नुसता निषेध नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच सरकारचा त्रिवार निषेध! या देशातल्या नागरिकांनी काय खावे व काय प्यावे या धोरणांतर्गत तुम्ही जोवर ‘बीफ’सारखे मुद्दे घेऊन अल्पसंख्याकांना लक्ष्य करत होतात, तोवर ते आम्हाला मान्य होते. पण, आता तुम्ही थेट समोसा, कचोरी, वडापाव व जिलेबीच्या माध्यमातून आमच्या खाद्यासंस्कृतीवरच घाला घालायला निघालात हे मान्य नाही. तुमच्या प्रत्येक निर्णयाला डोळेे मिटून पाठिंबा देणाऱ्या आमच्यासारख्या निस्सीम भक्तांवर हे हानीकारक पदार्थांचे पत्रक लादले जाईल याची कल्पनाही आम्ही केली नव्हती.

एकीकडे जे जे स्वदेशी ते उत्तम अशी भाषा करायची व दुसरीकडे विदेशी खाद्यापदार्थ सोडून भारतीय पदार्थांना लक्ष्य करायचे हा कुठला न्याय? धोकादायक ठरवायचेच आहे तर मावा जिलेबीला ठरवा ना. निदान ती काळी तरी आहे. देशातले अल्पसंख्य दिवसभराचा उपास सोडताना ती खातात. तेही वर्षातून एक महिनाच. मग वर्षभर खाल्ली जाणारी व भगव्या रंगाशी जवळीक साधणारी जिलेबी तुम्हाला आठवलीच कशी? या देशाच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या गुजराती बांधवांनी आता काय नुसता फापडाच खायचा काय?

अर्ध्या मुंबईची भूक वडापाव भागवतो. चालता चालता पोट कसे भरावे याचे हे उत्तम उदाहरण. हळूहळू सारी मुंबई सरकारची ‘दिवानी’ होत असताना तिथल्यांच्या पोटावर पाय देण्याचे कारण काय? नेहमी तुम्हाला फाट्यावर मारणाऱ्या दक्षिणेतील सांबारवडा, दोसा, उत्तपमवर तुमची नजर का जात नाही? सारा उत्तर भारत गेल्या दहा वर्षांपासून तुमच्या मागे भक्कमपणे उभा ठाकलेला. समोसा व कचोरीशिवाय त्यांचे पान हलत नाही. त्यालाही धोकादायक ठरवण्याचा खेळ कशाला खेळता? तुम्हाला बिहारची निवडणूक जिंकायची नाही की काय? हे सारे पदार्थसुद्धा भगव्या रंगाची आठवण करून देणारे. हाच रंग तुमचा त्राता. याची जाणीव तुम्हाला नाही काय?

हिरव्या रंगाची मिठाई, तुम्हाला सतत आव्हान देणारा तो बंगाली रसगुल्ला यात साखरेचे प्रमाण भरपूर असते हे तुम्हाला दिसले नाही काय? सर्व पातळीवर विरोधकांना ठेचायचे कसे याचे ज्ञान केवळ तुमच्याकडेच आहे असे आम्ही आजवर समजत होतो. मग त्यांना सोडून आमच्यासारख्या भक्तांच्या पोटावर पाय का? साखर आहे, फॅट्सचे प्रमाण अधिक आहे म्हणून उद्या तुम्ही चहाचा समावेश या यादीत कराल काय? मग आम्हाला सदैव प्रेरणा देत असलेली वडनगरच्या चहाची कथा दुसऱ्यांना सांगायची कशी? म्हणे भारतात लठ्ठ माणसांची संख्या वाढत आहे. अरे एवढीच काळजी असेल तर योग व व्यायाम करायला सांगा ना! विश्वगुरूंनी सांगितले तर ऐकूच की आम्ही. उगीच हे पदार्थ ‘लक्ष्य’ कशाला? उलट हे पदार्थ जागतिक पातळीवर कसे जातील, तेथील मॉल्स व स्टोअर्समधून त्याची विक्री कशी होईल याकडे लक्ष द्या ना! तेव्हाच देशाची मान जगात अधिक उंचावेल. विश्वगुरूंचे हे स्वप्न साकार करण्याऐवजी त्यांनी दहा टक्के तेलवापर कमी करा, असे सांगितले म्हणून लगेच असा प्रतिसाद देणे योग्य कसे ठरवता येईल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे जे आरोग्यास हानीकारक ते ते भारतीयांच्या आवडीचे हेच देशाचे सूत्र आहे. मग ती सिगारेट असो की हे पदार्थ. हे लक्षात न घेता असले फुकटचे उपद्व्याप करायला सांगितले कुणी तुम्हाला? हानीकारकची ही वर्गवारी ताबडतोब मागे घ्या अन्यथा निवडणुकीत आम्ही भक्तपदाचा त्याग करायला मागेपुढे बघणार नाही, हे लक्षात असू द्या. तुमच्या प्रयोगासाठी अल्पसंख्य आहेत की देशात भरपूर. बहुसंख्याकांना त्रास कशाला?