मागच्या शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी अमावास्या संपली आणि शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. भाद्रपद महिना सुरू झाला. या महिन्याचं नाव ‘भाद्रपद’ असावं असं कोणी ठरवलं? या महिन्याचं नाव ‘श्रावण’ का नाही? किंवा ‘आश्विन’ का नाही? कोणी म्हणेल या प्रश्नाला काही अर्थच नाही! जसं, मागचा महिना जुलै म्हणून हा ऑगस्ट, तसंच मागचा महिना श्रावण म्हणून हा भाद्रपद. हा तर्क ग्रेगरीयन कॅलेंडरमधल्या महिन्यांना लागू पडतो. पण शालिवाहन शकातल्या महिन्यांना नाही. कारण असे महिन्यामागून क्रमाने महिने येत राहिले तर अधिक महिना कधी येणारच नाही! पण अधिक महिना तर येतो. तेव्हा, ‘मागचा महिना श्रावण’ म्हणून ‘हा महिना भाद्रपद’ हे उत्तर पुरेसं नाही.

कोणत्या महिन्याला कोणतं नाव द्यायचं हे ठरवण्याकरता एक नियम आहे. आणि हा नियम असा जबरदस्त आहे की नुसतं त्याचं पालन केल्याने दर महिना योग्य त्या नावानिशी येतो, आवश्यकता असेल तेव्हा आपोआप अधिक महिना निष्पन्न होतो आणि क्वचित कधी एखादा महिना गायबही होतो.

पृथ्वीवरून पाहताना सूर्य एका विशिष्ट मार्गावरून भ्रमण करतो असं दिसतं. त्या मार्गाला ‘क्रांतिवृत्त’ असं म्हणतात. या क्रांतिवृत्ताचे १२ मोठे भाग म्हणजे १२ राशी. पृथ्वीवरून पाहताना सुमारे ३६५ दिवसांत सूर्य ही एक प्रदक्षिणा पूर्ण करतो असं दिसतं. म्हणजे तेवढ्या दिवसांत तो या बाराच्या १२ राशींमधून फिरतो.

नवा महिना चालू होताना महिन्याचं नाव

सूर्याची रास

मीन चैत्र

मेष वैशाख

वृषभ ज्येष्ठ

मिथुन आषाढ

कर्क श्रावण

सिंह भाद्रपद

कन्या आश्विन

तूळ कार्तिक

वृश्चिक मार्गशीर्ष

धनू पौष

मकर माघ

कुंभ फाल्गुन

‘सूर्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केला की नवा महिना’ असं करता येईल. पण मग त्या वर्षाचे महिनेही सौरच असतील आणि शालिवाहन शकाचे महिने तर चांद्र आहेत. तेव्हा या दोन गोष्टी एकत्र जोडता आल्या पाहिजेत. ते कसं करावं?

पंचांगकर्त्यांनी यासाठी एक युक्ती वापरली. नवा महिना तर नव्या चंद्राबरोबर सुरू होणार. पण त्या महिन्याचं नाव काय हे मात्र त्या क्षणी सूर्य कुठे आहे त्यावरून ठरणार!

या महिन्याचंच उदाहरण घेऊ. मागच्या शनिवारी शुक्ल प्रतिपदा सुरू झाली त्या वेळी सूर्य सिंह राशीत होता आणि नियम सांगतो की नवा महिना सुरू होताना सूर्य सिंह राशीत असेल तर त्या महिन्याचं नाव ‘भाद्रपद’. म्हणून हा भाद्रपद महिना.

पण सूर्य काही एका जागी थांबत नाही. तो पुढे सरकतो. काही काळानंतर तो कन्या राशीत प्रवेश करेल. तो कन्या राशीत असताना जो नवा महिना सुरू होतो त्याचं नाव आश्विन. सोबतचा तक्ता पाहा.

समजा, सूर्याने कर्क राशीत प्रवेश केल्यावर काही काळातच शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. तर त्या महिन्याचं नाव श्रावण असेल. नंतर शुक्ल पक्ष संपला, पौर्णिमा येऊन गेली, कृष्ण पक्ष संपला. अमावास्या संपली आणि पुढच्या महिन्याचा शुक्ल पक्ष सुरू झाला. पण अजूनही सूर्य कर्क राशीतच आहे. अजून काही काळाने तो सिंह राशीत प्रवेश करेल. मग नियमानुसार या महिन्याचं नावही श्रावणच असलं पाहिजे आणि ते तसंच असतं. म्हणजे श्रावण महिन्यानंतर पुन्हा एकदा श्रावण महिना आला! अधिक मास, अधिक मास म्हणतात तो हा असा निष्पन्न होतो. सोबतची आकृती पाहिलीत की हे स्पष्ट होईल.

थोडक्यात, ज्या चांद्र महिन्यात सूर्याची राशी बदलत नाही तो ‘अधिक महिना’ होतो. म्हणजे वरच्या उदाहरणात ज्या महिन्यात सूर्य कर्क राशीतच राहिला तो ‘अधिक श्रावण’ झाला. त्याचा पुढचा महिना अर्थातच, ‘निज श्रावण’.

पण हे फक्त अधिक महिन्याचं झालं. क्षय मासाचं काय? आणि महिन्यांना ही नावं कशी मिळाली? हे सगळंदेखील पाहणार आहोत आपण. पण ते पुढच्या लेखांत.