आपल्याला जे आवडते त्याची सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही. त्यासाठी वयाची अट तर मुळीच नसते. पंजाबमधील जालंधर येथील शेतकरी कुटुंबातील फौजा सिंग हे या भावनेचे प्रतीक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या दु:खांच्या मालिकेवर मात करण्यासाठी वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी धावायला सुरुवात केली आणि हाँगकाँगमध्ये वयाच्या १०१व्या वर्षी अखेरचे धावून त्यांनी निवृत्ती घेतली. वयाच्या शंभराव्या वर्षी पूर्ण मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारे ते सर्वांत वयस्कर पुरुष खेळाडू होते. ऑलिम्पिक ज्योत वाहून नेण्याचा मानही त्यांना लंडन मॅरेथॉनमध्ये मिळाला.

जालंधरमधील बियास पिंड येथे फौजा सिंग यांचा जन्म झाला. त्या वेळी भारत पारतंत्र्यात होता. शेतकरी कुटंबातील चार मुलांपैकी ते सर्वांत लहान होते. लहानपणापासून संकटे जणू त्यांच्या पाठी लागली होती. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्यांना चालता येत नव्हते. कमकुवत पायांमुळे लांब अंतरही ते चालू शकत नव्हते. अशातच तरुणपणीच कुटुंबाचे पालनपोषण करण्याची वेळ आल्यावर त्यांनी शेतीला सुरुवात केली. अनेक दु:खद घटनांनी त्यांचे आयुष्य ग्रासले गेले होते. पत्नी आणि मुलीच्या निधनानंतर त्यांना ब्रिटनमध्ये जावे लागले. त्यांचा मुलगा आई आणि बहिणीच्या मृत्यूनंतर रोज स्मशानभूमीत जाऊन बसत असे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी फौजा सिंग यांनी भारत देश सोडला. पूर्व लंडनमधील इलफोर्ड शहरात ते वास्तव्यास होते. पुढे पाचवा मुलगा कुलदीप सिंग याचेही निधन झाले. लहानपणापासून आव्हानात्मक जीवन जगणारे फौजा यांची नशीब जणू परीक्षाच घेत होते. शेवटी ही सगळी दु:खे विसरण्यासाठी फौजा यांनी धावण्याचा निर्णय घेतला. ते पहिली मॅरेथॉन शर्यत धावले तेव्हा त्यांचे वय् ८९ वर्षे होते. पहिली पूर्ण मॅरेथॉन त्यांनी ६ तास ५४ मिनिटांत पूर्ण केली. स्पर्धेतील ९० वर्षांहून अधिक वयोगटात जगातील सर्वोत्तम धावपटूंना त्यांनी ५४ मिनिटांनी मागे टाकले. या पहिल्या शर्यतीनंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितले नाही. भारतीय वंशाचे ब्रिटिश धावपटू म्हणूनच ते ओळखले जात होते. न्यू यॉर्क, टोरांटो, तसेच मुंबई अशा प्रमुख मॅरेथॉन शर्यतींत ते धावले. या सगळ्या प्रवासात त्यांना वैयक्तिक प्रशिक्षक हरमिंदर सिंग यांची पूर्ण साथ मिळाली. फौजा यांनी २००३ मध्ये टोरांटो वॉटरफ्रंट मॅरेथॉन पाच तास ४० मिनिटांत पूर्ण केली. ही त्यांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ होती.

‘टर्बन्ड टोर्नाडो’ या टोपणनावाने ते ओळखले जात. धावण्याबरोबरच ते शीख संस्कृतीचा प्रचार करताना पारितोषिकाची रक्कम विविध धर्मादाय संस्थांना देऊन टाकत. वयाच्या शंभरीत कॅनडात टोरांटो येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी एकाच दिवसात शंभर मीटर, दोनशे मीटर, चारशे मीटर, आठशे मीटर, पंधराशे मीटर, एक कि.मी., तीन हजार मीटर आणि पाच हजार मीटर धावणे अशा विविध आठ शर्यतींपैकी पाच शर्यतींत जागतिक विक्रम प्रस्थापित केले. टोरांटो मॅरेथॉन शर्यतीत ८ तास २५ मिनिटे १७ सेकंद अशी अपेक्षित वेळ असताना ८ तास ११ मिनिटे ६ सेकंदांत त्यांनी ती पूर्ण केली. मात्र, जन्म प्रमाणपत्र सादर करू न शकल्यामुळे फौजा सिंग यांच्या या विक्रमाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अत्यंत साधेपणाने फौजा सिंग आपले आयुष्य जगले. तंदुरुस्ती आणि प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांना खऱ्या अर्थाने समजले होते. त्यांची धाव कायमच युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल. जगभरातील रस्त्यावर धावणाऱ्या या धावपटूचा अंत मात्र त्यांच्या गावात रस्त्यावरील अपघातात व्हावा हे दुर्दैव. तरीही ११४ वर्षांचे त्यांचे प्रदीर्घ आयुष्य चिरंतन प्रेरणादायी ठरेल हे नक्की.