‘चिप’ हा शब्द सध्या इतका सर्वपरिचित झाला आहे की हल्लीचे राजकारणी लोकही एकमेकांची उणीदुणी काढताना ‘मेंदूतला स्क्रू ढिला’ असे न म्हणता ‘मेंदूतली चिप हरवली’ असे म्हणू लागले आहेत! पण संगणकच भारतात नवे होते आणि मोबाइल फोन हातोहाती असतील असे कुणालाही वाटले नव्हते, अशा १९८४ सालात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक क्रांती, संपर्क क्रांती आणण्याचा पण केला आणि खास चिप-निर्मितीसाठी ‘सेमिकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेड’ (एससीएल) या सार्वजनिक उद्याोगाची स्थापना केली. आजही ‘एससीएल’ तगून आहे आणि ‘मंगलयान’ आदी प्रकल्पांसाठी महत्त्वाच्या चिप बनवल्याबद्दल तिचे कौतुकही होत असते… पण १९८९ मध्येच जवळपास नामशेष झालेल्या या ‘एससीएल’ला पुन्हा बरे दिवस दाखवण्याचे श्रेय जर कुणाचे असेल तर ते डॉ. एम. जे. झराबी यांचे! भारतातील पहिल्यावहिल्या (आणि तरीही मायदेशातच राहिलेल्या) मायक्रो-इलेक्ट्रॉनिक वैज्ञानिकांपैकी एक असलेले डॉ. झराबी ९ ऑगस्ट रोजी कालवश झाले.
‘एससीएल’ या सार्वजनिक उद्याोगाच्या मोहाली येथील एकमेव संकुलाला १९८९ मध्ये मोठी आग लागून सारे काही भस्मसात झाले होते. फेरउभारणीची आश्वासने केंद्र सरकारकडून मिळत आणि सरकारच बदलले जाई, अशी स्थिती १९९१ पर्यंत राहिली. मग १९९३ मध्ये डॉ. झराबी यांना याच निव्वळ नामशेष ‘एससीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमण्यात आले. ही ओसाड गावची पाटीलकी नव्हे- एक उजाड संस्था आपल्याला पुन्हा वसवायची आहे, अशा निर्धारानेच डॉ. झराबी कामाला लागले आणि ‘एससीएल’मधून १९९७ पर्यंत पुन्हा उत्पादन सुरू झाले! ‘व्हीएलएसआय’ (व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन)- म्हणजे काही हजार ट्रान्झिस्टरची क्षमता असलेल्या मेमरी चिपचे ते उत्पादन होते. या सरकारी कंपनीच्या प्रमुखपदी डॉ. झराबी २००३ पर्यंत राहिले. किंबहुना, सरकारी लाल फितीचा अनुभव आल्यामुळेच, मुळात वैज्ञानिक असलेले डॉ. झराबी काहीसे उद्वेगाने बाहेर पडले असावेत. नंतर त्यांनी स्वत:च्या दोन कंपन्या स्थापन केल्या. भांडवलाअभावी त्या फार चालल्या नाहीत, पण ‘आपण स्वत: काही करण्याची धमक दाखवली नाही,’ यासारख्या असमाधानापासून डॉ. झराबी मुक्त राहिले. त्यांच्या ज्ञानाचा वापर करण्यासाठी याच क्षेत्रातील अन्य अनेक कंपन्यांनी त्यांना संचालक मंडळावर घेतले.
हे झराबी मूळचे काश्मीरचे आणि या खोऱ्यावर प्रेम करणारे. जन्म १९४७ चा. साठच्या दशकात दूर तत्कालीन बँगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत शिकले, तिथूनच त्या वेळी नवीन असलेल्या मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात संशोधन करून त्यांनी पीएच.डी. मिळवली – त्यांचा प्रबंध त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट ठरला होता. भारत सरकारच्या सेवेत ते तत्कालीन रिवाजानुसार रुजू झाले. संशोधन सुरू ठेवल्यामुळेच ‘इस्राो’ आणि ‘डीआरडीओ’साठी इंटिग्रेटेड सर्किटचे संकल्पन त्यांनी केले. या क्षेत्राची पायाभरणी करणारे संशोधन विदेशांत झालेले असल्याने, त्याची पुनरावृत्ती इथे न करता उपलब्ध संसाधनांतून सर्किट आणि चिप बनवून भारताला स्वावलंबी करणे, हे ध्येय मानून त्यांनी काम केले. यातूनच, डीआरडीओसाठी १९९६ मध्ये ‘गॅलियम आर्सेनिक एनॅबलिंग टेक्नॉलॉजी सेंटर’ची स्थापना करून देऊन सूक्ष्मलहरी-आधारित सर्किट उत्पादनाची सुरुवात त्यांनी करून दिली होती.
अगदी गेल्या महिन्यातच, काश्मिरात नवे चिप उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी नायब राज्यपालांची भेट घेतली होती. ते उभारणे, हीच डॉ. झराबींना आदरांजली ठरेल.