एखादी व्यक्ती कधी देशाची अंतर्गत गुप्तचर प्रमुख असते, त्यानंतर गुप्तहेर यंत्रणेची प्रमुख बनते आणि या दोन्ही जबाबदाऱ्या पाडण्याच्या आधी प्रदीर्घ काळ न्यायाधीशही असते, तेव्हा ती नक्कीच एखाद्या हुकूमशाही वा साम्राज्यशाही देशातील प्रभावी व्यक्ती असण्याची शक्यता बळावते. पण विल्यम वेबस्टर यांच्याबाबत असा अन्वयार्थ निघू शकत नाही. कारण ही पदे त्यांनी अमेरिकेसारख्या लोकशाही देशात भूषवलेली आहेत. आयुष्याची शंभरी ओलांडून एकशे एक वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगून नुकतेच ते निवर्तले, त्यावेळी ‘अमेरिकेच्या एफबीआय आणि सीआयए या अनुक्रमे गुप्तचर व गुप्तहेर यंत्रणांचे प्रमुखपद भूषवलेले एकमेवाद्वितीय’ हे बिरुद त्यांनी अजरामर केले. वेबस्टर यांनी एफबीआय आणि सीआयए म्हणून केलेल्या कामाची चिकित्सा होत राहीलच. पण त्यांचे सर्वाधिक अमीट योगदान प्रस्तुत काळात अधिक लक्षवेधी ठरते. सन २०२०मध्ये अमेरिकेतील जवळपास १३० माजी गुप्तहेर, गुप्तचर अधिकाऱ्यांनी एक निवेदन प्रसृत केले, ज्यात डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवण्यास अयोग्य आहेत असे ठासून सांगण्यात आले. त्या गटात विल्यम वेबस्टर हे नाव प्रमुख होते!
विल्यम वेबस्टर १९८७ ते १९९१ या काळात सीआयए या अमेरिकेच्या प्रमुख गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख होते. तत्पूर्वी १९७८ ते १९८७ या काळात ते एफबीआय या अमेरिकी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे प्रमुख होते. तरीदेखील एफबीआयचे प्रमुख म्हणून वेबस्टर यांची कारकीर्द अधिक गाजली. ती का ते समजून घेणे रंजक ठरेल.
कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेची वैगुण्ये जगभर जवळपास सारखी असतात, मग संबंधित देश लोकशाहीप्रधान असो वा नसो. राजापेक्षा राजनिष्ठा श्रेष्ठ या अलिखित नियमानुरूप अशा यंत्रणांचे प्रभारी वावरत, आचरत असतात. वेबस्टर हे विचारांनी रिपब्लिकन, पण त्यांची एफबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती ज्यांनी केली ते अध्यक्ष जिमी कार्टर होते डेमोक्रॅट. तो काळच असा होता. एफबीआय अत्यंत बदनाम झाली होती. एफबीआयचे पहिले प्रमुख जे. एडगर हूवर यांचा या संस्थेवर १९३६ ते १९७२ अशी साडेतीन दशके निरंकुश अंमल राहिला. नंतरचे प्रमुख क्लॅरेन्स केली यांच्या काळात एफबीआयची अपकीर्ती वाढली होती. पाळतशाही, निवास व संपर्क घुसखोरी, सूडबुद्धीतून लक्ष्य करणे, राजकीय विरोधकांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करणे अशा अनेक उद्याोगांना हूवर यांनी अभय दिले. वंशभेदाविरुद्ध लढणाऱ्या रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर व त्यांच्या समर्थकांना एफबीआयने लक्ष्य केले. डाव्या विचारधारेचे नेते व त्यांच्या कुटुंबीयांना धास्तीत ठेवले. कायदापालन करणारी अमेरिकेतील सर्वांत प्रमुख यंत्रणाच कायदाभंजनात गर्क होती. तपास आणि अन्वेषण या मूलभूत उद्दिष्टांचा एफबीआयला विसर पडला होता. ही परिस्थिती वेबस्टर यांनी बदलली. संघटनेला शिस्त लावली. कार्टर यांच्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले रोनाल्ड रीगन यांनीही वेबस्टर यांनाच पसंती दिली. एफबीआयचे प्रमुख म्हणून १९८७मध्ये ते निवृत्त झाले, तेव्हा रीगन यांनी त्यांना सीआयए या प्रमुख हेरयंत्रणेच्या प्रमुखपदी नेमले. तेथेही त्यांनी तोवर उन्मत्त बनलेल्या सीआयएला शिस्त लावली.
वेबस्टर हे कायद्याचे डॉक्टरेट. त्यांनी अनेक वर्षे न्यायाधीश म्हणूनही काम केले. न्याय हा त्यांच्या कार्यशैलीचा आत्मा होता. न्यायप्रक्रियेविषयी विश्वास निर्माण करणे ही तपास यंत्रणांचीही जबाबदारी असते असे मानणाऱ्यांपैकी ते एक होते.