शिस्तप्रिय असल्याने बाहेर पडण्याची सवलत मिळालेला भारतीय घोडदळातील एक घोडा नेहमीप्रमाणे सकाळी फिरून तबेल्यात परतला तेव्हा त्याच्या तोंडात एक इंग्रजी वर्तमानपत्र होते. मुख्य प्रवेशद्वारावर पेंगत असलेल्या सुरक्षा जवानाला दिसणार नाही अशा बेताने तो आत आला तेव्हा पाग्यातून मोकळे झालेले सर्व घोडे त्याच्याकडे कुतूहलाने बघू लागले. नेहमी नवी बातमी घेऊन येणारा हा आज काय सांगतो याची उत्सुकता साऱ्यांच्या चेहऱ्यावर होती. थोडा दम घेतल्यावर दोन्ही नाकपुडय़ा फुरफुरून तो सांगू लागला. ‘लंडनमधील आपल्या सजातीयांनी काल कमाल केली. स्वत:ला उधळून लावत ध्वनिप्रदूषण प्रश्नावर साऱ्या देशाचे लक्ष वेधले. सैनिक असलो म्हणून काय झाले, आपणही हाडामांसाचे जिवंत प्राणी आहोत. होणाऱ्या त्रासाकडे जगाचे लक्ष वेधले पाहिजे. इथेही प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे तुम्हा सर्वाना ठाऊक आहेच. त्यापासून होणाऱ्या त्रासाची सवय भलेही माणसांनी करून घेतली असेल, पण आपण ती का करून घ्यायची? त्यामुळे निषेधाचा हा प्रकार येथेही राबवायला हवा’

हे ऐकताच त्याच्याभोवती जमलेले एका सुरात खिंकाळले व साऱ्यांनी शेपटी हलवून अनुमोदन दिले. मग वर्तमानपत्रातील बातमीचे सामूहिक वाचन झाले. सेंट्रल लंडनमधील बकिंगहम पॅलेसपासून सुरू झालेला व लाइम हाऊसपर्यंत चाललेला तो उधळण्याचा थरार ऐकून सारेच शहारले. आता इथे, भारतात कसे उधळायचे यावर चर्चा सुरू होताच एकेक शंका समोर येऊ लागल्या. त्यातला एक म्हणाला ‘उधळणे सुरू झाल्यावर लंडनवासीयांनी जशी भूतदया दाखवली तशी इथे दिसणे केवळ अशक्य. येथे साध्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली जात नाही. तिथे आपली किंमत लोक करतील, समजून घेतील असे वाटत नाही.’ मग दुसरा दुजोरा देत म्हणाला ‘बरोबर. आपण रस्त्यावर निषेधासाठी उतरलो हे कुणाला कळणारच नाही. येथे तशीही जॉर्ज आर्वेलची ‘अ‍ॅनिमल फार्म’ वाचणाऱ्यांची संख्या कमीच. प्रदूषणाने सैरावैरा पळायचे असते हे विसरून गेलेले भारतीय आपल्यामुळे सैरावैरा पळतील व चेंगराचेंगरी होईल’ तिसरा म्हणाला ‘त्यात कुणी दगावले तर सारा दोष आपल्यावर ढकलला जाईल. सर्वत्र

टीकेची झोड उठवली जाईल. तबेल्यात परतल्यावर कोर्टमार्शलला सामोरे जावे लागेल ते वेगळेच.’

चौथा बोलू लागला ‘भारतात रस्त्यावरून जाणारा प्रत्येक जण प्रचंड घाईत असतो. त्यामुळे कुणीही आपल्याकडे सहानुभूतीने बघणार नाही. आवरत नसतील तर गोळय़ा घाला पण रस्ता मोकळा करा असाच ओरडा बहुतांश करतील. आपल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले तर भरपाईचे खटले भरतील. हा शेजारच्या शत्रूराष्ट्राने रचलेला कट असा आरोप करून आपल्याला देशद्रोही ठरवतील.’ मग पाचवा बोलला ‘याची सीबीआय, ईडीकडून चौकशी करा अशीही मागणी होईल. शेवटी ‘नॉनइश्यू’चा ‘इश्यू’ करण्यात हा देश तरबेज आहेच की’ शेवटी सहावा म्हणाला ‘घोडय़ांचे बंड हा व्यापक कटाचा भाग आहे असे मथळे छापून येतील. तबेल्यासमोर निदर्शने होतील. त्यातून ध्वनिप्रदूषणाचा त्रास आणखी वाढेल. आपण हे कशासाठी केले यावर कुणीही विचार करणार नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे सर्व ऐकून वर्तमानपत्र घेऊन आलेल्या घोडय़ाने रागारागात ते पायाखाली चिरडून त्याचे रद्दीत रूपांतर केले व म्हणाला ‘हे भोग आपल्या वाटय़ाला येत असतील तर व्यवस्थेचे लक्ष वेधण्यापेक्षा शांत बसणेच केव्हाही चांगले’ हे ऐकताच सारे घोडे निमूटपणे पाग्यात परतले.