देशप्रेमाचा वसा घेतलेल्या तमाम भक्तांनो, गेल्या तीन-चार दिवसांपासून तुमची होणारी चिडचिड, समजण्यासारखी. काय गरज होती त्या अंबानींना रिहानाला बोलावण्याची? तीन वर्षांपूर्वी आंदोलक शेतकऱ्यांची कड घेणाऱ्या या पॉपगायिकेवर देशद्रोहाचा शिक्का मारलाय हे त्यांना निश्चित ठाऊक असेल. तरीही त्यांनी कोटय़वधी रुपये मोजून तिला बोलवावे हे कोणत्याही देशभक्ताला पटणारे नाहीच. पण तरीही कुणी बोलण्याची हिंमत करण्याचे ठरवले तर भक्तसेनाप्रमुखांकडून कान टोचले जाण्याची भीती. त्यामुळे सहनही होत नाही व सांगताही येत नाही अशी साऱ्यांची अवस्था झालेली.
जो जो देशाच्या विकासाच्या (फक्त विश्वगुरू करत असलेल्या) आड येईल त्याला देशविरोधी ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आणि तुम्हालाच. तुमच्याकडून हे विरोधाचे लेबल लागले की साऱ्या देशाने त्याचे पालन करायलाच हवे. त्याला छेद देण्याचे धैर्य (मोजके छिद्रान्वेषी विरोधक वगळता) कुणातच नाही. तरीही देशविकासाचा सतत ध्यास घेतलेल्या अंबानींनी ती रीत मोडली हे न पटणारेच. कशाला हवी यांना रिहाना? सतत देशभक्तीचा जागर करणारे शेकडो गायक आहेत की देशात. पाठकांची फाल्गुनी, ठाकूरांची मोनाली, कक्करांची नेहा, दयालांचा बेनी, चौहानांची सुनिधी, सिंगांचा हनी हे आहेतच की. कमी पैशात काम भागले असते व रिहानावर चिकटवलेला आरोपही कायम राहिला असता. देशप्रेमींना तोंडावर आपटण्याचा अधिकार कुणा एका कुटुंबाला नाहीच भक्तांनो!
तुमच्याच वरिष्ठांच्या निर्देशावरून तेव्हा देशभरातील कलावंत, खेळाडूंनी रिहानाविरुद्ध संताप व्यक्त केला होता. सचिन, अक्षय, देवगणांचा अजय यांना तर जामनगरला समोरच्या रांगेत बसून रिहानाचे गाणे ऐकावे लागले. काय अवस्था झाली असेल त्यांची? देशद्रोह्यांची अदाकारी शांतपणे बघणे व उपस्थितांच्या सुरात सूर मिळवत टाळय़ा वाजवणे ही राष्ट्रप्रेमींसाठी शिक्षाच. या शिक्षेविरुद्ध बोलताही न येणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. किमान याची तरी काळजी अंबानींना असायला हवी होती. देशातील काही बोटावर मोजण्याएवढय़ा विरोधकांना हाताशी धरून परकीय शक्ती देशविकासात खोडा घालत आहेत, हे विश्वगुरूंनी वारंवार कथन केलेले सत्य. रिहाना याच सत्याची प्रतिनिधी. त्यामुळे तिने तेव्हा देशविरोधी व आंदोलनजीवी शेतकऱ्यांची बाजू घेताच तिचा सारा मजकूर तेव्हाच्या ट्विटरवरून हटवण्यात आला. आता भारताचे व भारतमातेच्या दर्शनाचे दरवाजे बंद अशीच समजूत तिने करून घेतली. तो दरवाजा उघडण्याची काही गरजच नव्हती अंबानींना.
आता होईल काय की तुम्ही देशद्रोही ठरवलेले परदेशातील सारे मान्यवर (नाइलाजाने वापरावा लागलेला शब्द) कुणा उद्योगपतींच्या मार्गाने देशात येऊन स्वत:ला पवित्र करून घेतील. हे धोकादायक, याची जाणीव साऱ्या समाजमाध्यमी समुदायाला झालीय भक्तांनो! तेव्हा यावर तातडीने उपाय शोधून काढण्यासाठी एकत्रित येऊन मंथन, प्रबोधनाची गरज आहे. त्यासाठी या नवसमुदायाच्या वतीने तुम्ही पुढाकार घ्याल अशी आशा!