चित्रपट माध्यमाचे लोकशाहीकरण होत आहे, या मातीतला सिनेमा पडद्यावर येऊ पाहतो आहे पण थिएटर मिळत नाही म्हणून अखेर ‘ओटीटी’ची वाट धरतो आहे, असा काळ अवतरला तरीही बहुसंख्य प्रेक्षकांच्या डोळ्यावरली ‘ब्लॉकबस्टर’ झापडे उतरली नाहीत. या ‘झिंगाट’ प्रेक्षकांना भानावर आणणाऱ्या अनेक गोष्टी आसपास घडत आहेत, हे गेल्या दोन दशकांत कैक वेळा दिसून आले, तरीही नाही. या सातत्यपूर्ण दुर्लक्षानंतरही कमी पैशांत उत्तम, दर्जेदार आणि मातीशी इमान राखणारा चित्रपट बनवण्याची उमेद कमी होत नाही, याची उदाहरणे अखेर परदेशांतील मानाच्या चित्रपट महोत्सवांत या चित्रपटांनी पारितोषिके मिळवल्यामुळेच दिसू तरी लागली. असे ताजे उदाहरण म्हणजे ‘विमुक्त’ या पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी टोरंटो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटासाठी जितंक सिंह गुर्जर यांना मिळालेला ‘नेटपॅक’ पुरस्कार.

तो मिळवणारे जितंक सिंह गुर्जर हे मूळचे चितोली या गावचे. हे गाव ‘डबरा’ नावाच्या तालुक्यात आहे. नाटकाची आवड स्वस्थ बसू देईना म्हणून जितंक सिंह गुर्जर यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी- ग्वाल्हेर शहरात- शिक्षणानंतरही राहायचे ठरवले. नाटकाचे प्रयोग भोपाळ किंवा दिल्लीत करण्यास इतिकर्तव्यता न मानता, कधीतरी चित्रपटही करायचा असा ध्यास होताच. त्या ध्यासाला गती मिळाली करोनाकाळात. चितोली गावातच ‘पुरलेल्या खजिन्याचा शोध’ घेण्याचे वेड लागलेल्या गावकऱ्याबद्दलचे कथानक पटकथारूपाने आणण्याइतका वेळ त्यांना २०२०- २१ मध्येच मिळाला खरा, पण त्यावर आधारलेला ‘बसान’ हा कथात्म लघुपट येईस्तोवर २०२३ अर्धे उलटून गेले. स्थानिक कलावंतांच्या आणि गावकऱ्यांच्याही भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पहिले कौतुक तमिळनाडूतल्या अत्विकवरुणि चित्रपट महोत्सवात झाले. तिथे दोन पुरस्कार, मग इंडो फ्रेंच चित्रपट महोत्सवात पाच, रोममध्ये एक पुरस्कार, भारताच्या ‘इफ्फी’त अधिकृत ‘पॅनोरमा’मध्ये समावेश असे मान मिळवून ‘बासन’ने कान महोत्सवापर्यंत धडक मारून, तिथेही एक उत्तेजनार्थ स्वरूपाचे पारितोषिक मिळवले.

पण ‘बासन’ हिंदीत होता. ‘विमुक्त – इन सर्च ऑफ द स्काय’ हा गुर्जर यांनी दिग्दर्शित केलेला नवा चित्रपट ब्रज भाषेत आहे. भाषा कोणतीही असली तरी, त्याची चित्रपटीय भाषा (छायादिग्दर्शक – शेली शर्मा) प्रेक्षकांना भिडणारी आहे. विषय आहे मनोरुग्ण मुलाचे जगणे, तो तरुण झाल्यावर गावकऱ्यांच्या त्याच्याबद्दलच्या तक्रारी वाढणे, या साऱ्याशी आपण कसे तोंड द्यायचे असा प्रश्न पडलेल्या ग्रामीण कुटुंबाचा. या मुलाचे- नारण याचे- भवितव्य आता कुंभमेळ्यातच ठरेल, असे बरेचजण सांगतात, ते ऐकून हे कुटुंब प्रयागराजला जाते. म्हणजे, जवळपास निम्मा चित्रपट कुंभमेळ्याच्या गर्दीत घडतो. नारणपासून आईवडिलांना मुक्ती मिळते खरी, पण आईचे काय होते, अशी ही कथा. ती संवादांतून कमी आणि कृतींमधून, दृश्यांमधून अधिक उलगडते. कमीत कमी सहकारी, कमीत कमी खर्च, कुंभमेळ्याखेरीज दोन गावांची दृश्ये अशी काटकसर असूनही हा चित्रपट भव्य आशयाला हात घालतो. श्रद्धा आणि लौकिक ताणतणाव यांचे नाते काय, जाणीव आणि तिचा अभाव हे कसे आणि कोणी ठरवायचे, शहाणा/ वेडा हा सामाजिक भेदच म्हणावा काय, असे प्रश्न हा चित्रपट पाडतो. जितंक सिंह गुर्जर यांच्या पुढल्या वाटचालीबद्दल आशा वाढवणारा टप्पा ५० व्या टोरंटो महोत्सवातल्या पुरस्कारामुळे गाठला गेला आहे.