– राहुल सरवटे
‘महाराष्ट्रालाच भाषिक असहिष्णुता का हवी?’ हा प्रश्न माधव गाडगीळ यांनी ‘लोकसत्ता’तील लेखात (१७ जुलै) उपस्थित केला होता. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या मंडळींनी ऊठसूट हातघाईवर येऊ नये किंवा दंगाधोपा टाळावा हे मान्यच. शिवाय आपण सगळे शेवटी भारतीय या अर्थाने सहोदरच नाही का? देशात इतरत्र कुठे भाषेचा इतका आग्रह असतो? महाराष्ट्रालाच काय झालंय भाषेचा इतका पुळका यायला, असं गाडगीळ यांना वाटणंही समजण्यासारखं आहे. अखिल भारतीयत्वाची त्यांच्यातील जाणीव मराठी सुसंस्कृतेतूनच आली आहे.
माझे तीन मुद्दे आहेत. एक म्हणजे गाडगीळ म्हणतात तसे मराठीचे सखोल ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भाषिक अनुबंध कन्नडच नाही तर फारसी, दक्खनी, गुजराती, कोंकणी, तमिळ, तेलुगू, हिंदी, संस्कृत अशा अनेक भाषांशी आहेत. आपल्या अखिल भारतीय असण्याचा पैसच असा बहुविध, बहुस्तरीय आहे. त्यामुळे, या भाषांचा विचार या ऐतिहासिक अनुबंधांना टाळून करताच येणार नाही इतक्या त्या परस्परसंबद्ध आहेत. त्या दृष्टीने महाराष्ट्रात मराठी मध्यवर्ती असणारी बहुभाषिक सांस्कृतिकता नांदत आलेली आहे, जसं आंध्रात तेलुगू केंद्रस्थानी असणारी बहुभाषिकता आहे. त्यामुळे, इतिहासात महाराष्ट्रात आलेले अनेक इतर भाषक मराठी भाषक झाले आणि महाराष्ट्रातून इतरत्र गेलेले मराठी भाषक तिथल्या स्थानिक भाषांना केंद्रस्थान देऊन मराठी जपत आले. सयाजीरावांकडे बडोद्यात नोकरी करणाऱ्या चिं. वि. जोशींना गुजराती येत असे किंवा तंजावूरकडच्या मराठी मंडळींनी तमिळ साहचर्य आनंदानं स्वीकारलं होते. भीमसेन जोशी असोत किंवा कुमार गंधर्व, ते अशा प्रकारे सांस्कृतिक अर्थाने मराठीच होते. मात्र सहजपणे बहुभाषिक असणं हे या भाषिक समन्वयाच्या प्रक्रियेतलं कळीचं सूत्र होतं ते काळाच्या ओघात लुप्त होत गेलं. लोक जसजसे एकभाषिक होत गेले तसतसे ते एकसुरी आणि कर्कश्श होऊ लागले.
दुसरा मुद्दा असा की, भौगोलिक किंवा भाषिक प्रांत हे दीर्घकालीन ऐतिहासिक प्रक्रियांची फलितं असतात. प्रांत ही काही स्थिर किंवा अपरिवर्तनीय गोष्ट नाही. त्यांचे आकार-उकार, आशय आणि तपशील अस्थिर असतात आणि देश नावाच्या रचनेशी विविध प्रांतांचे असलेले संबंधही निरनिराळे असतात. प्रत्येक भाषेची सांस्कृतिक रचना आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्मिता निरनिराळी आहे. तमिळ भाषकांची सांस्कृतिक-भाषिक अस्मिता आणि तिची अभिव्यक्ती ही गुजराती किंवा मल्याळमपेक्षा फार निराळी आहे. दक्षिण भारतात आढळणारी भाषेबद्दलची तीव्र भावना भारतात इतरत्र अभावानेच दिसते. म्हणजे तमिळताई (तमिळ मातेचा पुतळा) किंवा तेलुगुतल्ली (तेलुगू माउलीचा पुतळा) यांसारखा मराठी भाषेचा पुतळा पाहण्याची कल्पना आपल्या पचनी सहजासहजी पडणं अवघड आहे. थोडक्यात, भाषावाद किंवा प्रांतवादाच्या मुळाशी असणाऱ्या सांस्कृतिक अस्मितेच्या जाणिवेचा पोत निरनिराळा आहे. त्यामुळे, मराठीचा भाषावाद किंवा महाराष्ट्राचा प्रांतवाद यांच्या ऐतिहासिक जडणघडणीकडे लक्ष देऊन पाहायला हवं. उदाहरणार्थ, तमिळ राष्ट्रवाद भारतीयत्वाच्या जाणिवेशी काहीशा संघर्षाच्या पावित्र्यात विकसित झाला, याउलट मराठी जाणिवेत महाराष्ट्रीय असणं आणि भारतीय असणं हे एकमेकांपासून कायमच अभिन्न मानलं गेलं.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती
आता या लेखातल्या मुख्य प्रतिपादनाकडे येतो. माझं म्हणणं असं की महाराष्ट्राच्या राजकीयतेचा – म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय कृतीची प्रेरणा अथवा राजकीय उद्देश, आधार कधीही महाराष्ट्रवाद नव्हता. अखिल भारतीयत्वाच्या प्रेरणेतून साकारलेले दोन्ही राष्ट्रवाद – जहाल आणि मवाळ अशा दोन्ही काँग्रेस गटांनी स्वीकारलेला ‘हिंदी राष्ट्रवाद’ (म्हणजे ‘हिंद’शी जोडलेला. ‘हिंदी हैं हम वतन है हिंदोस्तां हमारा!’) आणि सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वगैरेंचा हिंदू राष्ट्रवाद – यांचं बीजारोपण आणि विकास महाराष्ट्रातच झाला. या दोन्ही राष्ट्रवादी प्रवाहांची निर्मिती आणि त्यांचं वैचारिक आणि राजकीय पालनपोषण महाराष्ट्रीय चर्चाविश्वात घडलं. याखेरीज, या दोन्ही प्रवाहांच्या मर्यादांकडे बोट दाखवणारा फुले-आंबेडकरांच्या नेतृत्वाखालचा समतावादी प्रवाहही महाराष्ट्रातलाच होता. म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळातली महाराष्ट्राची राजकीय कृती ही हिंदी आणि/किंवा हिंदू असण्याबद्दल आणि/किंवा समतावादी असण्याबाबत आग्रही होती. महाराष्ट्रीय राजकारणाची रचना आणि प्रांतीय जाणीव अशा व्यापक चौकटींतच आकाराला आली. पर्यायाने, मराठी असणं हे भारतीय असण्यापासून पृथक नव्हतंच. संकुचित प्रांतवादी धारणा महाराष्ट्रात रुजू शकली नाही. उदाहरणार्थ, वैदर्भीय नेते रामाराव देशमुख यांचे १९४८ सालचे हे उद्गार पाहा: ‘आपला वारसा, आपली परंपरा, आणि आपला इतिहास हा देशाच्या धारणेत मिसळून जावा अशीच मराठ्यांची इच्छा असते. मराठ्यांमध्ये प्रांतवाद नाहीच, असलाच तर तो अगदी किंचित!’
आपण आणखी काही उदाहरणं पाहू या.
