‘और क्या क्या करवाओगे मुझसे?’ असे म्हणत राहुल गांधी जोरात शिंकले तसे त्यांच्या सभोवती गोळा झालेले सल्लागारांचे कोंडाळे मागे सरकले. त्यातल्या काहींनी आत जाऊन नवा नॅपकीन त्यांच्या हातात ठेवला. दोघे जण विक्स व बामची डबी त्यांना देऊ लागले. तिसऱ्याने वाफारा घेता का म्हणून विचारले. शिंकांचा जोर थोडा कमी झाल्यावर मुख्य सल्लागार हळूच म्हणाला, ‘बिहारमधल्या तुमच्या त्या डुबकीमुळे मासेमारांची सर्व मते आता आपल्याच पारड्यात. तशी ही देशभर आढळणारी जमात, त्यामुळे बंगाल व आसाममध्येही याचा फायदा होईल.’ यावर राहुल ताडकन म्हणाले, ‘म्हणजे तिथेही डुबक्याच मारायच्या का?’ हा प्रश्न ऐकून सारेच गप्प. कुणाचीही बोलण्याची हिंमत होईना.
मग एक हळूच म्हणाला, ‘तुम्ही देशभर पायी चालूनसुद्धा ठणठणीत राहू शकता हे सिद्ध केले आहेच. तसेच आता वारंवार डुबकी मारूनही तुम्हाला काही होत नाही हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तुम्ही करायला हव्यात. नियमित पोहणे वगैरे.’ हे ऐकून राहुलजींना जोरदार शिंक आली. त्यातून कसेबसे सावरल्यावर ते म्हणाले, ‘अरे, व्यायाम, चालणे, पोहणे यातच वेळ घालवू का? मग पक्षवाढीचे काय? त्यासाठी वेळ केव्हा काढायचा? तुम्ही यार, योग्य सल्ला देतच नाही मला. पक्षातल्या वृद्धांना सोडून मी तुमच्यावर विश्वास टाकला, पण अजून म्हणावे तसे यशच येत नाही.’ यावर खोलीभर शांतता पसरली. मग त्यांचा शिंकांचा जोर थोडा कमी झाला हे बघून मुख्य सल्लागाराने बोलायला सुरुवात केली.
‘हे बघा राहुलजी, पक्ष वाढावा म्हणून तुम्ही आमच्या सांगण्यावरून खूप मेहनत करता यात वाद नाही. आता त्याच मेहनतीला थोडा आकार देण्याची वेळ आलेली. म्हणजे असे की, तुम्ही समाजातले सर्व घटक पक्षाशी जुळावेत म्हणून ठिकठिकाणी जाता. कधी गॅरेजमध्ये, कधी ट्रकमध्ये, हलवायाच्या दुकानात जाता, जिलेबी तळता, मोच्याकडे जाऊन बूट कसे शिवतात ते बघता, सलूनमध्ये जाता, धाब्यावर जाता, सकाळची वेळ असेल तर लोकांमध्ये जाऊन दंडबैठका मारता. हे सगळे उपक्रम स्तुत्यच, त्यात काही वाद नाही पण या सर्वांना एकत्र बांधणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे धर्म. त्यासाठी तुम्ही जाल तिथे तीर्थक्षेत्र गाठून नदीत डुबकी मारली की झाले सगळे आपले. प्रत्येकाकडे स्वतंत्रपणे जाण्याची गरजच नाही. ते विश्वगुरू हेच तर करतात.’
हे ऐकताच राहुलजींचे डोळे चमकले. ते उत्सुकता दाखवताहेत असे लक्षात येताच मग एकेक करत सारेच त्यांना सल्ला देऊ लागले. ‘हवे तर तुम्ही याला धर्माची नाही तर लोकशाहीची डुबकी म्हणा, पण त्यातून जो संदेश जायचा तो जातोच. आता पुढे टीशर्ट घालून कधीच डुबकी मारायची नाही. ते काढायचे. अंगात जानवे दिसायला हवे. मीही जानवेधारी व माझे गोत्र दत्तात्रय असे तुम्ही म्हटलेलेच. खाली पँट नको. धोतर हवे. जानवे डावीकडून उजवीकडे घातलेले हवे. एकदा का ही डुबकी सुरू झाली की तुमच्यावर विरोधक मौंज न झालेला ‘व्रात्य’ अशी टीका करतील. त्याला उत्तर म्हणून आपण तुमची मौंज करून टाकू. मग बघा धर्मवादी पक्ष कसे बिथरतात ते. हे करताना तुम्ही अल्पसंख्य व मागासांच्या मतांची चिंता अजिबात करू नका. ते आपल्याला सोडून कुठेच जात नाहीत.’ हे ऐकताच राहुलजी खूश झाले. त्यांची सर्दी कुठल्या कुठे पळाली. मग ते सोवळ्याचे धोतर कसे नेसायचे याचा सराव करू लागले.
