काही कामगार कायदे बदलले आणि गिरणी व्यवसायातून स्त्रिया बाहेर फेकल्या गेल्या तेव्हाची गोष्ट. यातील अनेक स्त्रियांनी आपापल्या पातळीवर घरगुती खानावळी सुरू केल्या. त्यांना एकत्र आणून प्रेमा पुरव यांनी ‘अन्नपूर्णा महिला सहकारी सोसायटी लिमिटेड’ ही संस्था सुरू केली. कामाच्या ठिकाणी ताजे, सकस जेवण ही मुंबईतील नोकरदारांची गरज होती आणि या स्त्रिया अर्थार्जनाचे मार्ग शोधत होत्या. ‘अन्नपूर्णा’ने या दोन घटकांची सांगड घातली आणि स्त्रियांच्या स्वावलबनाचे एक मोठे काम उभे राहिले. तेही सक्षमीकरण वगैरे मोठमोठे शब्द चर्चाविश्वातही नव्हते तेव्हा. त्यामागे होते प्रेमा पुरव यांचे मजबूत संघटनकौशल्य आणि सामान्य महिलांसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा.

प्रेमाताईंनी अतिशय लहान वयात त्यांच्या गावच्या म्हणजे गोव्याच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता. पोलीस ज्या पत्रकांचा शोध घेत घरी आले होते, ती त्यांनी प्रसंगावधानाने चक्क झाडाखाली पुरून ठेवली. पुढील एका आंदोलनादरम्यान त्यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. त्यांना बेळगावच्या रुग्णालयात दीड वर्ष आणि पुढे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सहा महिने उपचार घ्यावे लागले. पाय बरे झाल्यावर त्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गोदावरी परुळेकरांकडे पाठवण्यात आले. ‘तिथून मी आले ते त्या सामाजिक कामाची स्वच्छ आणि नितळ दृष्टी घेऊनच,’ असे त्याच सांगत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यांच्याकडे काहीच नाही, अशा स्त्रियांना आधार देणे, जगण्याची कौशल्ये शिकविणे, त्यांचे आर्थिक सबलीकरण हे काम प्रेमाताईंनी आयुष्यभर केले. ‘अन्नपूणा’मार्फत स्वयंरोजगार, शिक्षण, घरदुरुस्ती यासाठी स्त्री-पुरुषांना विनातारण कर्ज दिले जात असे. स्त्रियांना घरी मानाचे स्थान मिळावे, त्यांनी संघटित, स्वयंपूर्ण व्हावे यासाठी प्रेमाताईंनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन २००२ साली सरकारने त्यांना पद्माश्री पुरस्काराने सन्मानित केले. अन्यही अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले, मात्र त्यांनी निराधार स्त्रियांना जी हिंमत दिली तोच त्यांचा खरा पुरस्कार होता. प्रेमाताईंचा जन्म सधन कुटुंबात झाला, पण तळागाळातील स्त्रियांशी त्यांचे हे नाते कसे जुळले याची अत्यंत हृद्या आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. त्या त्यांच्या आईला उशिरा झालेले अपत्य होत्या. त्यामुळे त्यांची दूधआई वेगळी होती. त्यांच्या घरात काम करणारी ही स्त्री तळागाळातून आली होती. तिच्यामुळे त्यांचा स्वत:च्या कौटुंबिक परिस्थितीपेक्षा वेगळ्या आर्थिक-सामाजिक वर्गाशी जवळून संबंध आला. तळागाळातील समाजाची दु:खे जवळून पाहता आली आणि त्यातूनच पुढच्या वाटा सापडत गेल्या, असे त्या सांगत. आज स्त्रियांना अर्थार्जनाच्या वाटा शोधता येतात, सापडतात. त्याच्या मुळाशी प्रेमाताईंसारख्या अनेक स्त्रिया आहेत, हे कधीच विसरता कामा नये.