दीडशे वर्षांपूर्वी मुंबईपाठोपाठ सोलापुरात वस्त्रोद्योग सुरू झाला, त्याच वेळी तेलंगणा भागात पडलेल्या दुष्काळामुळे उदरनिर्वाहासाठी तेथील विणकर कुटुंबे सोलापुरात स्थलांतरित झाली. पारंपरिक हातमागावर साडी, धोतरनिर्मितीबरोबर पुढे यंत्रमागावर चादर, टॉवेल, बेडशीटसारखी उत्पादने तयार होऊ लागली. महिला विडय़ा वळून कुटुंबाला आर्थिक हातभार लावू लागल्या. सोलापुरी चादरीला नाममुद्रा मिळाली. हा विणकर समाज पुढे सोलापूरच्या मातीशी एवढा एकरूप झाला की, वस्त्रोद्योग आणि विडी उद्योगासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांतही तेलुगु भाषक विणकरांनी ठसा उमटविला. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रोत्साहनातून या समाजातून राजकीय नेतृत्वाचा उदय झाला. सहकार चळवळीतून तीन सूतगिरण्या उद्योग बँक, हातमाग संस्था महासंघ, सहकारी रुग्णालय अशा अनेक संस्थांची उभारणी झाली. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्रीपदापर्यंत या समाजाची भरभराट झाली. एके काळी सोलापूरच्या स्थानिक राजकारणाची सूत्रे विणकर समाजाचे प्राबल्य असलेल्या शहराच्या पूर्व भागातून हलविली जात. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना त्या काळात पद्मशाली समाजाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागत असे. या विणकर पद्मशाली समाजातून रामकृष्णपंत बेत, गंगाधर कुचन, ईरय्या बोल्ली, नरसय्या आडम आदी नेत्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला. याच मालिकेत धर्मण्णा मोंडय्या सादूल यांचे स्थान उल्लेखनीय होते. शांत, संयमी, सुसंस्कृत, विनम्र आणि विणकर समाजाच्या विकासाची दूरदृष्टी असलेले धर्मण्णा सादूल हे काँग्रेसच्या मुशीतून तयार झाले आणि सहकार चळवळीतही पुढे आले.

सोलापूर जिल्हा सहकारी उद्योग बँकेत सामान्य कर्मचारी राहिलेले सादूल हे पुढे स्वकर्तृत्वावर याच बँकेचे अध्यक्ष झाले. नगरसेवक, महापौरपद भूषविताना १९८९ साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना उमेदवारीची संधी चालून आली आणि ते दोन वेळा खासदार झाले. केवळ विणकरच नव्हे तर संपूर्ण सोलापूरशी त्यांची नाळ जोडली गेली. ५० वर्षांहून अधिक काळ गणेशोत्सवात उद्योग बँक बौद्धिक व्याख्यानमाला भरविली जात असे. यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून विद्याधर गोखले, दाजी पणशीकरांपर्यंत अनेक महनीय वक्त्यांनी विचारपुष्पे गुंफली. त्यासाठी धर्मण्णा सादूल यांचा पुढाकार तेवढाच महत्त्वाचा होता. किंबहुना या माध्यमातून तेलुगु भाषकांची मराठी सारस्वतांसाठी ही सेवा होती. धर्मण्णा सादूल यांनी सोलापूरचे थोर सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक उभारण्यासाठी केलेली धडपड मोलाची ठरली. यंत्रमागधारकांच्या प्रश्नांवर त्यांनी लोकसभेत चिकाटीने पाठपुरावा केला. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याशी त्यांची जवळीक वाढली, मात्र मंत्रिमंडळात सहभागी होण्याची संधी राजकीय कटकारस्थानामुळे हुकली. तरीही त्यांना कधीही खंत वाटली नाही. अलीकडे वाढते वय, आजारपणामुळे ते काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. मात्र शेवटी तेलंगणाचे नेते चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात ओढले गेले. तेथेही ते रमले नाहीत. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील तेलुगु भाषक विणकर समाजाचे प्रतिनिधित्व हरपले आहे.

wild elephant created havoc in the district gadchiroli three women seriously injured in attack
रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ; दोघी गंभीर
1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी