भरतनाट्यम ही भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रतिष्ठित शास्त्रीय नृत्यशैली. या नृत्यकलेला आधुनिक काळात एक नवा आयाम देणाऱ्या, तिला शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या नवा पाया घालणाऱ्या व्यक्तींमध्ये ‘अल्लादी सारदा’, म्हणजे ‘सारदा टीचर’ किंवा ‘चिन्ना सारदा’ यांचा समावेश होतो. त्यांनी कधीही आपल्या नावापुढे ‘गुरू’ हा शब्द वापरू दिला नाही, त्या ‘सारदा टीचर’ म्हणूनच ओळखल्या जाण्याला प्राधान्य देत.
१५ जून १९२९ रोजी अड्यार येथील थियोसोफिकल सोसायटीच्या परिसरात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्या कलाक्षेत्राशी जोडल्या गेल्या होत्या. परिणामी, त्यांच्यात नृत्याविषयीची आवड, तळमळ आणि निष्ठा निर्माण झाली. रुक्मिणी देवी अरुंडेल, पंडनल्लूर चोक्कलिंगम पिल्लई आणि गौरी अम्मा यांच्याकडून त्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले. तर गुरू अंबू पनिकर आणि चंदू पनिकर यांच्याकडून त्यांनी कथकलीचे शिक्षण घेतले. १९४७ साली त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि कलाशिक्षिका व नृत्यांगना म्हणून कारकीर्द सुरू केली.
सारदा टीचर यांनी आयुष्यभर ‘कलाक्षेत्र’ या संस्थेत भरतनाट्यम शिकवले. या नृत्यप्रकाराची एक शास्त्रशुद्ध पद्धती विकसित केली. हीच पुढे ‘कलाक्षेत्र पद्धती’ म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली. त्यांचे एक महत्त्वाचे योगदान म्हणजे विविध पारंपरिक गुरूंकडून आलेल्या शैली, पद्धती आणि तंत्रांना एकत्रित करून त्यांनी एक प्रमाणबद्ध शैक्षणिक चौकट तयार केली. भरतनाट्यमचे हातवारे, पदन्यास, तालबद्धता, अभिनय आणि अभिव्यक्ती या सर्व अंगांना त्यांनी काटेकोर शिस्त दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भरतनाट्यम शिकवण्याची आणि शिकण्याची एक शैक्षणिक, सर्वमान्य प्रणाली निर्माण झाली.
त्यांनी ‘कुमारसंभवम्’मधील पार्वती, ‘कुत्राल कुरवांची’मधील वसंतवल्ली, ‘आंडाळ चरितम्’मधील आंडाळ यांचे सादरीकरण केले. ‘कलाक्षेत्र’च्या ‘रामायण’ या नृत्यमालिकेतील ‘श्रीराम वनगमनम्’मध्ये त्यांनी केलेली मंथरेची भूमिका अमर झाली. तसेच ‘पादुका पताभिषेकम्’मध्ये त्यांची अप्सरेची भूमिका केवळ दोन मिनिटांची असली तरी त्यात परिपूर्णता होती. सारदा टीचर यांच्या स्वत:च्या काही नृत्यरचनांमध्ये नाटु पाडल, कुम्मी, कोलाट्टम, तिरुप्पुगळची पदे व भजने यांचा समावेश होतो. ‘मुरुगन तिरुवारुळ’ हे एकमेव पूर्ण नृत्यनाटक त्यांनी रचले; पण इतर नाटकांप्रमाणे ते नियमित सादर झाले नाही.
यामिनी कृष्णमूर्ती, सी. व्ही. चंद्रशेखर, धनंजयन दाम्पत्य, जी. नरेंद्र, शिजीत कृष्णा, पी. टी. नरेंद्रन, शिजीत नांबियार आणि पार्वती यांसारखे अनेक नृत्य कलाकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना १९९६ साली केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच नवी दिल्लीतील समकालीन संस्कृती केंद्राचे पहिले रुक्मिणी देवी पदक त्यांना प्रदान करण्यात आले. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी साधेपणा, काटेकोरपणा आणि नृत्यकलेविषयी असलेली अपार निष्ठा यांचे दर्शन घडवले. त्यांच्या वर्गांमध्ये शिस्त आणि कलात्मकतेचे विलक्षण मिश्रण दिसून येई. विद्यार्थ्यांना त्यांनी केवळ तांत्रिक कौशल्यच दिले नाही, तर नृत्य ही एक साधना आहे, आत्मशोधाची प्रक्रिया आहे, हेही शिकवले.
गेल्या ५० वर्षांमध्ये सारदा हॉफमॅन यांनी नृत्यकलेसाठी उल्लेखनीय सेवा बजावली. त्या ‘कलाक्षेत्र’च्या प्रशिक्षणक्रियेतील मुख्य आधारस्तंभ ठरल्या. संस्थेच्या तंत्रशैलीचा वैशिष्ट्यपूर्ण दर्जा टिकवून ठेवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. १९८९ मध्ये नृत्य विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतरही १९९६ पर्यंत त्या ‘कलाक्षेत्र’मध्ये ‘मानद प्राध्यापक’ म्हणून कार्यरत राहिल्या. १४ सप्टेंबर २०२५ रोजी कॅलिफोर्नियात त्यांचे निधन झाले. त्यांनी विकसित केलेली ‘कलाक्षेत्र’ पद्धती, त्यांचा शिष्यगण यातून त्यांचे कार्य सदैव जिवंत राहणार आहे.