‘प्रत्येक युद्धकैद्याचे शत्रूच्या ताब्यातून सुटून येणे कर्तव्यच असते,’ अशी भावना केवळ व्यक्त न करता तसा प्रसंग प्रत्यक्षात समोर आल्यानंतर त्यानुसार वागणारे ग्रुप कॅप्टन (नि.) दिलीप कमलाकर परुळकर यांचे पुण्यात नुकतेच निधन झाले. देशाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांत लिहावे, असे सोनेरी पान म्हणजे १९७१चे युद्ध. बांगलादेशाची निर्मिती करून भारतीय उपखंडाचा भूगोल या युद्धाने बदलला. भारताच्या तिन्ही सुरक्षा दलांनी अभूतपूर्व कामगिरी करून पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. चार वर्षांपूर्वी या युद्धाच्या विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. या युद्धामधील खूप गाजलेली; पण आज फारशी कुणाला परिचित नसलेली वीरकथा आहे, ती ग्रुप कॅप्टन दिलीप परुळकर यांची.
परुळकर १९६३ मध्ये हवाई दलात रुजू झाले. १९६५च्या युद्धातही त्यांनी भाग घेतला. ६५मधील कामगिरीसाठी त्यांना वायुसेना पदक मिळाले. १९७१च्या युद्धावेळी परुळकर फ्लाइट लेफ्टनंट होते. या युद्धात लढताना त्यांचे विमान पाकिस्तानच्या माऱ्याचे लक्ष्य झाले. विमान निकामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ते विमानातून बाहेर पडले. मात्र, ते उतरले पाकिस्तानच्या भूमीवर. पाकिस्तानात ते युद्धकैदी झाले. भारताच्या हवाई दलाचे १२ अधिकारी पाकिस्तानात युद्धकैदी होते. विंग कमांडर कोएल्हो, स्क्वाड्रन लीडर जाफा, स्क्वाड्रन लीडर कामत, फ्लाइट लेफ्टनंट भार्गव, फ्लाइट लेफ्टनंट तेजवंत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट परुळकर, फ्लाइट लेफ्टनंट ग्रेवाल, फ्लाइट लेफ्टनंट हरीश सिंहजी, फ्लाइट लेफ्टनंट पेठिया, फ्लाइंग ऑफिसर चाटी, फ्लाइंग ऑफिसर कुरुविला, फ्लाइंग ऑफिसर फिरोज यांचा त्यात समावेश होता. युद्धकैदी असताना परुळकर यांनी पाकिस्तानच्या ताब्यातून सुटून भारतात पळून येण्याचा धाडसी बेत आखला. अत्यंत काटेकोर नियोजन केले. या नियोजनानुसार ग्रेवाल आणि हरीश सिंहजी यांच्यासह ते तुरुंगातून बाहेर पडले. कुणाला संशय येऊ नये, म्हणून त्यांनी ताबारेषेकडे (एलओसी) न येता अफगाणिस्तानच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत ते पोहोचलेदेखील होते. मात्र, सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असताना त्यांना पुन्हा ताब्यात घेतले गेले. पुढे १९७२ मध्ये त्यांची पाकिस्तानने सुटका केली. त्यांच्या या धाडसाची सुरस आणि सविस्तर कथा फेथ जॉन्स्टन यांनी ‘फोर माइल्स टू फ्रीडम’ या पुस्तकात लिहिली आहे. तसेच, ‘द ग्रेट इंडियन एस्केप – खुले आसमान की ओर’ नावाचा चित्रपटही त्यावर निघाला आहे.
ग्रुप कॅप्टन परुळकर यांना नंतर १९८३मध्ये हवाई दलामध्ये विशिष्ट सेवा पदक मिळाले. पाकिस्तानच्या तुरुंगातून पळून जाण्याचा प्रसंग या वेळी नमूद करण्यात आला. त्यांनी हवाई दलात बटालियन कमांडर, फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले. हवाई दलातून १९८७ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्याबरोबर तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरलेले ग्रेवाल १९८४ मध्ये हवाई दलातून बाहेर पडले. हरीश सिंहजी विंग कमांडर म्हणून निवृत्त झाले. २००४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची परुळकर यांच्याबरोबर तुरुंगातून पळून जाण्याची कथा एअर चीफ मार्शल पी. सी. लाल यांच्या ‘माय इयर्स इन द आयएएफ’ या पुस्तकात नमूद करण्यात आली आहे.