नारायणशास्त्री मराठे ऊर्फ स्वामी केवलानंद सरस्वती हे माझे गुरू. मी त्यांच्याकडे संस्कृत विद्येचे पांडित्य संपादन करण्याकरिता आलो होतो. ते पंडित होते, परंतु ते इतर शास्त्री-पंडितांप्रमाणे नव्हते. शास्त्री-पंडितांचा सन्मान आणि दक्षिणा याकडे ओढा असतो. सुखी जीवनाची लालसा असते, परंतु गुरुवर्य स्वामी केवलानंद हे संन्यासाश्रम स्वीकारण्यापूर्वीच संन्यासी होते.

जन्मसिद्धच विरक्ती त्यांच्या ठिकाणी प्रतीत होत होती. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’, अशी वर्तनाची खूण त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा मिळालेली आहे. ते बालब्रह्मचारी होते. त्यामुळे आपल्या वर्तनावर जगाचा कडक पहारा नसावा, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. म्हणून त्यांच्या निंदकांनी केलेली निंदा वा कुचाळकी त्यांच्या कानांवर वारंवार पडली, तरी निंदकांबद्दलची घृणा त्यांच्या वर्तनात व बोलण्यात कधीही दिसत नसे. परनिंदावर्जन, अमात्सर्य व अपरिग्रह यांचे उदात्त प्रतीक म्हणजे स्वामीजींचे जीवन होय. देवपूजेचा पसारा ते मांडत नसत.

‘कोणाही भूताचा न घडो मत्सर’ या संतोक्तीप्रमाणे सद्भावनेनेच ते ईश्वराची पूजा करत. भजन-पूजनाचा डामडौल नव्हता, परंतु निरंतर सोहंच्या अजपाजपामध्ये त्यांचे मन निमग्न होते. संचयाची वासना मनास कधीच शिवली नाही. कारण ते संशयमुक्त झाले होते. भक्तजनांनी पायापुढे ठेवलेली दक्षिणा, फळे, वस्त्रे वगैरे पदार्थ ते लगेच कोणास तरी देऊन टाकत. त्या पदार्थांची विल्हेवाट लागण्यास कधीही दुसरा दिवस उजडला नाही. ते न्याय, व्याकरण, मीमांसा, वेदांत, साहित्य यांमध्ये पारंगत होते, परंतु त्यासंबंधी त्यांना अहंता नव्हती.

ते स्वत: वक्तृत्वसंपन्न नव्हते, परंतु वक्तृत्व व वादचातुर्य शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. वादविद्योचा वर मला त्यांच्याच कृपाप्रसादाने मिळाला. काशी, कलकत्ता येथे प्रसिद्ध असलेल्या पंडितांशी निर्भयपणे मी वाद केले व कित्येकदा जिंकलेही. कित्येकदा कारण नसताना जिंकले. माझी बाजू लंगडी असतानाही जिंकले. माझ्या बाजूचा लंगडेपणा वादोत्तरकाली माझे गुरू मला दाखवून देत. तुझा अमुक एक मुद्दा टिकण्यासारखा नाही, असे ते मला बजावत. ते स्वत: वादपंडित का झाले नाहीत, याचे उत्तर त्यांच्या जीवनमूल्यांच्या कल्पनेत मिळते.

तारुण्यातच त्यांनी प्रपंचाकडे पाठ फिरविली. ते मोक्षमार्गाचे पथिक झाले. त्या मार्गाचे मौन हे साधन आहे. ते मानवी प्रपंच सुखाचा व्हावा, असे मानणारे होते. टिळकांच्या कर्मयोगाचे ते समर्थन करीत, परंतु स्वत: ते विरक्त होते. यज्ञादी गृहस्थक गृहस्थाश्रमाच्या अभावी त्यांना करावयास मिळाली नाहीत. म्हणून संन्यासाश्रम घेतल्यानंतर यज्ञविद्योचे म्हणजे चारी वेदांचे चिंतन करण्यात त्यांनी काळ घालविला. त्यांनी प्रचंड मीमांसा कोश संन्यासाश्रमातच लिहिला.

पूर्वमीमांसेचे आधारग्रंथ म्हणजे यज्ञाचे विवरण करणारे चार वेद व श्रौतसूत्रेच होत. प्रत्यक्ष यज्ञ केले नाहीत तरी यज्ञांचे फळ यज्ञांचे मनन केल्याने म्हणजे यज्ञज्ञानाने मिळते, असे वेद सांगतात. गुरुवर्य केवलानंद स्वामी यांनी यज्ञाचे व संन्यासाचे, कर्मयोगाचे व ज्ञानयोगाचे असे द्विविध फळ संन्यास आश्रमातच प्राप्त करून घेतले. ‘गुरोस्तु मौनं व्याख्यानम्’ अशा गुरू परंपरेतील ते गुरू होते. त्यांच्या दैनंदिन वर्तनात अहिंसा – सत्यादी महाव्रतांचे विवेचन सापडत होते. निर्मम, निर्भय व अपरिग्रही संन्यासी परंतु कर्मयोगी, असे ते वर्तमानकाळातील गुरू होते. तो आचार्यपदाचा अस्सल आदर्श होता.

गुरुस्वामींना शास्त्रीय गायन अवगत होते. ते शास्त्रीय संगीतात अनेक श्लोक विविध रागांमध्ये आळवून म्हणत. पुढील श्लोक हा भर्तृहरीच्या वैराग्यशकातील आहे. ते म्हणत की, ‘यावत्स्वस्थमिदंशरीरमरुजं यावज्जरा दूरत:। यावच्चेन्द्रियशक्तिर प्रतिहता यावत्क्षयोनायुष:। आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यप्रयत्नो महान् संदीप्ते भवनेतु कूपखननं, प्रत्युद्याम: की हश:।’ मोक्षमार्गाचे ते पथिक आता कायम दृष्टिआड झाले. माणसाची दृष्टी इतक्या लांब पोहोचत नाही.

गुरुजी नंतर संन्यासीपणे, एकाग्रपणे जैमिनीय आणि बादराणीय मीमांसांचे मनन करीत. त्याला अनुसरून ग्रंथलेखन, ब्रह्मचिंतन, ध्यानयोगाभ्यासात सर्वकाळ मग्न राहिले. प्रयाणाचा काळ समीप आल्यावर दीर्घकाळ नियमितपणे, खंड न पडता एकाक्षर ओंकार जप करीत असत. ओंकार उच्च स्वरात उच्चारीत ते ब्रह्मात विलीन झाले.

– डॉ. सुनीलकुमार लवटे / drsklawate@gmail.com