‘या महान देशाला हजारो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास आहे. तुमच्या पाश्चात्त्य विचारसरणीने याकडे लक्षच दिले नाही. आता महनीय विश्वगुरूंच्या कारकीर्दीत हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. नेत्याच्या तोंडून निघाले की ‘हा सांस्कृतिक वारसा’ तर वेळ न दवडता शिक्कामोर्तब करायचे. फाइलवर बसून राहायचे नाही. आम्हालाही देश दीर्घकाळ चालवण्यासाठी सतत निवडणुका जिंकायच्या आहेत. तेव्हा बोला आता, छठपूजेचा समावेश कधी करता ते.’ हे ऐकून चाणक्यांच्या कार्यालयात बसलेल्या युनेस्को इंडियाच्या अधिकाऱ्याला घामच फुटला. त्याने घाबरतच वारसा सूचीत येण्यासाठी काय काय करावे लागते, प्रक्रिया किती जटिल आहे, सर्वच देश हे नियम कसे पाळतात हे सांगण्याचा प्रयत्न करताच चाणक्य भडकले. ‘हे जगाचे नियम इथे लावायचे नाही. या देशात फक्त दोघांचेच नियम चालतात. ऐकायचे नसेल तर आमच्या तपास यंत्रणा आहेच तयारीत. जास्त फाटे फोडाल तर आम्ही स्वदेशी बनावटीची अशीच संस्था तयार करू व सर्व देशांना या ‘जिंकण्याच्या राजमार्गाचे’ महत्त्व पटवून देत सामील करून घेऊ. तुमचे मुख्यालय पॅरिसमध्ये असेल तर आमचे इटलीतील रोममध्ये.’ हे ऐकताच त्या अधिकाऱ्याचे डोळे चमकले.

तो म्हणाला, ‘तुम्हाला ज्या गोष्टी वारसा सूचीत समाविष्ट करायच्या आहेत त्यांची यादी द्या. म्हणजे आमचे काम सुकर होईल,’ यावर चाणक्य हसत म्हणाले. ‘अरे बाबा, ते सर्व विश्वगुरूंच्या मनात असते. नफ्यातोट्याचे गणित पडताळून ते एकेक गोष्ट जाहीर करतात. त्यांनी घोषणा केली की लगेच प्रस्ताव येईल व तुम्ही कामाला लागायचे. ते करताना निवडणुकीचे वेळापत्रक समोर ठेवायचे. समजले ना!’ यावर मान हलवून तो अधिकारी बाहेर पडला. काय करावे ते त्याला सुचेना! मग त्याने येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांची माहिती काढली. बिहारचा मुद्दा तर निकाली निघाला. आसाम, बंगाल व उत्तर प्रदेश ही नावे समोर आली. आसाममध्ये गुरू ‘बिहू’ची घोषणा करतील. बंगालमधील दुर्गापूजा तर अगोदरच सूचीत समाविष्ट झालेली. उत्तर प्रदेशच्या वेळी कावडयात्रेचा उल्लेख होईल. आणखी काही वर्षे आपण भारतात राहिलोच तर गणेशोत्सव, दहीहंडी, वारी याचीही माहिती संकलित करून ठेवावी लागेल. संपूर्ण जगभरातून केवळ भारताचीच यादी वाढत गेली तर पॅरिसमधले वरिष्ठ ओरडतील. एकदा त्यांच्याशीही बोलायला हवे म्हणून त्याने मुख्यालयाशी संपर्क साधला.

सर्व ऐकून घेतल्यावर तिथले प्रमुख वैतागून म्हणाले, ‘या सांस्कृतिक वारसा सूचीतील भारताच्या वाढत्या नावामुळे जगभरात काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे ठाऊक आहे का तिथल्या सत्ताधाऱ्यांना. याचा आधार घेऊन जगभरात विखुरलेले भारतीय चक्क रस्त्यावर येऊन उत्सव साजरे करायला लागलेत. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेचे नियम पाळणारे अनेक देश अस्वस्थ झाले आहेत. एखाद्या वेळी ते या धांगडधिंग्यावर बंदीही घालतील. यात आपले नाक कापले जाईल. संस्थेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.’ यावर काय बोलावे ते त्या अधिकाऱ्याला समजेना! तिरीमिरीतच त्याने मुख्यालयाला पत्र लिहिले. इथे राहून काम करणे शक्य नाही तेव्हा दिल्लीतले कार्यालय तातडीने पॅरिसला हलवा. हे कळताच दुसऱ्या क्षणापासून त्याला ‘भागो मत’ असे निनावी फोन यायला लागले. तरीही त्याने बॅग भरायला सुरुवात केलीच.