अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा परराष्ट्रमंत्री न होताही अमेरिकेतील सर्वांत प्रभावशाली महिला राजकारणी ठरण्याचा मान नि:संशय नॅन्सी पलोसी यांच्याकडे जातो. अमेरिकी कायदेमंडळ किंवा काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहाच्या (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज) एकमेव महिला सभापती ही पलोसी यांची सर्वांत महत्त्वाची कायदेशीर ओळख. त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या. या पक्षाने गेल्या काही वर्षांत अनेक खमक्या महिला राजकारणी अमेरिकेला दिल्या. यात हिलरी क्लिंटन, नॅन्सी पलोसी आणि कमला हॅरिस या तिघी अधिक परिचित. हिलरी या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री होत्या, कमला हॅरिस उपाध्यक्ष. दोघींनी अध्यक्षीय निवडणूक लढवली, दोघी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पराभूत झाल्या. ट्रम्प यांचा अमेरिकी राजकारणावरचा वाढता प्रभाव त्या देशातील अनेक लोकशाही मूल्ये, संकेत धुडकावणारा ठरला. अशा वेळी ट्रम्पशाहीला कायदेमंडळातून सनदशीर वेसण घालण्याचे काम पलोसी यांनीच सर्वाधिक प्रभावीपणे केले. पलोसी ८५ वर्षांच्या आहेत आणि त्यांनी २०२७नंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तोवर, कॅलिफोर्निया राज्यात कॅलिफोर्निया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी तब्बल ३९ वर्षे केलेले असेल.

अर्थात इतका प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या त्या अमेरिकेतील एकमेव नव्हेत. त्यापलीकडे विशेषत: प्रतिनिधिगृहासारख्या महत्त्वाच्या सभागृहाच्या पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. २००३ ते २०२३ या काळात त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सभागृह नेत्या होत्या. या दरम्यान जेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत होते, त्या वेळी पलोसी सभापती होत्या. ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’ सभापतीपद त्यांना २००७ मध्ये मिळाले आणि अमेरिकेच्या इतिहासात या पदावरील त्या पहिल्या महिला ठरल्या. एक अत्यंत जबाबदार आणि खमक्या पीठासीन अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती. बराक ओबामा यांच्या काळात ओबामाकेअर आणि जो बायडेन यांच्या काळात पायाभूत सुविधा आणि वातावरण बदलासंबंधी तरतुदींची विधेयके संमत करवून घेण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. उदारमतवाद आणि लोकशाही मूल्ये ही अमेरिकेची ओळख आहे असे त्या वारंवार सांगतात. त्यांच्या काळात अमेरिका विविध स्थित्यंतरातून गेली. एड्स, समलिंगी संबंधांना मान्यतेचा मुद्दा, तंत्रज्ञानातील प्रगती, युद्धकारण, तेथील राजकारणातील ध्रुवीकरण, ट्रम्प यांचा उदय अशा विशाल पटाच्या त्या साक्षीदार. या मुद्द्यांवर उदारमतवादी, मूल्याग्रही भूमिका घेण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.

अमेरिकेच्या लोकशाहीची ताकद केवळ अध्यक्षस्थानी कोणती व्यक्ती आहे, यात नाही. ती तेथील कायदेमंडळातही दिसून येते. ट्रम्पकेंद्री राजकारणात या कायदेमंडळाचे अस्तित्वही क्षीण होऊ लागले आहे. अशा काळात, ट्रम्प यांच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणाची प्रत सभागृहात त्यांच्या मागे उभे राहून आणि जगाच्या देखत फाडून टाकण्याचे धैर्य त्यांनी २०२०मध्ये दाखवले होते. ट्रम्प हे अमेरिकी लोकशाहीसाठी लांच्छनास्पद आहेत, असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पलोसी यांच्या या उत्तरकाळात मात्र कायदेमंडळातील खमका आवाज क्षीण होऊ लागला आहे. रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी होयबा बनले आहेत. आज त्यांचे बहुमत असताना पलोसी सध्या फार काही करू शकत नाहीत. त्यांच्या निवृत्तीनंतर ही परिस्थिती अधिकच खालावण्याची भीती आहे.