीत असहकार आंदोलनात नेहरूंचे चरित्र सार्वजनिक बनले. पित्याच्या मृत्यूची (१९३१) जागा नेहरूंच्या जीवनात महात्मा गांधींनी भरून काढली; पण पत्नी कमलादेवींची जागा मात्र त्यांच्या मृत्यूनंतर (१९३६) रिकामीच राहिली. नेहरूंचे नवपाश्चात्त्य व्यक्तित्व स्वातंत्र्य चळवळीत अप्रतिहतपणे लोकांच्या हृदयात उमटत राहिले. त्यांच्या भाषणाचा करिष्मा काँग्रेसच्या लखनऊ अधिवेशनात (१९३६) भारतीयांच्या प्रत्ययास आला. १९२० ते १९४९ पर्यंतचा सुमारे तीन दशकांचा त्यांचा राजकीय प्रवास अनेक संघर्षांतून होत राहिला.’’ या प्रवासात नेहरू ‘समरधीर वीर’ सिद्ध झाल्याची कबुली तर्कतीर्थांनी दिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तेच नेहरू पंतप्रधान म्हणून राजकीय मुत्सद्दी झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणातील त्यांची देशाचे कर्णधार म्हणून असलेली भूमिका दूरदृष्टीची होती. त्याचा दाखला देत तर्कतीर्थ स्पष्ट करतात की, नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर समाजवादास बर्फाच्या पेटीत बंदिस्त करून ठेवले. काश्मीरप्रश्नी त्यांचे धोरण तत्कालीन परिस्थिती पाहता युद्ध टाळणारे होते. आज त्याबद्दल काही लोक नेहरूंवर दुगाण्या झाडत असतात, तेव्हा वाईट वाटते.

पंतप्रधान म्हणून नेहरूंनी भारतास त्रुरुक्षेत्र होऊ दिले नाही. नेहरू एक समर्पणपर व्यक्तिमत्त्व म्हणून सतत संयमीच राहिले. ते मार्क्सपेक्षा बुद्धाचे अनुयायी होते. भगवान गौतम बुद्धाचे शिष्य सारीपुत्त, मोग्गलान यांचे अवशेष नेहरूंच्या काळात भारतात आणून जतन करण्यात आले. त्या अवशेषांचे स्वागत करतानाचे एक छायाचित्र तत्कालीन वृत्तपत्रांत झळकले होते. त्यातून नेहरूंप्रति प्रत्येकाच्या मनात असलेला आदरभाव अधोरेखित होत राहतो. नेहरूंना ६१व्या वर्षात पदार्पण करताना त्यांचे शुभचिंतन करीत तर्कतीर्थ लेखाच्या शेवटी म्हणतात, ‘‘जवाहरलालना ध्येयाचा प्रकाश नित्य लाभावा. उच्च ध्येयवादाच्या स्वप्नमय स्वर्गातून उतरून या भूलोकीच्या क्षणभंगुर राजकीय डावपेचात ते न सापडोत. डोके शाश्वत ध्येयवादाच्या स्वर्गात व पाय भूलोकावर टेकलेले, अशी त्यांची थोर मूर्ती ६१ व्या वाढदिवसानंतर अधिकाधिक भव्य बनावी, अशी आशा मी व्यक्त करतो.’’ यातही नेहरूंप्रति तर्कतीर्थांचा श्रद्धाभावच प्रकट होतो.

नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचे इच्छापत्र हृदयस्पर्शी ठरले होते, ते एकाच कारणामुळे. त्यांनी आपली राख शेतात पसरली जावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर हिंदी कथाकार भीष्म सहानी यांची ‘भटकती राख’ ही कथा आहे. त्यात ही राख सतत चमकत राहात असल्याचे वर्णन आहे. ही चमक नेहरूंच्या समर्पणाची होती!

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com