फार कमी लोक हे जाणत असावेत की, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित ‘मराठी विश्वकोश’ हा भारतीय भाषांमधील सर्वश्रेष्ठ सर्वविषयसंग्राहक ज्ञानकोश आहे. आपण पश्चिमी मानसिकता पीडित महाराष्ट्रीय ऊठसूट ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’चे गुणगान करतो, यापेक्षा ‘मराठी विश्वकोश’ नोंदी अत्याधुनिक आणि अद्यातन आहेत. याचे कारण, विविध क्षेत्रांतील अनेक नोंदी लेखकांचा सहभाग या सामूहिक ज्ञानप्रकल्पास लाभला आहे. मराठी विश्वकोश कार्यालयातील तत्कालीन विद्याव्यासंगी संपादक सु. रा. देशपांडे, अ. ना. ठाकूर यांनी तर अक्षरश: हजारो नोंदी लिहून हा ज्ञानकोश ज्ञानसमृद्ध केला आहे.
तर्कतीर्थांनी १९६२ ला मराठी विश्वकोशाचा संकल्प सोडला. नंतर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी विचारविनिमय करून नोंदी (एन्टरीज) निश्चित केल्या. मानव्यविद्या कक्षा (ह्युमॅनिटिज्), विज्ञान व तंत्रज्ञान कक्षा (सायन्स अँड टेक्नॉलॉजीज्) यांमधील विविध ज्ञान-विज्ञाने, मूलभूत संकल्पना, परिभाषा यांच्या मराठी प्रतिशब्दांची निर्मिती असे व्यूह रचत नि सोडवत मराठी विश्वकोशाचा रचनाबंध तयार करण्यात आला. पृष्ठसंख्या, संहिता खंड, नोंद लेखन पद्धती, प्रकार निश्चित करण्यात आले. त्याआधारे विविध ज्ञानमंडळे, नोंद लेखक, संपादक, समीक्षकांची फौज तयार करण्यात आली. परिभाषा निश्चित करून त्यांचा कोश (परिभाषासंग्रह, खंड-१८) आधी प्रकाशित केला. कोश नोंदी करून घेऊन १९६५मध्ये ‘मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ’ तयार करण्यात येऊन तो विविध क्षेत्रांतील विद्वानांकडे अभिप्रायार्थ पाठविण्यात आला. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांकडे हा परिचय ग्रंथ समीक्षार्थ प्रस्तुत केला. विशेष म्हणजे तत्कालीन वृत्तपत्रांनी या मराठी ज्ञानव्यवहाराची गंभीर नोंद घेऊन आपापल्या वृत्तपत्रात आणि नियतकालिकांमध्ये वाचकांची पत्रे (अभिप्राय) प्रसिद्ध केली. तर्कतीर्थ ही ज्ञानकोशीय रचना व्यवहार लोकशाही पद्धतीने लोकसंवाद व लोकसहभागातून करू पाहात होते. अशा अभिप्रायांना त्या त्या वृत्तपत्र / नियतकालिकांत उत्तरे, खुलासे देण्याचा उदारमतवादी विचारसंस्कार तर्कतीर्थांनी जपला.
इतकेच नव्हे तर ‘मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ’ आनुषंगिक पत्रव्यवहार, उत्तरे, खुलासे यांचा विधिवत संग्रह ‘मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ’ (अभिप्राय, टीका आणि प्रतिटीका) प्रकाशित करण्याचा उमदेपणा तर्कतीर्थांनी दाखवून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पारदर्शी कार्यपद्धती मराठी समाजापुढे अनुकरणीय वस्तुपाठ म्हणून प्रस्तुत केली. या संग्रहात यशवंतराव चव्हाण, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस.पी.पी. थोरात, कुलगुरू न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ, प्रख्यात भाषा वैज्ञानिक सुनीतिकुमार चटर्जी, साहित्यिक वि. द. घाटे, समाजशास्त्रज्ञ सुमंत मुरंजन, कृषितज्ज्ञ वि. गो. पानसे, चंद्रकला हाटे, म. अ. मेहेंदळे, सुशीला घन, आर. डी. गुप्ते प्रभृती मान्यवरांची पत्रे आहेत.
डॉ. सुनीतिकुमार चटर्जींनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘‘I have been favourably impressed by the general get up as well as by the evidently high quality of the articles. When the entire Encyclopaedia is brought out in this style, it will bring great Kudos to both Indian scholarship and book production.’’ लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांनी लिहिले होते, ‘‘ I have read the volume with much interest and am confident that in its full and final shape, it will be a notable addition to Marathi Literature.’’
कुलगुरू काकासाहेब गाडगीळांनी लिहिलेय, ‘‘माझ्या मते, पुढील ग्रंथ समृद्ध व सुंदर होईल, याची हा लहानसा ग्रंथ एक प्रस्तावना आहे, आणि शितावरून भाताची परीक्षा करायची झाल्यास पुढील ग्रंथ चांगला होईल, याबद्दल मला खात्री आहे.’’
हा पत्रसंग्रह प्रशंसाग्रंथ नाही. यात दैनिक ‘मराठा’मधील ‘वाईकर भटजी’ शीर्षक अग्रलेखाची नोंद आहे. दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित एका लेखाची दखल आहे आणि दैनिक ‘केसरी’ने दाखविलेल्या उत्साहाचा योग्य तो परामर्शही यात आहे. महाराष्ट्रीय ज्ञानव्यवहाराचे विसावे शतक हे मुक्त व्यासपीठ होते. मतमतांतरे हा त्यांचा परामर्श घेण्याचा स्थायिभाव होता, हेही अधोरेखित होते.