‘‘महात्मा गांधी यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाचे देशव्यापी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात मी स्वत: सहभागी झालो होतो. मी सुमारे आठ-दहा वर्षे प्राज्ञपाठशाळेत केवलानंद स्वामींच्या देखरेखीखाली भारतीय तत्त्वज्ञानाचे अध्यापन करीत होतो. राजकीय पारतंत्र्यातून देश मुक्त झाला, तरच समाजाची सर्वांगीण प्रगती होऊ शकते, अशा प्रकारची विचारसरणी मी नारायणशास्त्री मराठे (संन्यासाश्रमात केवलानंद सरस्वती) यांच्याकडे शिकलो. विचार आणि आचरण यांच्यात मेळ असणे आवश्यक, हे केवलानंद सरस्वतींच्या जीवनातील सूत्र माझ्या जीवनाला मार्गदर्शक ठरले. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊ लागलो. मी दोन-चार विद्यार्थ्यांना शिकवत होतो. चळवळीत सामील झालो आणि मोठ्या जनसमुदायापुढे भाषण करू लागलो. चळवळीत स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान आणि मानवी स्वातंत्र्याचा व राष्ट्रवादाचा इतिहास सामान्यजनांना, विशेषत: ग्रामीण जनांना सांगून सत्याग्रहाच्या चळवळीत तरुण मंडळींना खेचून घेऊ लागलो. माझे भाषण ऐकण्यास शेकडो लोक जमायचे. कित्येक वेळा दोन-तीन हजारांपर्यंतही जनसमुदाय गर्दी करू लागला. तेव्हा माईक नसे, तरी माझा आवाज दोन-तीन हजारांना रोखून धरत होता. कऱ्हाड येथे दांडी मार्चच्या काळात मी संध्याकाळच्या वेळी कृष्णेच्या तीरावरील वाळवंटात ओळीने सात दिवस भाषणे दिली. कऱ्हाडमधील सुशिक्षित, अर्धशिक्षित व निरक्षर अशा तऱ्हेचा सगळ्या थरांतला श्रोतृवृंद जमत होता. मी तत्त्वज्ञानाचा अध्यापक होतो, त्यामुळे माझ्या भाषणामध्ये जो युक्तिवाद असे, त्यात नीट व सुबोध मांडणी येऊ लागली. यशवंतराव चव्हाण, आत्माराम पाटील यांच्यासारखी विद्यार्थीदशेतील तरुण मंडळी माझ्या भाषणाकडे आकर्षित झाली. सुमारे तीन वर्षे चाललेल्या या चळवळीत माझ्या भाषणामुळे आकर्षित झालेली शेकडो नागरी व ग्रामीण तरुण मंडळी सामील झाली. खेडेगावांतील श्रोते उद्गार काढीत, ‘काय नाटकावानी बोलतोय!’ मी ऐतिहासिक उदाहरणे किंवा दाखले देत असताना नाटकातील संवादासारखे संवाद रंगवून सांगत असे.

स्वातंत्र्यसंग्रामात मुख्यत: तरुणवर्ग व स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे अशी महात्मा गांधींनी विनंती केली. त्यावेळी सदर चळवळ अहिंसात्मक असावी, अशी त्यांची अट होती. मी त्यावेळी पक्का अहिंसावादी नव्हतो, परंतु गांधीजींचे नेतृत्व आणि त्यांची अट मान्य करून प्रचार करू लागलो. पहिल्यांदा २०० ते २५० कार्यकर्त्यांचे शिबीर संगमनेरला भरविले. प्रचार करताना काय काय सांगायचे, हे मी त्यांना समजावून सांगत असे.

परंतु ते शिबीर ब्रिटिश कलेक्टरनी मोडले. हे शिबीर दीड महिना चालू होते. त्या काळात तेथील व्यापाऱ्यांनी लोकांना जेवण पुरविले. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बागलाणजवळील नामपूर नावाच्या मध्यम वस्तीच्या गावात आम्ही शिबीर संघटित केले. त्या शिबिराला शंकरराव देवांसारखी बाहेरची नेतेमंडळी उपस्थित होती. नाशिकच्या नेत्यांनी सतत भेटी दिल्या. तेथील व्यापाऱ्यांनी सैनिकांना जेवण वगैरे सर्वप्रकारची मदत केली. ही १९३० सालची गोष्ट आहे.

मग मला सक्तमजुरीची शिक्षा देऊन धुळे जेलमध्ये पाठविले. नंतर ही चळवळ गांधीजींनी बंद केली. सरकारने सर्व बंदींना मुक्त केले. नंतर गांधीजी व आयर्विन यांची चर्चा झाली, परंतु एकमत झाले नाही. म्हणून गांधीजींनी पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्यावेळच्या धरपकडीमध्ये मीही पकडला गेलो व पुन्हा मला धुळे जेलमध्ये पाठविले. तेथे १५० सत्याग्रही होते. कायदेभंग करून आलेले जमनालाल बजाज, विनोबा भावे इ. मंडळी तेथे होती. विनोबांची गीतेवर प्रवचने झाली. ती प्रसिद्ध आहेत. तेथे सत्याग्रहाचा सिद्धांत त्यांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगितला. जमनालाल बजाज यांना सक्तमजुरीची शिक्षा होती. पंजाबचे एक मोठे नेते आमच्यासोबत होते. तेथे सानेगुरुजींनी विनोबांची प्रवचने लिहून काढली. मला पुन्हा सहा-सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. गांधीजींनी सत्याग्रह मागे घेतल्याबरोबर सत्याग्रहींची सुटका झाली. अशारीतीने दोनदा मी तुरुंगवास भोगला आहे. भारत छोडो चळवळीच्या वेळी मी जेलमध्ये नव्हतो.

धुळे येथील तुरुंगात माझ्याबरोबर गुलजारीलाल नंदा, पुरुषोत्तम त्रिकम, द्वा. भ. कर्णिक प्रभृती मान्यवर होते. इथे मार्क्सवादाशी माझा परिचय झाला आणि वाचनही झाले.’’

 डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com