नोव्हेंबर १९२४ मध्ये विनायक दामोदर सावरकर आणि मौलाना शौकत अली यांची मुंबईत भेट झाली. संवादात थोडासा ताण आल्यावर मौलाना जरा चिडूनच सावरकरांना म्हणाले. ‘तुम्हां मराठ्यांत हाच प्रांतिक अभिमान फार असल्यामुळे हिंदुस्थानचा राष्ट्रीय प्रश्न तुम्हाला समजावून देण्यात मला मोठीच अडचण पडते. हिंदुस्थान हे एक आपले राष्ट्र असे प्रेम तुम्हांस वाटतच नाही’. प्रत्युत्तरात सावरकरांचे म्हणणे होते,
‘‘तुम्ही महाराष्ट्रीयांवर निष्कारण दोषारोप केलात. शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्ययुद्ध केले ते काही केवळ महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रांस मुक्त करण्यासाठीच नसून उभ्या भरतखंडातील क्षेत्रांस मुक्त करण्यासाठीच होते. हे पाहा. आम्ही स्वत: २० वर्षांपूर्वी जो ध्वज उभारला तो केवळ महाराष्ट्राचा नसून हिंदुस्थानचा होता हे काय तुम्हांस माहीत नाही? रानडे, गोखले, टिळक ह्यांनी केवळ महाराष्ट्रीय चळवळ केली? कोणती राष्ट्रीय चळवळ केली नाही? अहो, गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्रात ज्या काही मोठमोठ्या चळवळी झाल्या, त्यातली एकही प्रांतिक नव्हती…बंगालची फाळणी झाली, महाराष्ट्र बंगालइतकाच तिच्याविरुद्ध लढला. जालियनवाला बाग झाला, आज ज्या समितीकरता तुम्ही येथे आला तो बंगालचा ऑर्डिनन्स झाला, इतर प्रांतांवर पडलेल्या प्रत्येक आघातांच्या, त्या प्रांतांच्या खांद्याला खांदा लावून प्रतिकार करण्यातच महाराष्ट्राची गेली २० वर्षे खर्ची पडली आहेत. महाराष्ट्राने हे इतर प्रांतांवर उपकार केलेले नाहीत. आम्ही दोन आहोत असे आम्हांस वाटतच नाही. त्यांचे दु:ख आम्हांस आमचेच वाटते. तरीही हिंदुस्थानच्या एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेचा प्रभाव आणि संगोपन ज्या महाराष्ट्रात प्रामुख्याने झाले, त्याच महाराष्ट्रास राष्ट्रैक्याचा शत्रू म्हणणे…म्हणजे केवळ कृतघ्नपणा होय.’’
भारतीय राजकारणाच्या दोन ध्रुवांचे दोन अध्वर्यू झ्र सावरकर आणि विनोबा भावे झ्र यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध होता ही अतिशय लक्षणीय बाब आहे. महाराष्ट्र हा भारतीय संस्कृतीरूपी समुद्रात विलीन होणाऱ्या अनेक नद्यांपैकी एक अशी विनोबांची कल्पना होती, तर सावरकरांना महाराष्ट्र भारताचा खड्गहस्त वाटत होता. या दोन कल्पनांमधली भिन्नता सोडली तरी समान धागा असा की, या दोघांच्याही दृष्टीने महाराष्ट्राचं अस्तित्व भारतीय संदर्भातच समूर्त होत होतं. महाराष्ट्राची अनन्यसाधारणता त्याच्या भारतात विलीन होण्यातच मानली गेली. अगदी लालजी पेंडसे यांच्यासारख्या मार्क्सवादी भूमिका मानणाऱ्या लेखकाचं म्हणणंही पाहण्यासारखं आहे. ‘महाराष्ट्राचे महामंथन’ या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पहिला दीर्घ इतिहास मांडणाऱ्या ग्रंथात पेंडसे लिहितात, ‘‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भारताच्या एकात्मिक असण्याची जाणीव कधीही क्षीण झाली नाही. स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राचा राजकीय विकासच इतका झाला होता की, देशाची एकता या ध्येयापासून महाराष्ट्र कधीही ढळला नाही.’’
हे देशाशी एकरूप होणं इतरही संदर्भात ठळकपणे दिसतं. भारतीय साहित्याला दिलेल्या मराठी भाषिकांच्या योगदानाचा विचार इथे प्रस्तुत ठरेल. दत्तात्रेय बेंद्रे हे कन्नड साहित्याचे मुकुटमणी ठरले. काका कालेलकरांनी गुजरातीत विस्तृत लिखाण केलं, प्रभाकर माचवे हे सुविख्यात हिंदी लेखक होते, गजानन माधव मुक्तिबोध यांनी हिंदीत विचक्षण प्रतिभेची कविता निर्माण केली, तर सखाराम देऊसकरांची देशेरकथा बांगला साहित्यात आजही जिवंत आहे. ही महाराष्ट्रीय मंडळी आपल्या विशिष्ट स्थळकाळाशी तादात्म्य पावून भारतीय साहित्याचं दालन समृद्ध करत होती. गांधीवादी-समाजवादी धारणेच्या साने गुरुजींनी मांडलेली आंतरभारतीसारखी संकल्पना अशाच मूल्यांवर दृढ उभी होती. आत्माराम मोडक गुरुजींसारख्या काबाडकष्ट करून दक्षिण भारतात हिंदी भाषेचा प्रसार करणाऱ्या अनेकांचे श्रम भारतापायी रुजू केले गेले.
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र
स्वातंत्रोत्तर काळातल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय चळवळीदेखील देशहिताच्या व्यापक चौकटीतच कार्यरत होत्या. मानवेंद्रनाथ रॉय यांची प्रेरणा सांगणारी नवमानवतावादी चळवळ, शरद जोशींची शेतकरी चळवळ, विज्ञान प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीमुक्ती, दलित चळवळ, युक्रांद, एक गाव एक पाणवठा, म्हैसाळ प्रयोग, नेमाडे, कोलटकर, अशोक शहाणे वगैरेंचे साहित्यिक अनियतकालिकांचे प्रयोग इत्यादी अनेकानेक राजकीय कृतींमधून साकारलेला मराठी पुरोगामीपणा अखिल भारतीयत्वाचं आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेचं सकस भान राखून होता. एकंदर, मराठी प्रांतवाद झ्र किंबहुना त्याचा अभाव झ्र एका अशा भूमिकेवर स्थिर झाला होता ज्यात महाराष्ट्रवाद किंवा महाराष्ट्रात मराठी भाषेचं सांस्कृतिक स्थान अशा मुद्द्यांना कधीही अग्रक्रम नव्हता.
स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचनेचं तत्त्व हे लोकशाहीच्या सकस वाढीसाठी आवश्यक मानलं गेलं तरीही संयुक्त महाराष्ट्र रक्ताचं बलिदान देऊन मिळवावा लागला. पुढे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठीपणाचं राजकारण करू पाहणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षालाही आधी भाजपच्या वळचणीला जाऊन हिंदू राष्ट्रवादाच्या चौकटीतच आपला विस्तार करता आला आणि आता ते काँग्रेसबरोबर हिंदी राष्ट्रवादी भूमिका आत्मसात करू पाहत आहेत. मराठीच्या दडपणुकीविरोधातलं राजकारण हे जणू सर्वसमावेशक आणि प्रगतिशील राजकारणाच्या विरुद्ध आहे असा अतिशय चुकीचा समज पुन्हा पुन्हा अधोरेखित केला जात असताना मराठीसाठीच्या विधायक आणि लोकशाहीवादी राजकारणाची नितांत गरज आहे. त्यामुळे मराठी असहिष्णू का होऊ लागलीये असा प्रश्न नसून, मराठीला असहिष्णू म्हणून पाहिलं जाण्यात कुठला राजकीय अजेंडा आहे हे विचारायला हवं. आपण असहिष्णू होत आहोत असं भासण्यातून येणारं अपराधीपण आपल्या खचितच हिताचं नाही.
महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्रीचक्रधर हे मूळचे गुजरातचे. पण त्यांनी त्यांच्या शिष्यांना संदेश दिला तो महाराष्ट्रात राहण्याचा. ते म्हणतात: ‘‘महाराष्ट्री असावे: महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र: महंत म्हणजे थोर’’. त्यांच्या शिकवणुकीचा संग्रह ‘सूत्रपाठ’ प्रसिद्ध आहे. पुढे तेराव्या शतकात त्यावरची एक टीका ‘‘आचारस्थळ’’ रचली गेली. त्यात महाराष्ट्राचे पुढील वर्णन आहे: ‘‘महाराष्ट्र सात्त्विक। तेथचे जड पदार्थ तेही सात्त्विक। तेथ असता शारीर मानसिक उपद्रव नुपजती। आणीक देशी शारीर मानसिक उपद्रव उपजला असे तो महाराष्ट्री शमे। तेथचा वारा। झाडे। पाऊस तोही सात्त्विक। तेणे सकळही उपद्रव समेती: आपण अनाचार न करी। आणिकाशी करू नेदी ते महाराष्ट्र। धर्म सिद्धी जाय ते महाराष्ट्र।’’
आजच्या महाराष्ट्रात काय सात्त्विक उरलंय हे एक चक्रधर जाणोत. पण महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांनी या गुजराती भाषक संताप्रमाणे महाराष्ट्राला आणि मराठीला आपलं मानावं अशी अपेक्षा महाराष्ट्रानं केली तर ती तामसी कशी ठरते?
लेखक भाषा अभ्यासक आहेत.
rahul.sarwate@gmail.com