‘दारूबंदीचा एकच त्राता, दादा आमचा मुक्तिदाता’, ‘दारू पिऊ नये कोणी, ही दादांची अमृतवाणी’ अशा घोषणा देत संपूर्ण राज्यभरातून तरुणांचे जथेच्या जथे बंगल्यावर येऊ लागल्याने दादा सुरुवातीला वैतागलेच. ‘कुणीही दारू पिऊ नये’ असे वक्तव्य आपण बोलण्याच्या ओघात केले. राज्यभरातून त्याला एवढा प्रतिसाद मिळेल, हजारो तरुण क्षणात दारूत्याग करतील असे वाटले नव्हते. हे लोण असेच पसरत राहिले तर आपल्याच पुढाकाराने जाहीर झालेल्या सुधारित दारू धोरणाचे काय? १४ हजार कोटींच्या अतिरिक्त महसुलाचे काय? आणि त्यावर पाणी फेरले गेले तर लाडक्या बहिणींचे काय, या प्रश्नासरशी दादा भानावर आले.
तेवढ्यात त्यांना गडचिरोलीतून बंगांचा फोन आला. अभिनंदन करत ते म्हणाले, ‘जे एवढ्या वर्षांत आम्हाला जमले नाही ते तुमच्या एका वाक्याने करून दाखवले’ फोन ठेवताच एक साहाय्यक त्यांच्या कानाला लागला. ‘तुमच्या त्या एका वाक्याने प्रेरित होऊन राज्यात दारू सोडण्याची जणू लाटच आली आहे. ठिकठिकाणी बाटल्या, ग्लासेस फोडले जात आहेत. दारू दुकानांसमोर बहिष्काराचे फलक लागले आहेत.’ हे ऐकून दादा क्षणकाळासाठी सुखावले. यातून नक्कीच आपली प्रतिमा चांगली होईल. लाडक्या बहिणींबरोबरच राज्यातील सर्व महिलांचे आशीर्वाद मिळतील. पुढच्यावेळी जास्त जागा लढवून त्याही जिंकता येतील. काकांनी तर नुसते महिला धोरण जाहीर केले. आपल्या एका वाक्याने थेट त्यांच्या भावनेलाच हात घातला गेला.
मग दुसरा एक साहाय्यक जवळ येत म्हणाला, राज्यात दारूबंदीसाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांचे एक शिष्टमंडळ भेटीला आले आहे. त्यांना ते सामोरे जाताच पुन्हा घोषणा सुरू झाल्या. शिष्टमंडळाच्या सदस्यांत दादांना पुष्पहार घालण्यासाठी जणू स्पर्धा सुरू झाली. ‘आम्ही उगीचच दारूदुकाने बंद करा म्हणून इतकी वर्षे लढत राहिलो. ताकदवान नेत्याचे एक वाक्य समाजात काय बदल घडवू शकते हे आम्हाला आज कळले. दादा, आता दारूची दुकाने, हॉटेल्स, बार ओस पडू लागले आहेत, एवढी जनजागृती तुमच्या एका वाक्याने केली आहे. दुधाचा खप वाढल्याने शेतकरी आनंदित आहे. डेअरीवाले २४ तास राबत आहेत.’ हे ऐकत असतानाच दादांचे लक्ष शिष्टमंडळातील गर्दीच्या मागे उभ्या असलेल्या साखर कारखानदारांकडे गेले. त्यात त्यांचा मुलगाही उभा असलेला दिसला.
चाणाक्ष दादांच्या लक्षात येताच त्यांनी डोळे वटारले तसे ते हळूच मागे सरकत बाहेर पडले. मग पुन्हा दारूबंदीवाल्यांकडे नजर फिरवत दादा म्हणाले. ‘तुम्ही आलात याचा आनंद आहे. निर्व्यसनी तरुण हेच आपल्या सरकारचे ध्येय आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.’ हे ऐकून कृतकृत्य झालेले शिष्टमंडळ बाहेर पडले. ते दूरवर गेल्याची खातरजमा केल्यावर दादांनी साखर सम्राट व मुलाला आत बोलावले. दारे, खिडक्या बंद केल्यावर मग चर्चा सुरू झाली.
कारखानदार म्हणाले, ‘दादा, मळी आमच्यासाठी कळीचा मुद्दा आहे. दारूसाठी तिचा वापर झाला नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ’. मग मुलगा म्हणाला, ‘राजकारणात यश येत नाही म्हणून धान्यापासून दारूचा धंदा सुरू केला. तुम्हीच सबसिडी दिली व आता असे बोलता? दारू विकली गेली नाही तर करू काय? धंदाही बुडेल ना!’ हे ऐकून विचारमग्न होत दादा म्हणाले. ‘काळजी करू नका ही लाट लवकरच ओसरेल.’ ते सर्वजण जाताच दादा विचारात पडले. वाईट बोललो तरी वांधा व चांगले बोललो तरी वांधा. आता बोलायचे तरी कसे?