‘माय लॉर्ड, माझ्यासाठी सर्वोच्च असलेल्या या जनतेच्या न्यायालयात खुशमस्करी करून पद मिळवले असा जो आरोप ठेवण्यात आलाय त्याचे खंडन करण्यासाठी मी उभा आहे. आजवर मी इतरांसाठी अनेकदा युक्तिवाद केले पण ‘तगडे’ शुल्क न आकारता स्वत:साठी तो करण्याची ही पहिलीच वेळ. माझे नावच ‘उज्ज्वल’ असल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील माझी कारकीर्द चढत्या क्रमाची राहील यासाठी मी आयुष्यभर ठरवून प्रयत्नशील राहिलो. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या बिनदिक्कतपणे केल्या. काही लोक याला तडजोडी म्हणतात पण मी मात्र याला डावपेच समजतो.

माझी पार्श्वभूमी राजकीय. वडील आमदार होते. मला सहज राजकारणात जाणे शक्य होते पण मी मात्र वकिलीचे कौशल्य वापरून राजकारण्यांना वश करायचे असे ठरवले होते. हे कौशल्य न्यायालयातच वापरायचे असते या समजाला मला तडा द्यायचा होता. कायद्याचे कमीत कमी ज्ञान वापरून भरपूर प्रसिद्धी मिळवायची असेल तर देशद्रोह, अतिरेकी कारवायांशी संबंधित खटले सरकारच्या वतीने लढवले पाहिजेत हे लक्षात येताच मी राज्यकर्त्यांच्या वर्तुळात ऊठबस सुरू केली. माझी स्वत:ची अशी राजकीय विचारांची बैठक कधी नव्हतीच, त्यामुळे मला हे सोपे गेले. आता याला कुणी चमचेगिरी म्हणत असेल तर माझा नाइलाज आहे. त्यामुळे मला काँग्रेस आघाडी सरकारच्या वर्तुळात सहज प्रवेश मिळाला. तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. आबांचा मी लाडका झालो. मुंबई बॉम्बस्फोट (१९९३) खटला लढवला पण अखेरच्या क्षणी सीबीआयने त्यांचा वकील उतरवल्याने माझ्या महत्त्वाकांक्षेला ठेच लागली. सत्तेसोबत राहायचे म्हणून तेव्हा वाच्यता केली नाही.

नंतर कसाबचा खटला मला मिळाला. अशा खटल्यांमध्ये दोषसिद्धीसाठी कायद्याचा खूप कीस पाडावा लागत नसला तरी देशप्रेमाने ओतप्रोत भाषा वापरावी लागते. हे मलाच जमू शकते यावर मी ठाम आहे व यामुळेच माझ्या पदरात खासदारकी पडली. कसाबचा खटला यशस्वीपणे लढूनसुद्धा खासदारकी मात्र मेमनच्या वाट्याला गेली तेव्हा मला वाईट वाटले. त्याच उद्वेगातून मी कसाबला तुरुंगात बिर्याणी खाऊ घातली जात आहे, असे विधान धूर्तपणे केले. याचा फायदा विरोधकांना होईल व ते सत्तेत येण्यास मदत होईल याची चाहूल मला लागली होती. तसेच घडले. बिर्याणीचा घाव वर्मी लागला. तुरुंगात असे खाण्याचे चोचले पुरवले जात नाहीत हे ठाऊक असूनही हे विधान का केले हा माझ्यावरचा आरोप पूर्णांशाने खरा नाही. त्याला फाशी का देत नाहीत हा हेतू होताच पण मेमनचा मुद्दाही मनात धुमसत होताच. राजकीय फायद्यासाठी सार्वजनिकरीत्या वकिली कौशल्य वापरून बोलण्यात काहीही गैर नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला राज्यसभेवर संधी मिळाल्यानंतर मोदींनी फोन करून मराठीत बोलू की हिंदीत असे विचारले. यावरही काहींचा आक्षेप, पण खातरजमा करायची असेल तर जा व मोदींना विचारा असा माझा युक्तिवाद आहे. यशासाठी डावपेच लढवण्यात काहीही गैर नाही. त्यामुळे या आरोपातून माझी मुक्तता करावी. दॅट्स ऑल युवर ऑनर.’ युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी पाच मिनिटांचा वेळ घेतला व म्हणाले ‘उज्ज्वल‘जी’ यांनी स्वत:चा बचाव करताना बुद्धिचातुर्य वापरले पण त्यात तर्कशुद्धता नाही. त्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात येत आहे.’ नेमके त्याच वेळेस नवनियुक्त खासदार झोपेतून जागे झाले. बघतात तर त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता.