मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य म्हणून सन १९६० मध्ये महाराष्ट्र या घटक राज्याची स्थापना झाली. तो काळ स्वातंत्र्योत्तर असला तरी दीडशे वर्षांच्या ब्रिटिश साम्राज्य प्रभावामुळे आपला राजकीय कारभार इंग्रजीतच चालत असे. त्यामुळे तत्कालीन राज्यकर्त्यांपुढे खरे आव्हान मराठी भाषा ज्ञानभाषा बनवून तिचे अभिजातपण वर्तमानात विकसित करणे हे होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जनाकांक्षेचे भान होते नि जबाबदारीची जाणीवही. त्यांनी ही जबाबदारी आपले राजकीय सहकारी व मार्गदर्शक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींवर सोपवली. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’ची स्थापना हा महाराष्ट्र राज्य स्थापनेदिवशी जाहीर केलेल्या राज्य धोरणाचा भाग होता.
हे धोरण जाहीर करताना, १ मे, १९६० रोजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्पष्ट केले होते की, ‘‘महाराष्ट्र राज्य केवळ भूभागाची पुनर्रचना नाही, तर ते मराठी बोलणाऱ्या जनसमूहाचे आत्मिक, हार्दिक सुसंघटन (युनियन) आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणचे ते एकात्म राज्य होय. हे राज्य मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे केवळ जतन करणारा नाही, तर ती जोपासून वृद्धिंगत ठेवण्याचा प्रयत्न करेल.’’ यानुसार १९ नोहेंबर, १९६० रोजीच्या शासन निर्णयानुसार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जी ‘नवरत्ने’ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर नियुक्त करण्यात आली, त्यांत महामहोपाध्याय वा. वि. मिराशी (भारतविद्यातज्ज्ञ), डॉ. अमृत महादेव घाटगे (भाषातज्ज्ञ), प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे (रसायनशास्त्र व शिक्षणतज्ज्ञ), प्रा. गोवर्धन पारीख (अर्थशास्त्रज्ञ), डॉ. पु. म. जोशी (पुरातत्त्वतज्ज्ञ), प्रा. न. र. फाटक (इतिहास संशोधक व समीक्षक), प्रा. वा. ल. कुलकर्णी (साहित्यिक व समीक्षक), आणि शिक्षण व समाजकल्याण विभागाचे सचिव यांचा अंतर्भाव होता. या मंडळाने मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विकासाचा आरंभिक विकासपट तयार केला होता, तो एका अर्थाने अभिजात मराठी भाषेस आधुनिक काळात ज्ञानभाषा बनविण्याचा एकप्रकारचा रचनाकल्प (ब्लूप्रिंट) होता. त्यात इतिहास, संशोधन प्रकल्प व योजना होत्या. मराठीतील विविध ज्ञान-विज्ञान शाखांतील स्वतंत्र मौलिक लेखन विकास, भारतीय भाषांचा मराठीशी अनुबंध, मराठीत वैश्विक अभिजात ग्रंथांचे भाषांतर, मराठी वृत्तपत्रे, नियकालिक यांच्या प्रकाशनास प्रोत्साहन, सूची, परिभाषा, कोश निर्मिती, महाराष्ट्राच्या इतिहास साधनांचे संग्रहण, संपादन, प्रकाशन, अशा अनेकांगी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती विकासाचा तो पथदर्शक महत्त्वाकांक्षी उपक्रम होता.
यामागील उद्देशांबाबत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘साहित्य संस्कृती मंडळ व मी’ शीर्षकाच्या लेखात स्पष्ट केले आहे की, ‘‘भारताची व राज्याची नवरचना व्हावी आणि इथल्या माणसांच्या सृजनशीलतेला प्रेरक वातावरण निर्माण व्हावे म्हणून महाराष्ट्राची मानवी स्वातंत्र्य व समता या ध्येयाकडे वेगाने, अखंडपणे प्रगती होत राहावी, याकरिता येथील ग्रामीण आणि नगर भागातील अर्थव्यवस्था नव्या तंत्रज्ञानावर उभारली जावी आणि ती उभारण्याची कामे येथील सामान्य मनुष्य, कुशल कामगार करू शकेल, असे शिक्षण त्याला मिळावे, याकरिता महाराष्ट्रातील साहित्यिक आणि निरनिराळ्या भौतिक व सामाजिक शास्त्रांमध्ये प्रवीण असलेल्या नागरिकांचे नेतृत्व लाभावे आणि हे नेतृत्व मातृभाषेतच सामान्य माणसाला ज्ञान-विज्ञान संपन्न करू शकेल, तरच महाराष्ट्र विकासाच्या अनंत मार्गावर वेगाने गतिमान होऊ शकेल.’’
यशवंतराव चव्हाण यांची दृष्टी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांची ज्ञाननिष्ठा यांच्या संगमामुळे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा विकास मराठी विश्वकोश, मराठी साहित्य निर्मिती, मराठी भाषा विकास अशा विविध मार्गांनी झाला. त्याचा वर्तमानकाळातील मराठी आधुनिक भाषा अभिजात करण्यात सिंहाचा वाटा आहे, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासास विसरता येणार नाही. वरील मूळ संकल्पानुसार मराठीचा ज्ञानभाषा म्हणून विकास नि विस्तार व्हायला हवा होता, तो महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या गेल्या ६५ वर्षांमध्ये होऊ शकला नाही. उलटपक्षी आपला प्रवास संकोचाचा राहिला. इंग्रजी भाषेचा मराठी समाज करीत असलेला अनुनय हे त्याचे प्रमुख कारण होय.