वर्षानुवर्षे दुष्काळात होरपळणारा मराठवाडा यंदा पुराने वेढला जात असतानाच या दुष्काळाची वेदना आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या भास्कर चंदनशिव यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. भास्कर देवराव यादव असे त्यांचे पूर्ण नाव. दत्तक गेल्यामुळे ते भास्कर तात्याबा चंदनशिव म्हणून ओळखले जायला लागले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ चा. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली. १९७० च्या आसपास औरंगाबादमधील कथालेखनस्पर्धेत त्यांच्या ‘मसणवाटा’ या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले.
‘अस्मितादर्श’ या गंगाधर पानतावणे यांच्या नियतकालिकात त्यांच्या कथा यायला लागल्या. दलित साहित्याच्या प्रांतात भास्कर चंदनशिव यांचे नाव महत्त्वाचे गणले जाऊ लागले. १९८० साली त्यांचा ‘जांभळ ढव्ह’ हा कथासंग्रह ‘लोकवाङमय गृह’ने प्रकाशित केला. साहित्य संस्कृती मंडळाने त्याला नवलेखक अनुदान दिले. या संग्रहापासून ते ‘आजच्या आणि उद्याच्या महाराष्ट्राचा एक समर्थ दलित लेखक’ म्हणून ओळखले जायला लागले. पुढे ग्रामीण मातीशी जोडलेला, गावगाड्यात पाय घट्ट रोवून उभा असणारा शेतकरी हा त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू झाला.
कवी इंद्रजित भालेराव त्यांच्याबद्दल लिहितात की त्या काळात दलित साहित्यात बाबूराव बागल आणि ग्रामीण साहित्यात आनंद यादव, रा. रं. बोराडे ही नावे आघाडीवर होती. चंदनशिव यांनी या दोन्हीमधील सीमारेषा पुसून काढत दलितांमधला विद्रोह आणि शेतकऱ्याच्या जीवनातील संघर्ष यांना आपल्या साहित्याचा केंद्रबिंदू केले. लाल चिखल ही त्यांची कथा दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होती. ‘जांभळ ढव्ह’, ‘मरणकळा’, ‘नवी वारूळ’, ‘बिरडं’, ‘अंगारमाती’या कथासंग्रहांमधून त्यांनी दलित, शोषित वर्गाच्या संघर्षाचे चित्रण केले. पाच कथासंग्रहातील एकूण ५० कथांच्या बळावर भास्कर चंदनशिव हे समर्थ लेखक ठरले.
ग्रामीण जीवनाला स्पर्श करणाऱ्या कथासंग्रहांनी शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे तेथील लोकांच्या वाट्याला आलेला संघर्ष मांडण्याचे काम केले. त्यांनी समीक्षा लेखनही केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आष्टी येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम सुरू करून त्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापन केले. सेवानिवृत्तीनंतर ते कळंब येथे स्थायिक झाले होते.
दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, बी.रघुनाथ पुरस्कार, पु.भा.भावे पुरस्कार, अ.वा.वर्टी पुरस्कार, दिवाकर कृष्ण पुरस्कार, आनंदीबाई शिर्के पुरस्कार आणि दमाणी पुरस्कार इत्यादी महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.
अस्मितादर्श साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, वाळवा येथे झालेले ग्रामीण साहित्य संमेलन यांचे ते अध्यक्ष होते. २००३ सालचा ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रातील महाराष्ट्र फाउण्डेशन विशेष पुरस्कार भास्कर चंदनशिव यांना जाहीर झाला होता. शेती आणि शेतकरी हे दोन्ही घटक एकूणच परिस्थितीच्या रेट्यात अधिकाधिक पिचले जात असताना त्यांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या ताकदीने लोकांसमोर आणू इच्छिणाऱ्या नव्या पिढीतील लेखकांसाठी भास्कर चंदनशिव हे कायमच प्रेरणादायी राहतील.